NCRB : ‘हिट अँड रन’च्या गुन्ह्यांमध्ये घट; एनसीआरबीचा रिपोर्ट | पुढारी

NCRB : 'हिट अँड रन'च्या गुन्ह्यांमध्ये घट; एनसीआरबीचा रिपोर्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मानवी चुकांमुळे होणाऱ्या रस्ते अपघातांमध्ये गेल्या वर्षभरात १.२० लाख लोकांचा मृत्यू झाला.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोकडून (NCRB) सादर करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

कोरोना महारोगराईमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर देखील दररोज सरासरी ३२८ लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये रस्ते अपघातात ३.९२ लाख लोकांनी आपले प्राण गमावले. २०१९ मध्ये १.३६ लाख, तर २०१८ मध्ये १.३५ लाख लोकांचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती अहवालातून (NCRB) समोर आली आहे.

एनसीआरबीच्या अहवालानूसार देशात २०१८ नंतर ‘हिट अँड रन’चे १.३५ लाख प्रकरणे नोंदवण्यात आले. २०२० मध्ये हिट अँड रन चे तब्बल ४१ हजार १९६ प्रकरणे नोंदवण्यात आले. तर, २०१९ मध्ये ४७ हजार ५०४ आणि २०१८ मध्ये ४७ हजार २८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. देशात गेल्या वर्षभरात हिट अँड रन चे दरदिवशी सरासरी ११२ प्रकरणे समोर आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक मार्गांवर वेगाने अथवा निष्काळजीपणाने गाडी धोपटल्याने झालेल्या अपघातांमध्ये २०२० मध्ये १.३० लाख लोक जखमी झाले. २०१९ मध्ये हे प्रमाण १.६० लाख आणि २०१८ मध्ये १.६६ लाख होते. तर, अपघातांमध्ये गंभीर जखमी होण्याचे प्रमाण २०२० मध्ये ८५ हजार ९२०, २०१९ मध्ये १.१२ लाख आणि २०१८ मध्ये १.०८ लाखांच्या घरात होते. दरम्यान देशभरात २०२० मध्ये रेल्वे दुर्घटनेत निष्काळजीपणामुळे झालेल्या मृत्यूचे प्रकरणे ५२ नोंदवण्यात आली. २०१९ मध्ये हे प्रमाण ५५ आणि २०१८ मध्ये ३५ एवढे होते.

२०२० मध्ये वैद्यकीय हलगर्जीपणामुळे १३३ रूग्णांचा मृत्यू झाला.तर,२०१९ मध्ये हे प्रमाण २०१ व २०१८ मध्ये २१८ एवढे होते. इतर निष्काळजीपणामुळे २०२० मध्ये ६ हजार ३६७ जणांचा मृत्यू झाला. तर, २०१९ मध्ये ७ हजार ९१२, २०१८ मध्ये ८ हजार ६८७ जणांचा मृत्यू झाला.

एनसीआरबीच्या अहवालानूसार २५ मार्च २०२० ते ३१ मे २०२० पर्यंत कोरोना महारोगराईमुळे सार्वजनिक ठिकाणी वर्दळीला प्रतिबंद घालण्यात आल्याने या काळात महिला, मुले तसेच वरिष्ठ नागरिकांच्या विरोधात गुन्हे, चोरी तसेच दरोड्यांच्या घटनांमध्ये घट नोंदवण्यात आली आहे.

Back to top button