सातारा जिल्हा बॅँक : मतदाराला पाच मतांचा अधिकार | पुढारी

सातारा जिल्हा बॅँक : मतदाराला पाच मतांचा अधिकार

सातारा : महेंद्र खंदारे

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 10 जागांसाठी दि. 21 रोजी मतदान होणार आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता 9 मतदारसंघांतून 10 उमेदवार निवडून द्यायचे आहेत. महिला राखीव मतदारसंघात दोन उमेदवारांना निवडून द्यावे लागणार आहे.

जिल्ह्यात एकूण 1964 मतदार असून ज्या ठिकाणी सोसायटीची निवडणूक लागली आहे तेथील मतदारांना 5, तर जिथे सोसायटी बिनविरोध झाली आहे तेथील मतदारांना चार मते देण्याचा अधिकार आहे. ही मतदान प्रक्रिया बॅलेट पेपरवर राबविली जाणार असून तालुक्याच्या ठिकाणी मतदान होणार आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लक्षवेधक ठरली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी 118 जणांनी रणांगणातून पळ काढला. त्यामुळे 8 मतदारसंघ बिनविरोध झाले. तत्पूर्वी 3 जागा बिनविरोध आल्या होत्या. त्यामुळे एकूण 11 उमेदवार बिनविरोध निवडून गेले असून आता 9 मतदार संघातून 10 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

जिल्हा बँकेसाठी फलटण सोसायटीतून विधान परिषद सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर, गृहनिर्माण मतदारसंघातून खा. उदयनराजे भोसले, सातारा विकास सेवा सोसायटीतून आ. शिवेंद्रराजे भोसले, खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील, वाई सोसायटीतून नितीन काका पाटील, महाबळेश्‍वर सोसायटीतून राजेंद्र राजपूरे, खंडाळा सोसायटीतून दत्तानाना ढमाळ, कृषी प्रक्रिया मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डे कर, मजूर सोसायटीतून अनिल देसाई, अनुसूचित जातीमधून सुरेश सावंत व विमुक्‍त भटक्या जाती-जमातीमधून लहू जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत.

त्यामुळे आता कराड सोसायटी, पाटण सेसायटी, कोरेगाव सोसायटी, जावली सोसायटी, माण सोसायटी आणि खटाव सोसायटींमध्ये तुल्यबळ लढती होत आहेत. याचबरोबर इतर मागास प्रवर्ग, नागरी सहकारी बँका व महिला प्रतिनिधी मतदारसंघातही चुरशीच्या लढती होणार आहेत.

सातारा जिल्हा बँकेसाठी एकूण 1964 जण मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. कराड, पाटण, माण, खटाव, जावली व कोरेगाव या सोसायटी मतदारसंघातील मतदारांना 5 मते देण्याचा अधिकार आहे. यामध्ये सोसायटी 1, नागरी सहकारी बँका 1, ओबीसी 1 व महिला प्रतिनिधी 2 असे वर्गीकरण राहणार आहे. तर फलटण, सातारा, वाई, महाबळेश्‍वर व खंडाळा या तालुक्यातील मतदारांना नागरी सहकारी बँका 1, ओबीसी 1 व महिला प्रतिनिधी 2 अशी 4 मते देण्याचा अधिकार आहे. एकीकडे प्रचाराचा धुरळा उडाला असताना दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने काटेकोर नियोजन करत आहे.

मतदारांची होतेय दिवाळीनंतरची दिवाळी…

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ठराविक मतदार असतात. मतदानासाठी आता अवघे 7 दिवस शिल्‍लक राहिल्याने उमेदवारांकडून गाठीभेटीचा सिलसिला सुरू झाला आहे. उमेदवारांना गावोगावी गाठून त्यांची मनधरणी केली जात आहे. त्यातच एका मतदाराला 4 व 5
मतांचा अधिकार असल्याने त्यांचा ‘भाव’ वधारला आहे. सोसायटीसह अन्य मतदारसंघातील उमेदवारही भेटून जात असल्याने आता मतदारांची दिवाळीनंतरची दिवाळी होणार असल्याची चर्चा आहे. त्या-त्या मतदारसंघातून दोन्ही गटाचे उमेदवार मतदारांची भेट
घेत मतदानासाठी आवाहन करीत आहेत. त्यासाठी विविध आमिषेही दाखविली जात असल्याच्या चर्चा आहेत.

पाहा व्हिडिओ 

अशी धावली रस्त्यांवर पहिल्यांदा आपली लालपरी!!!

Back to top button