सांगली : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न | पुढारी

सांगली : अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न

सांगली पुढारी वृत्तसेवा : येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने लग्न करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवून तिला अपत्यास जन्म द्यायला भाग पाडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी संशयित मल्हारी महादेव बडची (वय 24, रा. ऐगळी, ता. अथणी, जि. बेळगाव) याच्या विरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कर्नाटकातील ऐगळी येथील संशयित मल्हारी हा कामानिमित्त येथे सातत्याने येत होता. सांगलीत उपनगरातील एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याची ओळख झाली. दि. 12 डिसेंबर 2019 ते 31 डिसेंबर 2021 या काळात मल्हारी याने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढविली.

मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही त्याने तिला लग्नासाठी अथणी येथे बोलवून घेतले. तिची 18 वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच तिच्याशी जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.

मुलगी गर्भवती राहून तिने अपत्यास जन्म दिला.

मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्यावतीने महिला पोलिस उपनिरीक्षकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मल्हारीविरोधात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

  • कर्नाटकच्या युवकावर गुन्हा; संबंध ठेवून अपत्य जन्मास भाग पाडले

डॉक्टरांमुळे प्रकार चव्हाट्यावर

अल्पवयीन असतानाही दोघांनी पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर संबंधित मुलगी गरोदर राहिली. बाळंतपणासाठी तिला येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी जन्म तारीख सांगितल्याने ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी चौकशी करून बडची याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

हेही वाचा

Back to top button