सिंहायन आत्मचरित्र : ‘पुढारी’ची गरुडभरारी | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : ‘पुढारी’ची गरुडभरारी

गतवर्षी पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमा प्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
-संपादक, बहार पुरवणी

‘पुढारी’ म्हणजे महाराष्ट्रातील अग्रगण्य, मानांकित व जनतेच्या पसंतीस उतरलेले वर्तमानपत्र. मात्र, इथंवरचा ‘पुढारी’चा हा प्रवास सहजसोपा नव्हता. त्यालाही प्रचंड खडतर वाटचाल करावी लागली. काळाच्या कसोट्यांवर टिकण्यासाठी वैचारिक मतभेदांनाही तोंड द्यावे लागले, स्पर्धकांशी दोन हात करावे लागले. परंतु, बावनकशी सोनं जसं तावून सुलाखून निघाल्यानंतर त्याला झळाळी प्राप्त होते, अगदी तसेच ‘पुढारी’च्या बाबतीत घडले. माझ्या अधिपत्याखाली ‘पुढारी’ने आपल्या कार्यक्षेत्रात मन्वंतर घडवून आणले. व्यावसायिक नव्हे, तर ध्येयवादी पत्रकारितेची पालखी वाहिली. ‘पुढारी’ व त्याची ही देदीप्यमान वाढ-वाटचाल… हा इतिहास खूपच रोचक व लढवय्यांनाही स्फूर्ती देणारा आहे.

आबा म्हणजे पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांनी 1937 साली ‘पुढारी’ सुरू केला. प्रथम तो साप्ताहिक स्वरुपात होता. मात्र, अल्पावधितच म्हणजे 1939 साली आबांनी ‘पुढारी’चे दैनिकात रूपांतर केले. सुरुवातीला ‘पुढारी’ जनमानसात रुजवताना त्यांना अथक परिश्रम पडले. परंतु, खडतर वाटचाल असली तरी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी ‘पुढारी’ नावारूपाला आणला. ‘पुढारी’ नावारूपाला आणण्यासाठी आबांची सुरू असलेली धडपड मी लहानपणापासूनच पाहत होतो. ‘पुढारी’च्या ‘त्या’ वाटचालीतील प्रत्येक पायरीचा मी साक्षीदार आहे.

‘पुढारी’चा 1962 साली रौप्यमहोत्सव झाला. त्यावेळी मी विद्यार्थीदशेत होतो. माझे शालेय शिक्षण, पुण्यातील वृत्तपत्रविद्या व लॉ कॉलेजचे शिक्षण सुरू असतानाच्या काळातही माझं पूर्ण लक्ष ‘पुढारी’कडे असायचे. रौप्यमहोत्सवावेळी मी पंतप्रधानांसारखा पाहुणा सुवर्ण महोत्सवाला आणण्याचा केलेला निश्चय तेव्हाही चर्चेचा विषय ठरला होता. त्यावरून माझ्या जिद्दी, आव्हान स्वीकारणार्‍या कल्पक स्वभावाची कल्पना यावी. आबांना माझं अप्रूप वाटायचं. ‘माझा बाळ या क्षेत्रात निश्चितच काहीतरी अफाट करून दाखवेल,’ असं ते आईसाहेबांना म्हणायचे. विशेष म्हणजे माझा तेव्हा वृत्तपत्रात प्रत्यक्ष सहभागही नव्हता. परंतु, म्हणतात ना, ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात!’ ते उगाच नव्हे.

माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व माझ्या विदेश वारीनंतर 1969-70 साली ‘पुढारी’ची धुरा माझ्याकडे आली. मला गगनभरारीसाठी रान मोकळे झाले असले तरी माझा आक्रमक स्वभाव पाहता तसे आबा चिंतेतच असायचे. त्यातच तेव्हा मी अवघा पंचविशीतला. वयोमानानुसार मी तसा पोरसवदाच. तरुण पोरावर एकदम जबाबदारी सोपवता येत नाही, हा परंपरागत द़ृष्टिकोन. त्यातच संपूर्ण वर्तमानपत्राचा कारभार हाताळण्याचा तसा अनुभव मला नव्हताच. त्यामुळे ‘पुढारी’चा कारभार माझ्या हातात आल्यानंतर आबांच्या मित्रमंडळींचाही ‘हे काय करून बसलात!’ असाच द़ृष्टिकोन. मी ‘पुढारी’ नीट सांभाळेन का?, मला हे पेलेल का? अशा त्यांच्या नानाविध शंका. साहजिकच नाही म्हटलं तरी आबांचीही तशी अवघडल्यासारखीच स्थिती व्हायची.

आपला मुलगा आक्रमक आहे, मन लावून काम तडीस नेणारा आहे… हे एक पिता म्हणून आबांच्या नजरेतून सुटलं नव्हतं; पण तरीही माझं पोरसवदा वय पाहता त्यांच्याही मनातल्या शंका वेळोवेळी उचल खायच्या. ते घरी आईसाहेबांशी संवाद करताना अनेकदा म्हणायचे, ‘काय करतोय कुणास ठाऊक. त्याचे विचार काय आहेत तेच कळत नाही.’ मात्र, माझ्याकडे असलेले प्रचंड आत्मविश्वासाचं भांडवल व त्याची खोली त्यांना समजण्याची तशी शक्यता नव्हतीच. माझ्याकडे असलेला प्रचंड आत्मविश्वास, निर्भय वृत्ती व पुढारपणाची विजिगीषुवृत्तीच ‘पुढारी’चा ब्रँड रुजवायला, वाढवायला कारणीभूत ठरली हे त्यांना समजण्यास मात्र सुरुवातीची काही वर्षे जावी लागली.

