

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स (Nifty and Sensex) मध्ये अनुक्रमे एकूण 385.10 अंक व 1216.49 अंकांनी वाढ होऊन 16630 व 55550 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये एकूण 2.37 टक्के, तर सेन्सेक्समध्ये (Nifty and Sensex) एकूण 2.24 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. या सप्ताहात निर्देशांकावर प्रामुख्याने दोन घटनाक्रमांचा परिणाम झाला. पहिले म्हणजे पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल जाहीर झाले, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या खनिज तेलाच्या किमतीमध्ये काही प्रमाणात घट झाली. निवडणुकांचे निकाल लागल्याने बाजारातील अस्थिरता कमी झाली. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रुडच्या किमती 139 डॉलर प्रती बॅरलच्या विक्रमी किमतीवरून घसरून 112 डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली येऊन स्थिरावल्या.
* 'पेटीएम पेमेंटस्' बँकेला मध्यवर्ती रिझर्व्ह बँकेचा धक्का. पेटीएम पेमेंटस् बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंध. बँकेच्या पर्यवेक्षणात काही त्रुटी आढळल्याने रिझर्व्ह बँकेची कारवाई. पेटीएम पेमेंटस् बँकेला त्रयस्थ 'इन्फॉर्मेशन अॅक्ट 1949 सेक्शन 35 अ अंतर्गत रिझर्व्ह बँकेने कारवाई केली. यापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेला 'चुकीची माहिती' रिझर्व्ह बँकेकडे प्रस्तुत केल्याच्या कारणाने 1 कोटीचा दंड आकारला होता.
* भारताचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) जानेवारी महिन्यात मागील जानेवारी महिन्याशी (कोव्हिडपूर्व स्थितीशी) तुलना करता हा निर्देशांक 0.7 टक्क्यांनी वधारला. (Nifty and Sensex)
* शैक्षणिक क्षेत्रातील ऑनलाईन स्टार्टअप 'बायजू'ने सुमेरू व्हेंचर्स, वित्रवन पार्टनर्स, ब्लॅकरॉक आणि इतर यांच्यामार्फत 800 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभा केला. कंपनीचे सीईओ आणि संस्थापक यांनी स्वतःचे व्यक्तिगत 400 दशलक्ष डॉलर्स कंपनीमध्ये गुंतवले. या गुंतवणुकीपश्चात कंपनीचे बाजारमूल्य तब्बल 22 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. सध्या 'बायजू' ही आशिया खंडातील तसेच भारतीय स्टार्टअप क्षेत्रातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेली कंपनी आहे.
* महाराष्ट्र राज्याचे बजेट उपमुख्यमंत्री अजित पवारांमार्फत विधानसभेत सादर. महाराष्ट्राचा महसूल 4,03,427 कोटी तर खर्च 4,27,780 कोटी राहण्याची शक्यता. यावर्षी 24,353 कोटींच्या महसुली तुटीचा अंदाज.
* देशातील सर्वांत मोठी जीवन विमा कंपनी 'एलआयसी'चा डिसेंबर 2021 तिमाहीतील नफा 234.91 कोटींवर पोहोचला. पहिल्या वर्षाच्या (प्रीमियम) हत्त्यांमध्ये 9.94 टक्क्यांची वाढ होऊन प्रीमियम 8748.55 कोटींवर पोहोचला. एलआयसीचा आयपीओ लवकरच बाजारात येण्याच्या वाटेवर असून, भांडवल बाजार नियामक सरकारी संस्था 'सेबी'कडून 'आयपीओ'ला मान्यता मिळाली आहे. केवळ युद्धांच्या पार्श्वभूमीवर भांडवल बाजारात निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण निवळण्याची प्रतीक्षा सरकारकडून केली जात असल्याचे तज्ज्ञांचे मत. या मेगा आयपीओच्या माध्यमातून तब्बल 60 हजार कोटींचा निधी केंद्र सरकारला मिळण्याची अपेक्षा आहे.
* मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल आणि जेफ बेझोस यांची अॅमेझॉन यांच्यामधील 'फ्युचर रिटेल' कंपनीच्या अधिग्रहणावरून सुरू असलेला वाद अखेरच्या टप्प्यात. ऑगस्ट 2020 मध्ये रिलायन्सने फ्युचर ग्रुपचा रिटेल व्यवसाय खरेदी करण्यासाठी 24,713 कोटी रुपये मोजले; परंतु या निर्णयास 2019 पासून असलेला पूर्वीचा गुंतवणूकदार अॅमेझॉनने विरोध केला. सिंगापूर न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय यामध्ये युक्तिवाद केला गेला. परंतु गतसप्ताहात रिलायन्स रिटेलने अॅमेझॉनला धक्का देत, फ्युचर ग्रुपची ज्या ठिकाणी दुकाने आहेत, अशा 947 दुकानांचे भाडेकरार रद्द केले आणि आता त्यांची नावे बदलून रिलायन्स डिजिटल, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स फ्रेश, रिलायन्स ट्रेंडस् नावाने पुन्हा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्सने फ्युचर रिटेल (बिग बझार), फ्युचर लाईफ स्टाईलचा कर्मचारी 30 हजारांचा वर्गदेखील कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
* निर्मिती उद्योगाला (मॅन्युफॅक्चरिंग) चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने घोषणा केलेल्या 'उत्पादन आधारित प्रोत्साहन योजने'साठी (पीएलआय स्किमसाठी) 70 हून अधिक कंपन्यांची निवड. यामध्ये वाहनांचे भाग बनवणारे बॉश, मिंडा इंडस्ट्रीज, स्टीएट, टाटा ऑटो कांपोनंटस्, भारत फोर्ज या कंपन्यांचा समावेश.
* शुक्रवारअखेर रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 18 पैसे कमजोर होऊन 76.61 रुपये प्रतिडॉलर स्तरावर बंद झाले. गतसप्ताहात रुपया आजपर्यंतची सर्वांत कमजोर पातळी म्हणजेच 77 रुपये प्रतिडॉलर स्तरापर्यंत जाऊन आला.
* मार्च 4 रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी 394 दशलक्ष डॉलर्सनी वधारून 631.92 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. रुपया चलनाला भक्कम ठेवण्याच्या हेतूने रिझर्व्ह बँकेने नुकतीच 5.135 अब्ज डॉलर्स किमतीची डॉलर-रुपया चलन बदली (डॉलर-रुपया स्वॅप) केली. म्हणजेच 5 अब्ज डॉलर्सचे रुपये खरेदी केले. यामुळे रुपया चलनाची बाजारात तरलता कमी (लिक्विडीटी) होऊन रुपया चलन भक्कम होईल.