Ukraine Russia War : युक्रेनच्या तळावर रशियाचा हल्ला; 35 जणांचा मृत्यू | पुढारी

Ukraine Russia War : युक्रेनच्या तळावर रशियाचा हल्ला; 35 जणांचा मृत्यू

ल्वीव ; वृत्तसंस्था : रशियाने रविवारी पोलंड सीमेवर असलेल्या युक्रेनच्या (Ukraine Russia War) लष्करी तळावर एअरस्ट्राईक केला. या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 134 जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या स्थानिक गव्हर्नर आणि संरक्षण मंत्र्यानेही या हल्ल्यास दुजोरा दिला आहे.

दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात रशियाने आता आपला मोर्चा पश्चिम युक्रेेनकडे वळविला आहे. रशियाने विविध शहरांवर बॉम्बचा वर्षाव सुरूच ठेवला. पश्चिम युक्रेनमधील ल्वीव शहरानजीक असलेल्या लष्करी तळावर युक्रेनच्या सैनिकांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी अमेरिकेकडून 2015 पासून प्रशिक्षक पाठवले जातात.

शिवाय नाटोही यापूर्वी या भागात लष्करी सराव केला आहे. ल्वीवचे गव्हर्नर मॅक्सिम कोझित्स्की यांनी सांगितले की, रशियाने यावोरिव्ह लष्करी तळावर साधारण 30 क्रुझ क्षेपणास्त्रे डागली. याबरोबरच इवानो-फ्रेक्विंस्क स्थित विमानतळावरही गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

पोलंड सीमा का महत्वाची? (Ukraine Russia War)

पोलंडच्या सीमेला लागून असलेल्या युक्रेन हद्दीतील भागावर ताबा मिळविण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. कारण अमेरिका व इतर पश्चिमी देशांकडून लष्करी मदत मिळण्यासाठी पोलंडची सीमा हा युक्रेनसाठी महत्वाचा मार्ग आहे. अशात हा भाग ताब्यात घेत युक्रेनचे नाक दाबण्याचा प्रयत्न रशियाकडून होईल, असा इशारा नुकताच जाणकारांनी दिला होता.

Back to top button