एकीकडे पुत्राच्या कर्तृत्वावर विश्वास व दुसरीकडे पठडीतल्या विचारसरणीमुळे चिंताही अशी तेव्हा आबांची स्थिती होती. त्याचा त्रास अर्थातच मलाही झाला. मी हातात घेतलेली प्रत्येक गोष्ट त्यांना समजावून सांगावी लागायची, ते कसं आवश्यक आहे हे पटवून द्यावं लागायचं. ही वैचारिक मतभेदाची दरी ओलांडताना खूपच ओढाताण व्हायची; पण माझं लक्ष्य ठरलं होतं. त्याचा पिच्छा करताना मी हरणार नव्हतो. मला जिंकायचं होतं व त्यासाठी आकाश-पाताळ एक करण्याची माझी तयारी होती. त्यानुसारच मी माझी वाटचाल ठेवली. मला जी पटतील अशा अनेक आयुधांचा वापर करून मी माझी वाट मोकळी करीत गेलो. गगनभरारीसाठी हे आवश्यकच होतं. साहजिकच ‘पुढारी’ची धुरा हातात घेतल्यानंतर मी दुप्पट उत्साहाने कामाला लागलो.

मी 1969-70 ला ‘पुढारी’ची सूत्रे स्वीकारली. लगेचच 1972 साली जर्मनीहून हायस्पीड प्लामाग रोटरी मशिन आणले. त्यासाठीही मला झुंजावे लागले. कर्ज काढून रिस्क घ्यायची नाही, हा आबांचा पूर्वांपार पठडीतील विचार. साहजिकच माझं अत्याधुनिक मशिनसाठी कर्ज काढणं हा कमालीचा बंडखोरपणा झाला. ते मशिन आणण्यासाठी भांडवल कसं उभारणार? लाखो रुपयांचं कर्ज घेतलं तरी ते फेडणार कसं? मशिन आणल्यानंतर व्यवसाय कसा वाढवणार? ते ठेवणार कुठे? आदी अनेक घटकही समोर आ वासून उभे ठाकले होते. तसलंच मशिन आणून आर्थिक अडचणीत गेलेल्या ‘विशाल सह्याद्री’च्या अनंतराव पाटील यांच्यापासून आबांच्या केशवराव भोसले, सर्जेराव पाटील आदी मित्रमंडळींच्या मनातील शंकांची जळमटं माझ्या अवतीभवती होती; पण कर्तृत्वाला गगन ठेंगणे म्हणतात ते उगाच नव्हे. अन् आपल्याला हे करायचंच आहे, तर वेळ का लावायचा… हा माझा सडेतोड सवाल. विजयपथाकडे जाणारा मार्ग मी आखला होता, या मार्गावर मी यशस्वी होईन याची मला खात्री होती. साहजिकच विरोधाच्या बुरुजांमुळे मी माझ्या भूमिकेवर अधिकच ठाम झालो होतो. यशस्वी होण्यासाठी माझी कळीकाळालाही टक्कर द्यायची तयारी होती व त्यातूनच मी हायस्पीड प्लामाग रोटरी मशिन आणले. अन् त्याची रसाळ फळेही मिळाली.

आबा शांत, अजातशत्रू होते. त्यांनी सडेतोडपणा अंगिकारला तरी ते कुणाला दुखवायचे नाहीत. जहाल व्हायचे नाहीत. टीकेचा मार्गही ते पत्करायचे नाहीत. सौम्यपणाच्या मार्गावरून त्यांची वाटचाल व्हायची. या उलट माझा स्वभाव. माझे आजोबा तापट. तो जीन्स माझ्याकडे आला असावा. तर, स्वभावधर्मानुसार मी अतिशय आक्रमक. कुणाचा मुलाहिजा बाळगायचा नाही, हा आपला कट्टर बाणा. त्यामुळेच माझ्या निर्भीड, निःपक्ष आणि सडेतोड लिखाणाला आक्रमकतेची जबरदस्त धार यायची, ती धार आजही कायम आहे. सीमा आंदोलनाच्या वेळी म्हणजे 1973 मध्ये कन्नडिंग गुंडांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावर लिहिलेला ‘या हरामखोरांना आवरा’ हा माझ्या पत्रकारितेच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीतील पहिलाच अग्रलेख. या अग्रलेखामुळे फक्त कोल्हापूरच पेटले नाही, तर पश्चिम-दक्षिण महाराष्ट्रात आगडोंब उसळला. त्याचे झटके मुंबईपासून दिल्लीपर्यंत बसले. काय करायचे, या विवंचनेत राज्य सरकार पडले. त्यावेळी सर्वांच्या लक्षात आले की, मी किती आक्रमक आहे! हा अग्रलेख वाचल्यानंतर मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘अशीच सडेतोड लेखणी हवी. उगाच टिवल्याबावल्या करणारं पुचाट लेखन नको. बाळासाहेब, आपला अग्रलेख वाचल्यानंतर मला तर वाटलं की, लोकांचे नेतृत्व करणारे ‘पुढारी’ आले! असाच जोश पुढेही कायम राहू दे. मी हाच अग्रलेख माझ्या ‘मार्मिक’मध्ये पुनर्मुद्रित करतोय.’

