कराड : भोंग्यांच्या परवान्यासाठी धावाधाव! | पुढारी

कराड : भोंग्यांच्या परवान्यासाठी धावाधाव!

कराड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे बंद केले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिल्यानंतर मशिदींसह मंदिरांवर असलेल्या लाऊडस्पीकर परवण्यासाठी पळापळ सुरू झाली आहे. यामध्ये न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार्‍यांना व पोलिसांच्या निकषात बसणार्‍यांनाच स्पीकर परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे आता मंदिर व मशिदींवरील स्पीकरच्या अधिकृत परवान्यासाठी पदाधिकार्‍यांची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांच्या इशार्‍यानंतर संपूर्ण राज्यभर मनसेने आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने मंदिरांसह मशिदींवर असलेल्या लाऊडस्पीकर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची सर्वांनाच आठवण झाली. त्यानुसार मग न्यायालयाच्या आदेशात नेमके काय म्हटले आहे? स्पीकर लावत असताना कोणते निकष आहेत? ते निकष पाळून मंदिर व मशीदींवर लाऊडस्पीकर लावता येईल काय? त्याच्या वेळा काय असतील? याबाबत माहिती घेण्यासाठी अनेकांची पळापळ सुरू झाली. त्यातच मंदिर किंवा मशिदींवर लाऊडस्पीकर लावत असताना परवाना घेणे गरजेचे असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.

परवाना देत असताना त्यामध्ये कोणते निकष असावेत? याचेही वरिष्ठांकडून पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. तर त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मंदिरांचे ट्रस्टी, समितीचे पदाधिकारी, मशिदींचे मौलाना यांच्याबरोबर बैठक घेऊन पोलीस अधिकार्‍यांनी चर्चा केली. यावेळी लवकरात लवकर परवाना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

त्यानुसार मग आता पदाधिकार्‍यांची स्पीकर परवाण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. गत दोन दिवसांत कराड शहर व तालुक्यात तसेच उंब्रज पोलीस ठाण्याअंतर्गत लाऊडस्पीकर परवान्यासाठी 37 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची खातरजमा करून पुढील कार्यवाहीसाठी ते अर्ज उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडे पाठवले जाणार आहेत.

स्पीकर परवान्यासाठी द्यावयाची कागदपत्रे…

मंदिर, मस्जिद, दर्गा किंवा चर्च याठिकाणी स्पीकर परवान्यासाठी अर्ज करत असताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत पोलिसांकडून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नावे अर्ज, जेथे स्पीकर लावायचा आहे त्या मंदिर किंवा मशिदीचा सातबारा किंवा आठ अ चा उतारा, धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असल्याबाबतचा दाखला, संचालक, सदस्य, ट्रस्टी, मौलाना यांची नावे, पत्ता व मोबाईल नंबरची यादी, कशासाठी स्पीकर परवाना वापरणार आहात याबाबतचा खुलासा, ज्या स्थळाचा स्पीकर परवाना मागितला आहे त्याबाबत कोर्टात किंवा इतर कोणताही वाद नसल्याबाबतचा खुलासा व ध्वनी प्रदूषण कायद्यान्वये स्पीकर परवाना वापरण्यात येईल याबाबतचे हमीपत्र देणे गरजेचे आहे.

…तर यांनाही घ्यावा लागणार स्पीकर परवाना

कराड शहर पोलिसांकडे 129 मंदिरे तर 39 मशिदी तसेच कराड तालुका पोलिसांकडे 145 मंदिरे व 34 मशिदींची नोंद आहे. या शिवाय असणारी मंदिरे किंवा मशीदींवर यात्रा, जत्रा सण-उत्सव यासह इतर कोणत्याही कारणाने एक-दोन दिवस असो किंवा कितीही दिवस लाऊडस्पीकर लावायचा असल्यास त्यालाही पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.

Back to top button