कोल्हापूर : दान मूर्ती मनपा विसर्जन करणार | पुढारी

कोल्हापूर : दान मूर्ती मनपा विसर्जन करणार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक तरुण मंडळांनी गणेशमूर्ती दान कराव्यात. महापालिकेच्या वतीने संबंधित ठिकाणी टेम्पो पाठवून दान केलेल्या गणेशमूर्तींचे इराणी खणीत विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका यंत्रणा सज्ज आहे.

सार्वजनिक तरुण मंडळांनी मूर्ती दान केल्यास संबंधित मंडळाची मूर्ती नेण्यासाठी महापालिकेतर्फे टेम्पो पाठविण्यात येणार आहे. टेम्पोतून मंडळाची दान मूर्ती इराणी खणीवर आणून विधिवत विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी 90 टेम्पोची सोय केली आहे. प्रत्येक टेम्पोत दोन हमाल असे एकूण 180 हमाल आणि इराणी खणीवर मूर्ती विसर्जनासाठी 80 हमाल नेमण्यात आले आहेत.

मंडळांचे कार्यकर्ते गणेशमूर्तीचे इराणी खणीत स्वतः विसर्जन करणार असल्यास फक्त पाच कार्यकर्त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. गणेशमूर्ती विसर्जनासाठी इराणी खणीत तराफे व रँपची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विद्युत व्यवस्थाही केली आहे. इराणी खण येथे महापालिका यंत्रणा सज्ज झाली आहे.

शहरात 24 ठिकाणी विसर्जन कुंड

महापालिकेमार्फत रविवारी (दि. 19) 10 दिवसांच्या घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरात 24 ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात आले आहेत. तांबट कमान, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, निकम पार्क, मैलखड्डा निर्माण चौक, जरगनगर कमानीसमोर, क्रशर चौक, पतौडी खण, शाहू सैनिक तरुण मंडळ (राज कपूर पुतळयाजवळ), तोरस्कर चौक, गंगावेश चौक, पंचगंगा नदी घाट, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, व्यापारी पेठ, कोटीतीर्थ तलाव, राजारामपुरी नववी गल्ली रेणुका मंदिर, राजाराम तलाव, राजारामपुरी गार्डन जगदाळे हॉल, टेंबलाई मंदिर, सायबर चौक, मनोरा हॉटेल पिछाडीस, सासने ग्राऊंड, नर्सरी बाग, दत्त मंदिर कसबा बावडा, प्रिन्स शिवाजी विद्यालय, जाधववाडी.

विसर्जन कुंडाची माहिती द्या : सामाजिक संस्थांना आवाहन

सामाजिक संस्था, विविध मंडळे, गृह निर्माण संस्था, स्वयंसेवी संस्था यांनी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंडाची व्यवस्था करायची असल्यास विभागीय कार्यालयास संपर्क साधावा. अनंत चतुर्दशी उत्सवादरम्यान संकलित झालेल्या गणेशमूर्तींची वाहतूक करून पर्यावरणपूरक विसर्जन करणे महापालिकेस सोयीस्कर होईल.

Back to top button