सातारा : न्यायाधीशांच्या भावावर शाहूनगरात खुनी हल्ला | पुढारी

सातारा : न्यायाधीशांच्या भावावर शाहूनगरात खुनी हल्ला

सातारा : पुढारी वृत्तसेवा
कारने जात असताना रस्त्यावरून बाजूला व्हा, असे म्हटल्याच्या कारणातून चिडलेल्या युवकांच्या टोळक्याने शाहूनगर, सातारा येथे वकिलावर प्राणघातक हल्‍ला करून त्यांच्या वाहनाची तोडफोड केल्याची घटना घडली. जखमी वकिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, जखमी वकिलाचे बंधू न्यायाधीश असून त्यांच्याच भावावर खुनी हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.
अ‍ॅड. राम खारकर (वय 38, रा. शाहूनगर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वकिलाचे नाव असून त्यांनी अज्ञात 6 जणांविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान, त्यांचे बंधू अमिम खारकर हे न्यायाधीश आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार राम खारकर हे दि. 12 रोजी रात्री 10.30 वाजता कारमधून (एम. एच. 11 डीके 0016) घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे 5 ते 6 युवक थांबलेले होते. संबंधितांना ‘रस्त्यावरून बाजूला जावा’, असे म्हटल्यानंतर संशयित युवकांनी तक्रारदार यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. तक्रारदार कार बाजूला घेऊन पुढे गेले मात्र संशयित टोळक्याने त्यांचा पाठलाग केला. यावेळी संशयितांनी रॉडने कारची काच फोडली. तक्रारदार यांना खाली उतरवून त्यांना पुन्हा रॉडने मारहाण केली. या हल्ल्यात वकिलांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. मारहाण झाल्याने तक्रारदार यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. नागरिक घटनास्थळी येवू लागल्यानंतर हल्‍लेखोर तेथून पसार झाले.

यावेळी गंभीर जखमी अवस्थेत खारकर यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. डोळ्याला गंभीर दुखापत असल्याने पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तक्रारदार यांचा जबाब घेतला आहे. पोलिस संशयितांची माहिती घेवून तपास करत आहेत.

हेही वाचलत का ?

 

Back to top button