बाळासाहेब ठाकरे इतकंच करून थांबले नाहीत, तर त्यांनी राज्य सरकारलाही आव्हान दिलं की, ‘हिंमत असेल तर बाळासाहेब जाधवांच्यावर कारवाई करा!’ पण माझी भूमिका स्पष्ट होती. माझ्यामुळे लोक रस्त्यावर उतरलेले. अशावेळी माझ्यावर कारवाई करून राज्य सरकार तरी हा विस्तव कशाला पदरात बांधून घेईल! मी 1969-70 मध्ये ‘पुढारी’ची सूत्रे हातात घेतल्यानंतर आधुनिकीकरणाला चालना दिली. त्यानंतर लगेचच 1972 मध्ये जर्मनमेड रोटरी हायप्लाग मशिन बसवले. तर पुढच्याच वर्षी आगीच्या लोळासारखा कन्नडिंगांवर कोसळलो. माझ्या या सडेतोड भूमिकेनं त्यावेळी स्थापन झालेल्या सीमाप्रश्न कृती समितीचा मी अध्यक्षही झालो. त्यावेळी काँग्रेस, शेकाप, समाजवादी, कम्युनिस्ट आदी पक्षांकडे दिग्गजांची मांदियाळी होती. ते बुजुर्ग, राजकारणातील अनुभवी होते. तरी माझ्यासारख्या ऐन सव्वीशीतल्या तरुणाकडे सीमा आंदोलनाचं सर्वपक्षीय नेतृत्व देण्यात आलं. त्यावरून माझ्या धडाडी व व्यापक भूमिकेची कल्पना यावी. अशा सर्व घटकांमुळे ‘पुढारी’ची, माझी प्रतिमा जनमानसात चांगलीच रुजली व ‘पुढारी’ जनतेच्या घरचाच एक मेंबर झाला. साहजिकच ‘पुढारी’ जिल्हा वृत्तपत्र न राहता विभागीय वृत्तपत्र म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत त्याचा खप प्रचंड वाढला. ‘पुढारी’ने दोन वर्षांतच प्रचंड गरुडभरारी घेतली. अन् मी उचललेल्या या सर्वंकष पावलांमुळे पुण्या-मुंबईकडून होणारे साखळी वर्तमानपत्रांचं आक्रमण रोखलं गेलं.

माझ्या अधिपत्याखालील ‘पुढारी’त काळानुरूप सातत्याने बदल घडत गेले. शिवाय मीही जनप्रश्नांवर चांगलाच आक्रमक व सडेतोड राहिलो. चुकीला माफी नाही, अन् अन्याय सहन करायचा नाही ही माझी सरळसोट भूमिका. त्यामुळे माझ्या लेखणीला चांगलीच धार चढत गेली. अगदी मुख्यमंत्री पदही माझ्या फटकार्‍यातून सुटले नाही. बाळासाहेब ठाकरे हे माझे तसे मित्र; परंतु त्यांच्या चुकीसाठीही अग्रलेखाच्या माध्यमातून लिखाण केले. विशेष म्हणजे त्याकाळात राज्यात शिवसेना-भाजपचीच सत्ता होती. जनतेवरच्या जुलूम-जबरदस्तीनं मी आतून पेटून उठतो. राजकारण्यांची धरसोडवृत्ती, अप्पलपोटेपणा माझ्यातील संवेदनशीलता चेतवित राहतो.

साहजिकच मी कुणाची भीडभाड न बाळगता, मुलाहिजा न ठेवता त्याविरुद्ध लिहितो. ‘पुढारी’मध्ये राजकीय अग्रलेख मीच लिहितो. ‘तर मग राजवस्त्रे उतरवा’ हा रोखठोक लिहिलेला अग्रलेख असो किंवा ‘शरदचंद्र बारामती’ हा शरद पवारांवरचा झणझणीत अग्रलेख, त्याचप्रमाणे ‘एन्रॉन’संदर्भात शिवसेना-भाजप युतीच्या धोरणावरचा टीकात्मक अग्रलेख असो, मी कुणाचाही कधीच मुलाहिजा ठेवला नाही, याचे सबळ पुरावेही आहेत. अखेर जनतेला काय हवं असतं? सर्वसामान्य माणूस गुंडपुंड, राज्यसत्तेशी लढा देऊ शकत नाही. मग त्याचं आश्रयस्थान असतं ते ‘पुढारी’सारखं विश्वासार्ह वर्तमानपत्रच. या माध्यमातून त्याला त्याच्या आवाजाला वाट मोकळी करून द्यायची असते, भावना बोलून दाखवायची असते. सर्वसामान्यांच्या या लढाईत मला अमाप शत्रू निर्माण झाले; पण जनहितापुढे मी त्यांची कधीच पर्वा केली नाही. जनहितासाठी मी सर्वांना अंगावर घ्यायचो. निष्पक्ष व निर्भीड हे ‘पुढारी’चं ब्रीद मी नेहमीच जागतं ठेवलं, त्याला अंगभूत धडाडीची जोड होतीच. त्यामुळेच सीमाप्रश्न असो, मराठा आरक्षणाचा प्रश्न असो, टोलनाक्याचा प्रश्न, दूध-ऊस आंदोलने, जोतिबा परिसर विकास, एलबीटी, खंडपीठ, रिक्षामीटर प्रश्न… अशा अनेक प्रश्न, आंदोलनात जनतेनंच माझ्याकडे नेतृत्व सोपवलं व मीही अग्रभागी राहिलो, लढलो व जनतेला न्यायही मिळवून दिला.

