कराड : नदीत आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह | पुढारी

कराड : नदीत आढळला पोत्यात बांधलेला मृतदेह

कराड : पुढारी वृत्तसेवा

नदीपात्रात पोत्यात बांधलेल्या स्थितीत पुरूष जातीचा मृतदेह आढळून आला. कराड तालुक्यातील मालखेड येथे मारूती घाट परिसरात ही घटना समोर आली. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. ही घटना संशयास्पद असून घातपात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांच्या तपासाची चक्रे गतिमान झाली आहेत. घटनास्थळी पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे.

कराड तालुक्यातील मालखेड येथे बुधवारी काही मासेमारी करणारे लोक नदीपात्रात गेले होते. त्यावेळी त्यांना एक पोते नदीपात्रात आढळले. संशय आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना फोन केला. अपर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील, सहाय्यक निरिक्षक रेखा दुधभाते, भरत पाटील, एसआय जाधव, धनंजय कोळी, सज्जन जगताप, विजय म्हेत्रे, शशिकांत घाडगे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता तो पुर्णतः कुजलेल्या अवस्थेत होता. कपड्यासह इतर काही बाबींवरून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू होते. हा मृत्यू संशयास्पद असून घातपाताची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहीत धरून पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. एकूणच कराड शहर व तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून खूनाची मालिका सुरूच आहे.

Back to top button