खासगी क्षेत्रात काम करणार्या काही नोकरदारांकडे एकापेक्षा अधिक पीएफ खाती (Provident Fund) असतात. कारण एखादा कर्मचारी हा एका कंपनीतून दुसर्या कंपनीत जातो, तेव्हा नव्या कंपनीत नवीन पीएफ खाते सुरू केले जाते. अशा रितीने एखाद्या कर्मचार्याने आपल्या करिअरमध्ये अनेक कंपन्या बदलल्या असतील, तर कदाचित त्याच्याकडे एकापेक्षा अधिक पीएफ खाती असू शकतात.
एवढेच नाही, तर नवीन कंपनीत रुजू झाल्यानंतर जुन्या खात्यातील काही रक्कमदेखील काढूनही घेतली जाते. पण आपल्याकडे एकापेक्षा अधिक पीएफ खाती असतील, तर निवृत्तीनंतर पेन्शन मिळण्यास अडचणी येऊ शकतात.
भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) हा प्रत्येक कर्मचार्यांसाठी महत्त्वाचा फंड असतो. निवृत्तीनंतरच्या आयुष्याला आर्थिक आधार देण्याचे काम पीएफ करते. नोकरीच्या काळात कंपनी आपल्या वेतनातून पीएफपोटी ठरावीक रक्कम कपात करते. त्याचवेळी त्यातील काही रक्कम ही पेन्शनमध्ये जमा होत राहते. अशा वेळी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी एक अट पूर्ण करावी लागते आणि ती म्हणजे कर्मचार्याला सलग दहा वर्षांपर्यंत पेन्शन स्किम 1995 (ईपीएस 1995) नुसार सदस्य असणे गरजेचे आहे.
आपले जुने खाते सक्रिय राहत असेल, तर आपल्या पहिल्या नोकरीपासूनचा दहा वर्षांपर्यंत कर्मचारी पेन्शन स्किमसाठी पात्र राहू शकतो. त्यामुळे जेव्हा नवीन कंपनी जॉईन करणार असाल तर जुन्या पीएफ खात्याची माहिती आपल्या नवीन कंपन्यांना द्यायला हवी. या कृतीने नव्या कंपनीतील पीएफचे योगदान जुन्या खात्यात जमा होईल. पीएफ खात्यालादेखील नवीन कंपनीचे अपडेट द्यावे लागेल. 'ईपीएफओ'चा सदस्य हा उमंग अॅपच्या माध्यमातून खाते अपडेट करू शकतो.
ईपीएफ स्किम सर्टिफिकेटदेखील करा अपडेट
जेव्हा एखादा कर्मचारी नवीन कंपनी जॉईन करतो, तेव्हा भविष्य निर्वाह निधीच्या प्रमाणपत्रातदेखील सुधारणा करावी लागते. नव्या कंपनीची माहिती त्यात भरावी लागते. 'ईपीएफओ'च्या संकेतस्थळावर आपण माहिती अपडेट करू शकता. यासाठी कर्मचारी आपल्या कंपनीच्या एचआर विभागाचीदेखील मदत घेऊ शकतो. अनेक नवख्या नोकरदारांना ईपीएफ स्किम सर्टिफिकेटची माहिती नसते. नोकरी बदलामुळे किंवा अन्य कारणांमुळे ईपीएफ खात्यातून पैसे काढल्यानंतरही पेन्शनचा लाभ मिळवू इच्छिणार्या कर्मचार्यांसाठी ईपीएफ स्किम योजना लागू राहते.
यासाठी कर्मचारी पेन्शन स्किम 1995 नुसार दहा वर्षांपर्यंत सदस्य असणे गरजेचे आहे. ज्या नोकरदारांनी पीएफमधून पैसा काढला असेल; परंतु त्यांना पेन्शनचा लाभ हवा असेल, तर त्यांंना सलग दहा वर्षांपर्यंत ईपीएफओचे सदस्य राहवे लागेल. ईपीएफ सर्टिफिकेटच्या माध्यमातून जुन्या कंपनीतील सेवा कालावधी हा नवीन कंपनीच्या सेवा कालावधीला जोडला जातो. यानुसार आपण दहा वर्षांची अट पूर्ण करू शकतो आणि पेन्शनची रक्कमदेखील वाढेल.
उमंग अॅप उपयुक्त
पीएफसंबंधी काम पूर्ण करण्यासाठी उमंग अॅप आपल्याला मदत करेल. या अॅपच्या मदतीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Provident Fund) योजनेचे प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकतो. यासाठी आपल्याकडे यूएएन नंबर असणे गरजेचे आहे आणि मोबाईल क्रमांक हा ईपीएफओशी नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
पेन्शनशी संबंधी नियम जाणून घ्या
कर्मचारी पेन्शन स्किम योजनेत निवृत्तीचे वय 58 आहे. अर्थात, ईपीएफओचे सदस्य हे वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही पेन्शन स्किमचा लाभ घेऊ शकतात. त्याचवेळी एखाद्या कर्मचार्याची सेवा सहा महिन्यांपेक्षा अधिक आणि दहा वर्षांपेक्षा कमी असेल आणि तो दोन महिन्यांपेक्षा अधिक बेरोजगार असेल, तर संबंधित व्यक्ती भविष्य निर्वाह निधी खात्यातून पैसे काढू शकतो.
सेवेत असताना ईपीएफओच्या सदस्यांचा मृत्यू होत असेल, तर त्याचे कुटुंब पेन्शनला पात्र ठरेल.
जयदीप नार्वेकर