माझ्या लेखणीत सामर्थ्य आहे. त्याला वाङ्मयीन बाज आहे. तसं पाहिलं तर वृत्तपत्र व साहित्य हे एकमेकाला पूरकच असतात. लेखणीचं सामर्थ्य हा पत्रकार व लेखक या दोहोंचा समान गुणधर्म असतो. समर्थ पत्रकार हा सामर्थ्यवान लेखक असतो व समर्थ लेखक हा उत्तम पत्रकार होऊ शकतो. कारण, दोघांचीही नाळ समाजाशी जोडलेली असते. समाजाचे अंतरंग पाहण्याची, धांडोळण्याची कुवत दोघांतही असते आणि तेच त्यांचे खरे बळ आहे. फक्त फरक पडतो तो अभिव्यक्तीमध्ये. तोही काही प्रमाणात. ज्ञानपीठ विजेते वि. वा. शिरवाडकर, आचार्य अत्रे, ह. मो. मराठे, रमेश मंत्री आदी असंख्य साहित्यिक झालेल्या पत्रकारांची नावं इथं घेता येतील. सांगण्याचं तात्पर्य इतकंच की, मी राजकीय अग्रलेख लिहिले तरी त्यातलं लालित्य कधी हरवू दिलं नाही. त्यामुळे ते जनसामान्यांना भावले.
गुळगुळीत कागदावर बुळबुळीत मजकूर छापून लोकांचे रंजन करणे हे काही वृत्तपत्राचे मुख्य कर्तव्य नव्हे, असे लोकमान्य टिळकांनी म्हटले आहे. वृत्तपत्राचे उद्दिष्ट्य हेच असले पाहिजे यात शंका नाही. साहित्य हा समाजाचा आरसा मानला जातो आणि वृत्तपत्र हा तर समाजाचा आरसा असतोच असतो. या दोन्ही आरशात समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. वृत्तपत्रीय लिखाण व साहित्य यात म्हटलं तर फार फार फरक आहे. म्हटलं तर खूप खूप साम्य आहे. वास्तववादी लेखक व पत्रकार यात तसा फरक नसतोच. वास्तववादी लेखकात पत्रकारितेची बीजे असतात. आणि पत्रकारितेतही चांगल्या लेखकाची बीजे असतात. केवळ बातम्या देणे ही पत्रकारिता नव्हे, तर समाजाचा सर्वांगीण विचार करून त्यावर भाष्य करणे हा पत्रकारितेचा गाभा आहे. मी पहिला अग्रलेख सीमाप्रश्नाशी संबंधित कन्नडिंग गुंडांवर लिहिला. त्यानंतर असंख्य अग्रलेख लिहिले तरी त्यातल्या वास्तवता व लालित्यामुळे ते जनतेचा आवाज झाले. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकले. मी सुरुवातीपासून घेतलेल्या या दक्षतेमुळेही ‘पुढारी’च्या गरुडभरारीला मोलाचे बळ मिळाले. लोकांना माझा आक्रमकपणा भावला. माझी भूमिका जनतेच्या हृदयात उतरली. सोबत माझं स्वयंभूपणही होतं. तेही जनतेच्या चर्चेचा विषय ठरलं. मी कोणत्याही पक्षाच्या दावणीला बांधून घेतलं नाही, त्याचं आजही लोकांना आश्चर्य वाटतं. मी आखलेल्या माझ्या स्वतंत्र मार्गावरूनच माझी वाटचाल होत राहिली व तीच माझ्या ‘पुढारी’च्या यशाचा गमक ठरली.

‘निर्णयसागर’मुळे कार्याला तत्कालिक खीळ

माझं लग्न 1974 साली झालं व ‘निर्णयसागर’ या 150 वर्षे जुन्या संस्थेचा कार्यभार सांभाळण्यासाठी मला मुंबईस प्रस्थान करावं लागलं. ‘निर्णयसागर’चा निर्णय मला नाईलाजाने घ्यावा लागला होता. ‘पुढारी’च्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होणे अपरिहार्य होते व तसा तो झालाही. 1975 ते जवळ जवळ 1981 पर्यंत मी पूर्णपणे मुंबईकर झालो व त्यामुळे ‘पुढारी’कडे अक्षम्य दुर्लक्ष झाले व ती पोकळी भरून काढण्यासाठीही मला अविरत झुंजावे लागले.

‘निर्णयसागर’च्या व्यापात मी मुंबईत अडकून पडलो होतो आणि दुसर्‍या बाजूला आमचे व्यावसायिक प्रतिस्पर्धी कोल्हापुरातील माझ्या अनुपस्थितीचा फायदा उठवण्याच्या तयारीला लागले होते! अन् दुर्दैवानं मला त्याची गंधवार्ताही नव्हती. परंतु, अशा गोष्टी फार काळ लपून राहात नाहीत. एकदा मी पुण्यात असताना ‘सकाळ’चे संपादक मुणगेकरांची भेट झाली. मुणगेकर हे माझे चांगले मित्र. गप्पांच्या ओघात त्यांनी मला ‘सकाळ’ कोल्हापूर आवृत्ती सुरू करणार असल्याचे सांगितले; पण मी ‘निर्णयसागर’च्या व्यापात इतका गुंतलो गेलो होतो की, मला त्यांच्या बातमीचा फार उपयोग झाला नाही. मी ‘पुढारी’ची सूत्रे कोल्हापुरातील कर्मचार्‍यांच्यावर सोपवून मुंबईतच थांबलो. निर्णयसागरच्या व्यापातून थोडीफार उसंत मिळताच मी कोल्हापुरात आलो. दरम्यान, 1981 मध्ये रोजी कोल्हापूरमध्ये ‘सकाळ’ सुरू करण्यात आला. ‘सकाळ’ सुरू झाल्यानंतर तीन महिन्यांनी मी कोल्हापुरात पाय ठेवला. आणि सर्व सूत्रे पुन्हा हाती घेतली.

