Hill Stations : सातार्‍यासह महाबळेश्‍वरही तापले | पुढारी

Hill Stations : सातार्‍यासह महाबळेश्‍वरही तापले

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहरासह जिल्ह्यात उन्हाचा पारा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वाढू लागला आहे. सातारचा पारा रविवारी 35 अंशांच्या तर थंड हवेच्या महाबळेश्‍वरचा पारा 29 अंशांच्या पुढे सरकला. उन्हाचा चटका वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
मार्च महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात उन्हाचा पारा वाढू लागला आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. तसेच भर दुपारी उन्हाचा चांगलाच चटका बसत आहे.

कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांबरोबर नागरिकांची वर्दळ दिसेनासी झाली आहे. अगदी मे महिन्यातील कडक उन्हाप्रमाणे उन्हाची तिरीप लागत आहे. पुढील एप्रिल व मे या दोन महिन्यात तर शहर व परिसरातील परिस्थिती आणखी भयावह होण्याची भिती निर्माण झाली आहे. रविवारी सातारचे कमाल 35.2 व किमान 18.0 तापमान होते तर थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणार्‍या महाबळेश्‍वरचे कमाल तापमान 29.1 व किमान 16.9 अशांवर होते. वाढत्या उन्हापासून संरक्षण मिळावे यासाठी नागरिकांनी आपला मोर्चा थंडावा देणार्‍या पदार्थांकडे वळवला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर व परिसरातील रस्त्यावर तसेच विविध दुकानात विविध रंगी बेरंगी टोप्या, गॉगल्स, चष्मे, रुमाल, सनकोट, स्टोल, मास्क, हॅन्डग्लोज विक्रीसाठी आले आहेत. उन्हापासून संरक्षण करणार्‍या कॉटन व वाळ्याच्या टोप्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. बाजारात मातीचे डेरे, माट, रांजण विक्रीसाठी आले आहेत.तसेच फ्रीज, पंखे, कुलर यांनाही मागणी वाढली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button