आर्थिक वर्षाखेर जवळ आलीय? | पुढारी

आर्थिक वर्षाखेर जवळ आलीय?

मार्च महिन्याच्या 31 तारखेला आर्थिक वर्ष संपते आणि हे वर्ष संपण्यापूर्वी आपल्याला काही महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतात. यापैकीच एक म्हणजे प्राप्तिकराशी निगडित पूर्ण कराव्या लागणार्‍या औपचारिकता. प्राप्तिकर कायदा कलम 80 सी नुसार कोणताही व्यक्ती गुंतवणुकीवर करकपात मिळवू शकतो. ही गुंतवणूक ईपीएफ, जीवन विमा, एनएससी, पीपीएफ आणि किमान पाच वर्षांची मुदतठेव यावर दीड लाखापर्यंतची करसवलत मिळवू शकतो.

आपण नोकदरार असाल तर आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी प्राप्तिकर सवलत देणार्‍या गुंतवणूक योजनेतील आणि अन्य काही कागदपत्रांची पूर्तता कंपनीकडे करावी लागते. म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला डिक्लेरेशनमध्ये नमूद केलेल्या गुंतवणुकीचे पुरावे सादर करावे लागतात. याशिवाय ज्या खर्चावर प्राप्तिकर सवलत हवी आहे, त्याचेदेखील पुरावे डिक्लेरेशनला जोडावे लागतात.

कोणत्या गुंतवणुकीवर मिळते सवलत?

प्राप्तिकर कायदा कलम 80 सी नुसार कोणताही व्यक्ती गुंतवणुकीवर करकपात मिळवू शकतो. ही गुंतवणूक ईपीएफ, जीवन विमा, एनएससी, पीपीएफ आणि किमान पाच वर्षांची मुदत ठेव यावर दीड लाखापर्यंतची करसवलत मिळवू शकतो. याशिवाय आणखी दोन खर्चावर करसवलतीचा दावा करता येणे शक्य आहे.

यात गृहकर्जापोटी मुद्दल रकमेपोटी केलेला भरणा आणि दोन मुलांची ट्यूशन फीस. याचा 80 सीमध्ये समावेश केला आहे. या बचत योजनापोटी केलेल्या गुंंतवणुकीचे पुरावे, पावत्या बाळगणे गरजेचे आहे. त्याचे झेरॉक्स लेखा विभागाकडे जमा करावे लागतील.

याशिवाय घरभाडे पोटी दिलेल्या करकपातीचा लाभदेखील घेता येऊ शकतो. आपल्या कंपनीकडून किती एचआरए दिला जातो, त्यावर करकपात अवलूंबन असते. ही सवलत 80 सीच्या मर्यादेपेक्षा वेगळी आहे. या सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी आपल्याला रजिस्ट्री तिकिटावर स्वाक्षरी असलेल्या पावत्या कंपनीकडे जमा कराव्या लागतील. आपला घरमालक वर्षभरात एक लाखापेक्षा अधिक भाडे वसूल करत असेल, तर त्याचा पॅन नंबरदेखील द्यावा लागेल.

याशिवाय एज्युकेशन लोन, गृहकर्जावरील व्याज, आरोग्य विमा आणि एनपीएसवरील गुंतवणुकीवरदेखील करसवलत मिळवू शकतो. आई-वडील ज्येष्ठ नागरिक असतील, तर त्यांंच्यापोटी 30 हजारांपर्यंत खर्च झाल्यास करसवलत मिळू शकते.

आपल्या डिक्लेरेशनमध्ये पीपीएफमध्ये 50 हजार रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली असेल आणि काही कारणाने आपण तेवढी गुंतवणूक करू शकला नाहीत, तर उर्वरित रक्कम करसवलत देणार्‍या अन्य योजनेतदेखील गुंतवू शकता.

याशिवाय आपण संपूर्ण वर्षभरात एक लाख गुंतवणूक करण्याची घोषणा केली असेल, तर आणि केवळ 25 हजार रुपयेच गुंतवणूक केली असेल तर उर्वरित रकमेवर होणारी कर आकारणी ही कंपनी आपल्या वेतनातून वसूल करेल.

पुरावे नसल्यास अडचणी

गुंतवणूक, बचत आणि खर्चाशी संबंधित पुरावे मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत जमा केले नाही, तर कंपनी मार्चच्या वेतनातून कर कापून घेते. त्यामुळे वेळेत सर्व कागदपत्रांचे पुरावे सादर करावेत. त्याच्या सत्यप्रती कंपनीला देणे गरजेचे आहे. सर्वसाधारपणे 20 मार्चपर्यंत पुरावे जमा करावे लागतात.

परंतु प्रत्येक कंपन्यांच्या तारखा वेगवेगळ्या असतात. लक्षात ठेवा, पुरावे जमा न केल्यास एकरकमी रक्कम मार्चच्या वेतनातून करापोटी कपात केली जाते. त्यामुळे एप्रिलच्या महिन्यात अनेकांच्या हाती एक रुपयादेखील पडत नाही. त्यामुळे गुंतवणुकीचे पुरावे जमा करण्यास कोणताही वेळ दवडू नये.

राकेश माने

Back to top button