कोल्हापुरात पाऊल ठेवताच मी ‘पुढारी’ची सर्व सूत्रे पुन्हा एकदा हाती घेतली. खरं तर वृत्तपत्र व्यवसायावर माझी पहिल्यापासूनच जबरदस्त पकड. ‘निर्णयसागर’मुळे ती जरी थोडीशी ढिली पडली असली, तरी पुन्हा एकदा मी माझी पकड पहिल्यापेक्षाही अधिक घट्ट केली. व्यवसायामध्ये येणार्‍या आव्हानांची चाहूल मला नेहमीच सर्वात आधी लागत आलेली आहे. काही काही माणसांकडे ‘सिक्स्थ सेन्स’ असतो, असं म्हणतात; पण माझ्याकडे ‘सेव्हन्थ सेन्स’ आहे, असं मी नेहमीच विनोदानं म्हणतो. परंतु, त्यातही तथ्यच नव्हे, तर त्याची प्रचितीही मला आलेली आहे.

मी मुंबईहून परतल्यानंतर पहिल्या दिवशीच ‘पुढारी’त बदल दिसून आला. ‘पुढारी’ची पानं आठ झाली. शेवटच्या पानावर सिनेमाच्या जाहिराती असत, त्या आतील पानात गेल्या. शेवटच्या पानावर क्रीडा वृत्त ठळकपणे येऊ लागले. मी विशेष वृत्त आणि स्पेशल रिपोर्ट या संकल्पना प्रथमच सुरू केल्या. त्यामुळे वाचकांनाही काही नवे आणि आगळेवेगळे वाचायला मिळत आहे, याची जाणीव झाली. त्या काळात राजकीय आणि सामाजिक घडामोडींना वेग आलेला होता. त्याचं आक्रमक वृत्त ‘धडाकेबाज’ पद्धतीनं येऊ लागलं.

याच काळात ‘पुढारी’चे मुंबई आणि दिल्लीसह ठिकठिकाणी बातमीदार तसेच प्रतिनिधी यांचं व्यापक जाळं उभारलं गेलं. आकर्षक फोटोसह उठावदार लेआऊट व्हावा, यासाठी मी स्वतः डोळ्यात तेल घालून कामात लक्ष घालू लागलो. आक्रमक मथळ्यांनी ‘पुढारी’चं वेगळेपण वाचकांच्या डोळ्यात भरू लागलं.

अंक वाचनीय झाल्यामुळे अवघ्या सहा महिन्यांतच त्याचा खप पूर्वीपेक्षा अधिकच वाढला. ‘पुढारी’त मी पूर्ण लक्ष घातल्यामुळे ‘पुढारी’नं कात टाकली आणि पुढील 8-10 वर्षे कटाक्षानं अंकात, छपाईत, लेआऊटमध्ये सातत्यानं सुधारणा आणि बदल करीत गेल्यामुळे ‘पुढारी’ची उत्तरोत्तर प्रगतीच होत गेली.

जॉर्ज बर्नाड शॉ या आंग्ल साहित्यिकाचं एक सुप्रसिद्ध ‘कोटेशन’ माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं आहे.

“Progress is impossible without changes, and those who cannot change their minds cannot change anything.”

काळ बदलतो. बदल हा स्थायीभावच आहे आणि म्हणूनच मी नेहमीच काळाची पावलं ओळखून बदल घडवत गेलो. त्यामुळेच माझी स्वप्नपूर्ती होत गेली. कोल्हापुरात आपण सहज शिरकाव करू, अशा मनसुब्यानं आलेल्या ‘सकाळ’चं ‘पुढारी’पुढे काहीही चाललं नाही. ‘पुढारी’ धु्रवाप्रमाणे अढळ राहिला. आजही या सत्याची प्रचिती येते.

कठीण परिश्रमास पर्याय नाही :

हा वाक्यप्रचार इंदिरा गांधी यांनी 1975 च्या सुमारास प्रचलित केला; पण त्या आधी काही वर्षांपासून मला कठीण आणि अथक परिश्रमाचं जणू वेडच लागलं होतं. ऐंशीच्या दशकातील गोष्ट. ‘पुढारी’च्या सुबक छपाईसाठी आणलेल्या बंधू ऑफसेट मशिनमध्ये बिघाड व्हायचा. त्याची दुरुस्ती व्हायची नाही. त्याचा परिणाम छपाईवर होण्याची दाट शक्यता असायची. पहाटे चारच्या सुमाराला छपाई संपल्यावर दुरुस्ती सुरू होई.

त्यावेळचा माझा दिनक्रम हा ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असाच होता. सकाळी ठीक 10 वाजता मी फियाटमधून कार्यालयात येई. त्यानंतर मी सर्व विभागाच्या कामाकाजाचा आढावा घेत असे. मग दुपारी दोन-अडीचला घरी जाऊन मी लगेच पाच वाजता परत येई आणि पुन्हा कामाला जुंपून घेत असे. तिथून थेट पहिलं पान पूर्ण होईपर्यंत म्हणजे रात्री बारा-एकपर्यंत माझं त्यावर पूर्ण लक्ष असे. त्यानंतर पुन्हा रात्रीच्या जेवणासाठी म्हणून केवळ अर्धा-एक तास घरी जाई. छपाई साधारणपणे साडेबारा-एक वाजता सुरू व्हायची. मग छपाई व्यवस्थित होते की नाही, यावर माझं लक्ष असायचं. आवश्यक तिथं प्रिंटरना सूचना देत असे.

