मुश्रीफ-सोमय्या सामना रंगणार | पुढारी

मुश्रीफ-सोमय्या सामना रंगणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेले 127 कोटींच्या घोटाळ्याचे गंभीर आरोप, त्यावर मुश्रीफ यांनी 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याचा दिलेला इशारा आणि त्याचबरोबर सोमय्या यांच्याविरोधात मंत्री मुश्रीफ समर्थकांनी सुरू केलेली निदर्शने, यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मंत्री मुश्रीफ व सोमय्या यांच्यातील आव्हान-प्रतिआव्हानांमुळे राजकीय कलगीतुरा रंगला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर सोमय्या सोमवारी कोल्हापूर दौर्‍यावर येत आहेत. सोमय्या यांनी कोल्हापूर दौरा जाहीर केल्यानंतर त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापुरी हिसका दाखविण्याचे आव्हान दिले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमधील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

किरीट सोमय्या यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर आरोप केल्यापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सोमय्या यांचा निषेध केला जात आहे. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली, त्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील वातावरण तापले होते. मंत्री मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले होते.

पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही मंत्री मुश्रीफ यांचे समर्थन केले आहे. शनिवारी खा. संजय मंडलिक यांनीही कृत्रिम संकटाला मंत्री मुश्रीफ न डगमगता सामोरे जातील, असा विश्वास व्यक्त करत त्यांचे समर्थन केले आहे.

सोमय्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी त्यांना अडविण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास संघर्ष अटळ आहे. त्यामुळेच सोमय्या यांच्या दौर्‍याकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

सोमय्या यांचा दौरा असा…

सकाळी 7.30 वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने आगमन, 9.15 वाजता श्री अंबाबाईचे दर्शन, 9.45 वाजता भाजप कार्यालयाला भेट, 11.30 वाजता सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची बाहेरून पाहणी, 12.45 वाजता मुरगूड पोलिस ठाण्यात भेट, 3 वाजेपर्यंत राखीव, 3.15 वाजता पोलिस अधीक्षकांची भेट घेणार, 4 वाजता पत्रकार परिषद, 5.15 वाजता भाजपच्या ग्रामीण कार्यकर्त्यांची बैठक, 6 वाजता शहर पदाधिकार्‍यांच्या बैठकीत मार्गदर्शन. रात्री 8.15 वाजता मुबंईकडे प्रयाण.

Back to top button