सातारा : डॉ. दाभोळकर सामाजिक पुरस्कार बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान | पुढारी

सातारा : डॉ. दाभोळकर सामाजिक पुरस्कार बाबासाहेब कल्याणी यांना प्रदान

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक पुरस्कार यावर्षी उद्योजक व सातारा जिल्ह्यातील 28 गावांमध्ये लोकोपयोगी विकासकामे करणारे भारत फोर्जचे संस्थापक व पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना पुण्यात वितरित करण्यात आला. सातारा नगरपालिकेच्यावतीने दरवर्षी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक पुरस्कार देण्यात येतो. गेल्या वर्षीचा पुरस्कार नाम फाऊंडेशनचे संस्थापक सिनेअभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांना पुण्यात प्रदान करण्यात आला होता. यावर्षीचा पुरस्कार उद्योजक व सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये विकासकामे राबवणार्‍या पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना जाहीर करण्यात आला होता. कोरोनामुळे त्यांच्याच पुण्यातील कार्यालयात या पुरस्काराचे सोमवारी वितरण करण्यात आले.

00000001 लाख रूपयांचा धनादेश सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी, हरीष पाटणे, अतिरिक्‍त मुख्याधिकारी पराग कोडगुले, सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर कृतज्ञता व्यक्‍त करताना बाबासाहेब कल्याणी म्हणाले, मी माझे सामाजिक कार्य करत असतो. सातारा जिल्ह्यातील कोळे या गावचा मी रहिवासी आहे. ग्रामीण भागातून आल्यामुळे ग्रामीण भागाचे दु:ख मला माहित आहे. ग्रामीण समस्यांची मला जाणीव आहे. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे यासाठी माझी तळमळ आहे. सातारा जिल्ह्यातील 28 गावांमध्ये भारत फोर्जच्या माध्यमातून विकासकामे सुरू आहेत. महाराष्ट्रातील 100 गावांमध्येही कामे सुरू आहेत. सुमारे 5 लाखांहून अधिक लोकांना त्याचा फायदा होत आहे. जलसंधारण, पाणी, प्राथमिक शिक्षण, आरोग्य, वीज या विषयांमध्ये सीएसआर फंडाच्या माध्यमातून भारत फोर्जने गावागावात विकासकामे राबवली आहेत. ग्रामीण जनतेच्या आम्ही उपयोगी पडू शकलो याचा आम्हाला अभिमान वाटतो.

बाबासाहेब कल्याणी पुढे म्हणाले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचे व माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. या संबंधातूनच माझ्या मालकीची जागा 1 रूपया या नाममात्र भाडेतत्वावर मी सातारा नगरपालिकेला दिली. सातारा नगरपालिकेचे स्वच्छतेच्या क्षेत्रात, पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठे नाव आहे. हे नाव त्यांनी असेच टिकवावे. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्यासारख्या महापुरूषाच्या नावाने मला पुरस्कार दिला गेला त्याबद्दल मी खा. उदयनराजे भोसले व सातारा नगरपालिकेला धन्यवाद देतो. प्रास्ताविकात पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी आजपर्यंतच्या डॉ. नरेंद्र दाभोळकर सामाजिक पुरस्काराची माहिती दिली. देशभरात उल्‍लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्‍तींना डॉ. नरेंद्र दाभोळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तुम्ही सातारा जिल्ह्यात जे विकासात्मक कार्य केले आहे त्यामुळे तुम्हाला हा पुरस्कार खा. उदयनराजे भोसले यांच्यावतीने देताना आम्हाला अभिमान वाटतो, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी पुरस्काराबद्दल बाबासाहेब कल्याणी यांनी सातारकरांविषयी कृतज्ञता व्यक्‍त केली.

पुरस्काराची रक्‍कम कल्याणी यांच्याकडून सातार्‍याच्या विकासासाठी

पुरस्काराचा एक लाख रुपयांचा धनादेश पाहिल्यानंतर बाबासाहेब कल्याणी म्हणाले, अहो, ही रक्‍कम मला कशाला? त्यापेक्षा सातार्‍यातील गरजू व्यक्‍ती अथवा संस्थेसाठी ही रक्‍कम चॅरिटी करावी, असे सांगून बाबासाहेब कल्याणी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत 1 लाख रुपयांचा धनादेश सातारकरांसाठी परत केला.

Back to top button