मग एकदाची छपाई संपली की, पुन्हा मशिन दुरुस्तीकडे लक्ष द्यावं लागे. म्हणजे जवळजवळ अठरा तास तेव्हा मी काम करीत असे. एवढं काम करूनही कसला तो थकवा मला ठाऊक नव्हता. ‘वर्क इज वर्शिप’ (Work is worship) अशी एक इंग्रजी उक्ती आहे. या उक्तीवर माझी पहिल्यापासूनच नितांत श्रद्धा आहे आणि माझं आचरणही तद्वतच आहे.

अचूकता, काटेकोरपणा नि सचोटी : यशाची त्रिसूत्री

‘पुढारी’ नंबर वन झाला पाहिजे, नंबर वनवर कायम राहिला पाहिजे, हाच माझा ध्यास होता आणि आहे. उद्योगपती आणि बडे भांडवलदार यांची वृत्तपत्रे आर्थिक ताकदीच्या बळावर मुसंडी मारतात. तसेच, राजकारण्यांच्या वृत्तपत्रांना त्यांच्या पक्षांचा, सत्तेचा आधार मिळत असतो. ‘पुढारी’कडे ना राजकीय सत्ता, ना आर्थिक पाठबळ! परंतु, आर्थिक आणि राजकीय पाठबळ नसतानाही, केवळ बुद्धिमत्ता आणि प्रचंड आत्मविश्वास, त्याचबरोबर दूरद़ृष्टी यांच्या जोरावर मी ‘पुढारी’चा विस्तार केला. बड्या आणि साखळी वृत्तपत्रांना यशस्वीपणे टक्कर देऊ शकलो. त्याचबरोबर राजकीय व सामाजिक क्षेत्रातही ‘पुढारी’चा दबदबा निर्माण केला. मुंबई-पुणे येथून कोल्हापूरसारख्या जिल्हा वृत्तपत्रांवर होणारे आक्रमण थांबवून मी प्रवाहाविरुद्ध पोहत पुणे-मुंबईत मुसंडी मारली.

कोल्हापुरी भाषेतच सांगायचं झालं, तर साखळी वृत्तपत्रांना अगदी चितपट केलं. त्यासाठी मी गुणवत्ता आणि दर्जा यांची कास धरली. योग्य, धगधगत्या आणि ऐरणीवरच्या विषयांची निवड करून मी चांगले आक्रमक अग्रलेख आणि आणि संपादक मंडळातून खास लेख लिहून घेतले. अचूकपणा, काटेकोरपणा जपला. एक-एक बातमी दहा-दहा वेळा दुरुस्त करून घेतली. मथळा देताना किती तरी वेळा बदल केले. बातमीमध्ये अचूकपणा येण्यासाठी बातमीतील संदर्भ बारकाईनं तपासण्याचे आदेश दिले आणि ते अंमलातही आणले.

संपादन विभागाच्या वारंवार बैठका घेऊन बातम्यांबद्दल वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केलं. चुकलेल्या बातम्यांची झाडाझडती घेतली. त्यामुळे संपादन विभाग कायम जागरूक राहिला. गुणवत्ता, दर्जा आणि अचूकपणा यातून ‘पुढारी’ची वाचनीयता वाढली. त्यामुळेच प्रतिस्पर्धी वृत्तपत्रांवर मात करणे शक्य झालं.

या व्यवसायात मनापासून झोकून देणार्‍या आणि कष्ट करणार्‍या पत्रकारास ‘हाडाचा पत्रकार’ अशी उपाधी लावली जाते. त्याचा विचार केला तर मी नुसता हाडाचा पत्रकार नाही, तर रक्ता-मांसाचासुद्धा पत्रकार आणि संपादकही आहे, हे अहंभावाचा दोष पत्करूनही म्हणावंसं वाटतं! कारण, पत्रकारितेचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळालेलं आहे. ‘These are my salad days’ असं शेक्सपियरच्या ‘अँटनी अँड क्लिओपात्रा’ या नाटकातील वाक्य आहे. त्याचा विचार करता मी बालपणापासून पत्रकारितेचे धडे गिरवले होते. खरं सांगायचं तर वृत्तपत्राच्या शाईचा गंध माझ्या रोमारोमात भिनला आहे. माझ्यासाठी तोच सर्वोत्कृष्ट परफ्यूम आहे. वृत्तपत्राच्या सर्व अंगांची मला खडान्खडा माहिती. शिवाय त्यावर भक्कम पकडही. शिवाय ‘बिटविन द लाईन’ वाचण्याचं अवधान मला जात्याच आहे. या सार्‍या गुण समुच्चयाचं प्रतिबिंब ‘पुढारी’च्या दैनंदिन कामकाजात उमटलं नाही तरच नवल!

