सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रातील मोदी सरकारच्या आर्थिक अडवणुकीमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. साहजिकच केंद्र सरकारच्या धोरणांचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे, असा आरोप राज्याचे कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केला.
येथील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या पदाधिकार्यांसमवेत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक ही लोकसभा, विधानसभा निवडणुकांची नांदी आहे. त्यामुळे भाजपविरोधातील रोषाचा फायदा उठवा. त्यासाठी जोमाने तयारी करा, अशा सूचना त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्या.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, नगरसेवक बाबा मिस्त्री, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, महापालिका गटनेते चेतन नरोटे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, करमाळ्याचे नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, मोहोळच्या नगराध्यक्षा शाहीन शेख, नगरसेवक शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, नगरसेविका अनुराधा काटकर, परवीन इनामदार, वैष्णवी करगुळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कदम म्हणाले, केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आज शेतकरी अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी वर्षभर आंदोलन करीत आहेत. त्यांच्याशी साधी चर्चासुद्धा करायला सरकार तयार नाही.
ते म्हणाले, राज्यात भाजप सरकारच्या कार्यकाळात ऊर्जा खात्यात चाळीस हजार कोटी रुपयांची तूट वाढली होती. ती भरून काढतानाच राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचे वीज खंडित न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतीमालाचे उत्पादन वाढल्यामुळे किमतीवर परिणाम झाला आहे. पण महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांबरोबर आहे.
कदम म्हणाले, गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे राज्य शासनाचे उत्पन्न कमी झाले आहे. केंद्रातील मोदी सरकारने तीस हजार कोटींची जीएसटीची रक्कम राज्य सरकारला दिली नाही. त्यामुळे आज महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारने लॉकडाऊन केले. त्यामुळे कोट्यवधी लोक रस्त्यावर भुकेने व्याकुळ होत चालत गावी गेले. महाराष्ट्राला जाणीवपूर्वक लसी, रेमडेसिविर, औषधांचा पुरवठा कमी केला. पण महाविकास आघाडी सरकारने धाडसी पाऊल टाकत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणल्याचे कदम यांनी सांगितले.
यावेळी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी महापौर नलिनी चंदेले, आरिफ शेख, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, गणेश डोंगरे, प्रदेश चिटणीस नरसिंह असादे, किसन मेकाले आदी उपस्थित होते.