थेट नगराध्यक्षामुळे वाईत पुन्हा ‘काँटे की टक्‍कर’ | पुढारी

थेट नगराध्यक्षामुळे वाईत पुन्हा ‘काँटे की टक्‍कर’

वाई : धनंजय घोडके वाई नगरपालिकेच्या निवडणुकीला आता ओबीसी आरक्षणामुळे आणखी रंगत येणार असून शहरात ओबीसी प्रवर्गातून 6 नगरसेवक निवडून जाणार आहेत. गत पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा एका ओबीसी नगरसेवकाची संख्या वाढणार आहे. गतवेळी वाईतील थेट नगराध्यक्ष अवघ्या एका मताने निवडून आल्याच्या पार्श्‍वभूमीवर यावेळची थेट नगराध्यक्ष निवडही ‘काँटे की टक्‍कर’ होणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणावर शिक्‍कामोर्तब झाल्याने वाईतील राजकीय समीकरणेही बदलणार असून नगराध्यक्ष आरक्षणाकडे शहरवासियांच्या नजरा लागल्या आहेत. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्यानंतर वाई शहरातील ओबीसी बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आरक्षण नसल्याने निवडणुकीची संधी हुकल्याची धास्ती लागलेल्या ओबीसी प्रवर्गातील इच्छुकांनी न्यायालयाच्या निर्णयामुळे आता पुन्हा उसळी घेतली आहे. त्यामुळे वाईच्या राजकीय सारीपाटावरील हालचाली वेगावल्या आहेत. पक्षीय झेंडे की आघाड्यांमध्ये धुमशान होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी इच्छुकांनी आपापल्या परीने जोर बैठका सुरू केल्या आहेत. सध्या तरी वाईत राष्ट्रवादी समविचारींना बरोबर करण्याच्या विचारात आहे. भाजपा, काँगेस स्वबळाचा नारा देत पक्ष चिन्हावर लढण्याच्या विचारात आहे तर शिवसेनेचा सन्मानाने नारा आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडत आहे. मात्र, राज्यातील सत्ताबदल भाजपला तारणार का? हेही पहावे लागणार आहे. एकूणच कृष्णा तीरावर कसा रंगणार सामना, याची उत्सुकता वाई शहरात लागून राहिली आहे.

ओबीसी आरक्षण निश्‍चित झाल्यामुळे वाई नगरपालिकेसाठी यापूर्वी झालेली आरक्षण सोडत रद्द होणार असून आता पुन्हा नव्याने ही सोडत निघणार आहे. नगरपालिकेतील 23 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक हे ओबीसी प्रवर्गातील असणार आहेत. गतवर्षी पालिकेतील एकूण 20 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवक ओबीसी होते. यावर्षी एक प्रभाग वाढल्याने ओबीसी नगरसेवकांची संख्याही सहा होणार आहे.
वाई नगरपालिका निवडणुकीमुळे मकरंदआबा व मदनदादा यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सध्या वाई शहरासह संपूर्ण तालुक्यातील सर्व सत्तास्थानांवर राष्ट्रवादीची पकड मजबूत असल्याने राष्ट्रवादी विरुध्द विरोधी सर्वच पक्ष एकत्र आले तरच राष्ट्रवादी पुरस्कृत तीर्थक्षेत्र आघाडीला टक्कर देवू शकतात अन्यथा एकमेकांची उणीदुणी काढत बसल्यास कोणत्याही एका पक्षाला राष्ट्रवादीला हरवणे शक्य नाही.

सध्यातरी वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांचा वरचष्मा दिसत आहे. भाजपचे मदनदादा भोसले यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. मदनदादा यांची कन्या सुरभि भोसले राजकीय कार्यक्रमात सक्रीय झाल्याने वाई नगरपालिकेच्यानिमित्ताने त्यांची थेट एन्ट्री होणार का? याचीही उत्सुकता त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे. काँग्रेसचे विराज शिंदे व शिवसेना एकत्र आल्यास निवडणुकीत टक्कर पहायला मिळणार असून एकंदरीत वाई नगरपालिकेची निवडणूक ही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

तीन नगरसेवक वाढले…

गतवेळी 10 प्रभागातून 20 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी नगरपालिकेतील 11 प्रभागातून 23 सदस्य असणार आहेत. त्यातही महिलांना जास्त जागा मिळाल्याने वाई पालिकेवर महिला राज येण्याची शक्यता आहे.

असे होते गतवेळचे बलाबल…

सन 2016 साली झालेल्या निवडणुकीत आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र विकास आघाडीने 14 जागा जिंकत बहुमत मिळवले तर दोन स्वीकृत नगरसेवक अशी त्यांची संख्या 16 झाली होती. भाजपचे वाई विकास महाआघाडीच्या माध्यमातून 6 नगरसेवक निवडून आले होते. भाजपच्या डॉ. प्रतिभा शिंदे यांनी थेट नगराध्यक्षा निवडणुकीत एका मताने सरशी करत बाजी मारली होती.

Back to top button