सकाळी सातच्या आधीच माझा दिवस सुरू होत असतो. एका बाजूला ‘पुढारी’चं संपूर्ण वाचन करीत असतानाच इतर वर्तमानपत्रांचंही वाचन चालू असतं. त्यातून चुकलेल्या बातम्या कोणत्या आहेत, आपल्याकडच्या बातम्यांत काही उणीव राहिलीय का, फोटोंची निवड बरोबर झाली आहे का, या सर्व गोष्टी मी बारकाईनं पाहतो. त्याचवेळी दुसर्‍या बाजूला वितरण विभागाच्या अहवालाचीही तपासणी चालू असते. पार्सल टॅक्सी वेळेवर पोहोचली का, अंकाची छपाई वेळेत झाली की नाही, झाली नसेल तर नेमकी काय अडचण आली, या सर्व गोष्टींचीही मी सांगोपांग माहिती घेत असतो आणि त्यानुसार योग्य ते आदेश देणं चालू असतं. हा माझा एक दिवसाचा नव्हे, एक महिन्याचा नव्हे, एक वर्षाचाही नव्हे, तर वर्षानुवर्षांचा अखंड कार्यक्रम चालू आहे.

टेक केअर टू गेट व्हॉट यू लाईक :

Take care to get what you like or you will be forced to like what you get

‘तुम्हाला जे हवंय ते मिळवण्याची वेळीच दक्षता घ्या, अन्यथा तुम्हाला जे नकोय तेच तुमच्यावर लादलं जाईल आणि मग तुम्हाला ते गोड मानून घ्यावं लागेल.’

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनीच सांगितलेलं हे एक महत्त्वाचं जीवनसूत्र आहे आणि या जीवन सूत्राप्रमाणेच मी नेहमीच माझ्या भूमिकेबाबत चोखंदळ राहिलो आहे. जे मला करायचं असतं, त्याचा मी अगदी हिरिरीनं अंगीकार करीत असतो. मी कधीही परिस्थितीपुढे शरण गेलो नाही किंवा जे समोर दिसतंय त्याच्याशी जुळवूनही घेतलं नाही. म्हणूनच मी माझा होल्ड निर्माण करू शकलो.

मी ‘पुढारी’ची सूत्रं हाती घेतल्यानंतर शांताराम बोकील, दत्ता सराफ, जगन फडणीस, ह. मो. मराठे, चंद्रकांत घोरपडे आदी सव्यसाची पत्रकारांनी माझ्याबरोबर ‘पुढारी’त काम केलं. संपादन विभागाप्रमाणेच जाहिरात विभाग, वितरण विभाग आणि प्रशासनावरही माझी जबरदस्त पकड आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रापासून गोवा आणि कर्नाटकातील कितीतरी कार्यालये आणि कर्मचार्‍यांच्या कामकाजावर माझं घारीसारखं लक्ष असतं. ‘रामरंगी रंगले मन’ या प्रसिद्ध अभंगाप्रमाणे ‘वृत्तरंगी रंगले मन’ हा माझा स्थायीभावच आहे.

लेआऊट हेच आकर्षण :

‘लेआऊट’ हा शब्द इंग्रजी वृत्तपत्रांसाठी नवा नसला, तरी भाषिक वृत्तपत्रांसाठी मात्र हे दालन नवंच होतं. लेआऊटसंबंधीच्या म्हणजे मजकूर आणि फोटोसंबंधीच्या, त्यांच्या आकर्षक मांडणीसंदर्भात मी अनेक पुस्तकांचा आणि परदेशी ग्रंथांचा अभ्यास केला होता. सत्तरच्या दशकात जेव्हा मी ‘पुढारी’त कामकाज सुरू केलं, तेव्हाचा वृत्तपत्रांचा लेआऊट हा अगदी पारंपरिक आणि सरधोपट होता. मी पुण्यात शिक्षण घेत असताना सकाळ, केसरी, तरुण भारत ही वृत्तपत्रे जवळून बघत असे.

नानासाहेब परुळेकर कोणत्याही बातमीचे हेडिंग मोठे देत नसत. अगदी दोन कॉलम म्हणणेही मोठे असे समीकरण होते. लहान टाईपातील मथळे, दोन कॉलमचे फोटो, एकाखाली एक अशा लावलेल्या बातम्या, असा सगळा सबगोलंकार प्रकार असे. मी पहिल्यांदा ही सरधोपट परंपरा मोडीत काढली. माझ्या कल्पकतेनं आणि सर्जकतेनं, लेआऊट हे वृत्तपत्राचं महत्त्वाचं अंग आहे, हे मी दाखवून दिलं. त्या काळी सिक्सलाईन म्हणजे 72 पॉईंटचा टाईप क्वचितच वापरला जाई. तीन कॉलम फोटोही फारसे वापरले जात नसत. मी ठळक मथळे आणि फोटो वापरून ‘पुढारी’चं रूप आकर्षक केलं. गुणवत्ता, दर्जा आणि अचूकपणाला आता आकर्षकतेचं कोंदणही लाभलं होतं. तुमच्या कामाची पोचपावती जेव्हा दुसर्‍याकडूनच मिळते, तेव्हा तिथं अभिमानाने ऊर भरून येतो.

‘भाषिक वृत्तपत्रासंदर्भात प्रतापसिंह जाधव हेच ‘लेआऊट’चे उद्गाते आहेत,’ अशा शब्दांत ‘लोकसत्ता’चे संपादक माधव गडकरी यांनी माझ्या कार्याचा सन्मान केला होता. ही माझ्या वृत्तपत्र क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल मिळालेली पोचपावतीच होती. मोठ्या आकारात फोटो छापणं तसेच रंगीत फोटो छापणं, यासारखे तांत्रिक बदल करून मी ‘फोटो जर्नालिझम’ हा प्रकार लोकप्रिय केला. त्यानंतरच मग इतरांनी त्याचं अनुकरण केलं. मी जे-जे काही नवीन उपक्रम सुरू केले, त्याची पुढे सर्वांनी नक्कल केली, ही वस्तुस्थिती आहे.

