Third World War : तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, युक्रेन-रशिया चर्चा निष्फळ; अण्वस्त्र हल्ल्याचा पुतीन यांचा प्लॅन | पुढारी

Third World War : तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर, युक्रेन-रशिया चर्चा निष्फळ; अण्वस्त्र हल्ल्याचा पुतीन यांचा प्लॅन

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : युक्रेन-रशिया चर्चा सोमवारी निष्फळ ठरली. सहा तास चाललेली चर्चा संपुष्टात येताच रशियाने कीव्हवरील हल्ले वाढविले. युद्धविरामाची शक्यता नुसतीच विरली नाही, तर एका नव्या वृत्ताने जगाला तिसर्‍या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आणून सोडले. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र वापराची योजना आखल्याचे ते वृत्त आहे! (Third World War)

युक्रेनवर कुठल्याही क्षणी अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, अशी भीती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी वर्तविलीच; पण पुतीन यांच्या अण्वस्त्र वापराच्या योजनेला ‘स्पुत्निक’ या

रशियन माध्यमाने दुजोरा दिल्याने जगभरात खळबळ उडाली! भरीस भर म्हणून सध्या रशियात असलेल्या अमेरिकन नागरिकांनी तत्काळ रशियाबाहेर पडावे, अशी आणीबाणीची ‘अ‍ॅडव्हायझरी’ बायडेन प्रशासनाने जारी केली. त्यामुळे अमेरिका आता थेट रशियावर हल्ल्याच्या तयारीत आहे की काय, असे तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

Third World War : युद्धाच्या पाचव्या दिवशीही तीव्र हल्ले

प्रीप्यत नदीच्या काठावर बेलारूसमधील सीमाभागात युक्रेन आणि रशियादरम्यान सहा तासांवर बैठक चालली. कुठलाही तोडगा या बैठकीत निघाला नाही. बैठक होतेय म्हणून हल्ले थांबविणार नाही, असा इशारा पुतीन यांनी दिलेला असला तरी युक्रेनवर रशियाकडून युद्धाच्या पाचव्या दिवशी सोमवारी फार तीव्र हल्ले करण्यात आले नाहीत.

चर्चा तर निष्फळ ठरलीच, युक्रेनवर 16 तासांत ताबा मिळवून दाखविण्याचे स्वप्नही धुळीला मिळाले. युक्रेनने जोरदार प्रतिकार सुरू केल्यानंतर तसेच युक्रेनची जनताही सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून रशियन सैन्याविरुद्ध रस्त्यांवर उतरल्यानंतर आता रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्रांचा वापर करण्याची घातक योजना आखली आहे. ‘स्पुत्निक’ या रशियन माध्यम संस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

‘न्यूक्लिअर डिटरंट फोर्सेस’च्या सर्व युनिटस्च्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुठल्याही क्षणी तत्पर राहण्याचे आदेश या युनिटस्ना देण्यात आले आहे. स्वत: संरक्षणमंत्री सर्र्जेेई शोईग्यू यांनी सोमवारी दुपारी पुतीन यांना हल्ल्याच्या योजनेबद्दलची माहिती दिली. सर्व अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे ‘फायरिंग मोड’वर ठेवण्यात आली आहेत.

संरक्षण मंत्री शोईग्यू यांनी अणुहल्ला कसा आणि कोठे करण्यात येईल, याबद्दलची माहितीही पुतीन यांना दिली. रशियाकडून कुठल्याही क्षणी ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’चा वापरही कीव्हवर होण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

Third war : युक्रेन सीमेवरून रशियन फौजांनी माघार घ्यावी

रशियाकडून युद्धाच्या पाचव्या दिवशीही युक्रेनवर हल्ले सुरू आहेत. युद्ध संपुष्टात यावे म्हणून दोन्ही देश बेलारूस या शेजारी देशात चर्चा करत आहेत. चर्चेतून काही चांगले बाहेर येईल, असे वाटत नाही. पण शांततेसाठी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असेच या बैठकीकडे मी पाहतो आहे, असे चर्चेपूर्वी युक्रेनियन राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले.

युक्रेन सीमेवरून रशियन फौजांनी माघार घ्यावी, अशी मागणी चर्चेपूर्वीच झेलेन्स्की यांनी केली आहे. दुसरीकडे बेलारूसही रशियन लष्कराच्या मदतीसाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठविण्याच्या तयारीला लागला आहे.

लॅटव्हिया या युरोपियन देशाने आपल्या नागरिकांना युक्रेनच्या बाजूने युद्धात सहभाग घेण्याची खुली सूट दिली आहे. तसा प्रस्तावच लॅटव्हियाने संसदेत पारित केला आहे. झेलेन्स्की यांनी जगभरातील लोकांना रशियाविरुद्धच्या या युद्धात युक्रेनच्या बाजूने लष्करात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

आजवर रशियाच्या 5 हजार 300 सैनिकांचा खात्मा आम्ही केला आहे. 151 रशियन रणगाडे, 29 विमाने आणि 29 हेलिकॉप्टर्स उद्ध्वस्त केले आहेत, असे युक्रेन लष्कराकडून सांगण्यात आले.

युक्रेनच्या 354 जणांचा युद्धात मृत्यू; 1684 जायबंदी

रशियन हल्ल्यांत युक्रेनियन सैनिकांसह 354 लोक मरण पावले आहेत. सोळा मुलांचा मृतांत समावेश आहे. 1,684 लोक जखमी आहेत, असे युक्रेनकडून सांगण्यात आले.

युक्रेनला एकटे पडू देणार नाही : संयुक्त राष्ट्रे

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्र महासभेत बहुतांश सदस्य राष्ट्रांनी रशियाविरुद्ध भूमिका नोंदविल्या आणि रशियाने तातडीने युद्धबंदी करावी, अशी मागणी केली. युक्रेनला आम्ही एकटे पडू देणार नाही. मानवी पातळीवर सर्व प्रकारची मदत युक्रेनला केली जाईल, असे संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी सांगितले.

रशियाकडूनही हवाई हद्दबंदी

युरोप, अमेरिकेतील 42 देशांनी रशियासाठी आपापली हवाई हद्द प्रतिबंधित केली आहे. त्याला उत्तर म्हणून रशियाने कॅनडा आणि युरोपातील देशांसह 36 देशांच्या विमान वाहतूक कंपन्यांसाठी आपल्या (रशियाच्या) हवाई हद्दीच्या वापरावर बंदी घातली आहे.

रशियात ‘न्यूक्लिअर डिटरंट फोर्सेस’च्या सुट्ट्या रद्द

सर्व अण्वस्त्रसज्ज क्षेपणास्त्रे ‘फायरिंग मोड’वर

पाचव्या दिवशी रशियन हल्ल्यांची तीव्रता कमी

16 मुलांसह युक्रेनमध्ये

354 जणांचा मृत्यू

रशियाचे 5,300 सैनिक मारल्याचा युक्रेनचा दावा

 

Back to top button