ukraine -russia crisis : युक्रेनमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता | पुढारी

ukraine -russia crisis : युक्रेनमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता

जीनिव्हा ः वृत्तसंस्था रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू असताना आता युक्रेनसमोर एक नवे भयानक संकट निर्माण होण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे संकट कायम असताना युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. (ukraine -russia crisis)

युक्रेनची राजधानी कीव्हसह अन्य शहरात तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती भयावह होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. युक्रेनमध्ये 600 रुग्णालये आहेत. त्यामध्ये अजूनही 17 रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत.

कोरोनाशिवाय युक्रेनमधील नवजात बालक, गर्भवती आणि वयोवृद्धांनाही ऑक्सिजनची गरज भासण्याची शक्यता आहे. या युद्धामुळे युक्रेनी नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने देशातील परिस्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे.

युद्धाच्या कठीण परिस्थितीमुळे युक्रेनमधील सर्व रुग्णालयातील ऑक्सिजन संपले आहे. तसेच ऑक्सिजन प्रकल्पातून रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करण्यात अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
विजेचाही तुटवडा

युद्धामुळे युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेत असताना गोळीबार होण्याचा धोकाही असल्याचे आरोग्य संघटनेने सांगितले. दरम्यान युद्धाचा सोमवारी पाचवा दिवस होता. युद्ध समाप्तीसाठी रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चेच्या फेरी सुरू होत्या.

ukraine -russia crisis : जर्मनीत पुतीनविरोधात निदर्शने

पुतीन यांच्या आदेशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युद्धाची तीव्रता वाढली. युरोपमध्ये पुतीन यांच्याविरोधात रोष वाढत चालला आहे. जर्मनची राजधानी बर्लिनमध्ये पुतीन यांच्याविरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते. पुतीन यांनी इलाज करून घ्यावा, अशा घोषणा या आंदोलनकर्त्यांनी दिल्या.

ukraine -russia crisis : चेचेन स्पेशल फोर्सचा खात्मा

कीव्ह : पुतीन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्हालोदोमीर झेलेन्सी यांची हत्या करण्यासाठी युक्रेनमध्ये पाठवलेल्या चेचेन स्पेशल फोर्सचा युक्रेनने खात्मा केल्याचे समोर आले आहे. यामुळे पुतीन यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. चेचेन स्पेशल फोर्स ही एक अत्यंत घातक तुकडी मानले जाते. युक्रेनमध्ये ही तुकडी घुसल्यानंतर युक्रेनच्या लष्कराने चेचेन स्पेशल फोर्सच्या 56 तोफा उद्ध्वस्त करून त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

रशियाचे चलन रूबलमध्ये घसरण

युक्रेन आणि रशिया युद्धामुळे युरोपीयन देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध घातले आहेत. आर्थिक निर्बंध घातल्यानंतर रशियाचे चलन असलेल्या रूबलच्या किमतीत घसरण झाली असून, रूबल डॉलरच्या तुलनेत जवळपास तीस टक्क्यांनी घसरला आहे. रूबलची किंमत प्रती डॉलर 114.33 इतकी झाली.

युक्रेनला आर्थिक मदतीचे आश्वासन

युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा अमेरिका आणि युक्रेनमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चेत अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन तर युक्रेनकडून अर्थमंत्री सहभागी झाले होते. या चर्चेत अमेरिकेने युक्रेनला पाठिंबा देत आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याचे आश्वासन दिले.

युरोपियन महासंघ युक्रेनच्या मदतीला

युरोपियन महासंघाने युक्रेनला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. युरोपियन महासंघाच्या युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी या निर्णयाची घोषणा केली आहे. युरोपियन महासंघ पहिल्यांदाच एखाद्या देशाला शस्त्र खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे.

Back to top button