आधुनिक तंत्राचा सर्वोत्तम वापर :

फोटो जर्नालिझममधील माझं महत्त्वाचं पाऊल म्हणजे इंटरनेटचा वापर होय. मुळात अत्याधुनिक तंत्राचं मला जबरदस्त आकर्षण. त्यामुळेच फोटो कम्पोज तंत्राच्या पुढे जाऊन अद्ययावत संगणक यंत्रणा मी ‘पुढारी’त आणलीच होती. 1997-98 च्या काळात नुकतंच इंटरनेटचं वारं वाहू लागलं होतं. या प्रणालीचा फायदा करून घेऊन वेगवेगळ्या घडामोडींचे फोटो त्वरित मिळवता येतील, हा माझा द़ृष्टिकोन होता.

ए. पी. फोटो सर्व्हिस :

नव्याचा शोध ही माझी जन्मजात सवय आहे. त्यामुळेच मी इंटरनेट तंत्रापाठोपाठ असोसिएट प्रेस (ए.पी.) या संस्थेशी संपर्क साधला. उपग्रहामार्फत त्वरित रंगीत फोटो पाठवण्याचं तंत्र तेव्हा नुकतंच सुरू झालं होतं. ही ए. पी. संस्था असे फोटो घेऊन उपग्रहामार्फत पाठवीत असे. या संस्थेशीच मी थेट करार केला आणि ए. पी. फोटो सर्व्हिस सुरू झाली. अभिमानाची गोष्ट म्हणजे ही फोटोसेवा प्रारंभी फक्त ‘पुढारी’ आणि ‘हिंदू’कडेच होती. नंतर मग ती इतरांनी घेतली.

पुढचं पाऊल काळाबरोबर :

नवनवीन तंत्राचा सर्वप्रथम स्वीकार करणं, हा माझा स्थायीभाव आहे. 1972 साली त्यावेळचे आधुनिक रोटरी मशिन मी आणलं होतं. त्यानंतर 1987 सालच्या मार्च महिन्यात मी त्या काळातील सर्वात आधुनिक असं ऑफसेट कोरोसेट हे छपाई मशिन आणलं. दोन्ही वेळेला ‘पुढारी’च्या खपात मोठी वाढ झाली. फोर कलर छपाईसाठी अशा अद्ययावत मशिनची आवश्यकता होतीच. त्यावेळी संपूर्ण भारतात अशा पद्धतीची छपाई मशिन अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच होती.

अलीकडच्या काळातील सिटीलाईन, हायलाईन या छपाई मशिन ‘पुढारी’त दाखल झालेल्या आहेत. काळाबरोबर ‘पुढारी’चीही वाटचाल कायम राहील, याची मी नेहमीच दक्षता घेत आलो आहे.

फार पूर्वी रविवारी ‘पुढारी’ची केवळ ‘रविवार विशेष’ अशी कृष्णधवल पुरवणी असायची. 1988 पासून मात्र मी रविवारची रंगीत ‘बहार’ पुरवणी सुरू केली. त्यामुळे वाचकांच्या हाती ज्ञान-मनोरंजन-विश्लेषण यांचा खजिनाच आला. नामवंत साहित्यिक विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ विश्लेषक आणि समीक्षक अशा मान्यवरांचं दर्जेदार आणि वाचनीच लिखाण ‘बहार’चं वैशिष्ट्यच ठरून गेलं. तसेच ‘बहार’च्या आधीपासूनच 14 ऑगस्ट, 1987 पासून ‘सोनेरी’ ही टॅब्लॉईड आकारातील सुरू केलेली रंगीत चित्रपट पुरवणी लक्ष्यवेधी ठरलेली होती.

शिवाय विज्ञान, चमत्कृतीजन्य, थरारक गुन्हेगारी कथा अशा वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली ‘भरारी’ ही पुरवणी 16 जानेवारी 1997 पासून वाचकांच्या सेवेत रुजू झाली होती. तसेच 13 एप्रिल 2002 पासून बालगोपालांसाठी सुरू केलेली ‘अंकुर’ ही पुरवणीही बच्चेमंडळींना मनापासून आवडली. दरम्यानच्या काळात सुरू करण्यात आलेली ‘आरोग्य’ ही एका पानाची पुरवणीही लक्ष्यवेधी ठरली. पुढे हीच पुरवणी 19 नोव्हेंबर 2006 पासून टॅब्लॉईड आकारात आठ पानांची सुरू करण्यात आली.

मग केवळ महिलांसाठीच असलेली ‘कस्तुरी’ ही पुरवणी 4 ऑक्टोबर, 2002 पासून सुरू केली. ‘बहार’सह इतर सर्वच पुरवण्यांबाबत मान्यवरांचे आणि असंख्य वाचकांचेही मला दूरध्वनी येत असत. त्यांनी माझं अभिनंदन करून या नवनवीन प्रयोगाबाबत समाधान व्यक्त केलं. अर्थात, ‘पुढारी’चा वाढता खप पाहून वाचकांच्या पसंतीला ‘पुढारी’ उतरत आहे, याची प्रचिती आम्हाला वेळोवेळी येतच होती. ‘पुढारी’चं हे यश पाहून मग इतरांनीही त्याची नक्कल करायला सुरुवात केली, ही गोष्ट वेगळी!

sinhayan@pudhari.co.in

 

 

Back to top button