सातार्‍यात शिवजयंतीचा माहोल : अवघ्या जिल्ह्यात उत्साह | पुढारी

सातार्‍यात शिवजयंतीचा माहोल : अवघ्या जिल्ह्यात उत्साह

सातारा, पुढारी वृत्तसेवा : 
राजधानी सातार्‍यातील अवघे वातावरण शिवजयंतीच्या माहोलात हरवून गेले आहे. चौकाचौकात भगव्या पताका, भगवे झेंडे फडकले आहेत. सर्वच किल्ल्यांवर शिवप्रेमी शिवज्योत आणण्यासाठी रवाना झाले असून किल्‍ले प्रतापगडासह जिल्ह्यात सर्वत्र विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने दोन वर्षांनंतर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी मावळे सरसावले आहेत.

शिवजयंतीनिमित्त शनिवार 19 फेब्रुवारी रोजी राजधानी सातार्‍यासह जिल्ह्यात विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील दोन वर्षातील कोरोनामुळे सण-समारंभांवर असलेले निर्बंध आता कमी झाल्याने यंदा शिवजयंतीचा जोश पहावयास मिळत आहे. सातार्‍यात शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून चौकाचौकात भगव्या पताका व झेंडे, स्वागत कमानी लावण्यात आले आहेत. अवघी शाहूनगरी शिवमय होवून गेली आहे. किल्ले प्रतापगडावर जिल्हा परिषदेच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा नगरपालिकेच्यावतीने शहरात शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी नगरपालिका सभागृह, राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस तर शिवतीर्थ, पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे.

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवतीर्थ, पोवईनाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळपासूनच शीवतीर्थाची स्वच्छता करुन सजावटीची लगबग सुरु होती. तसेच अजिंक्यतारा किल्ला, कमानी हौद, गोलबाग, राजवाडा परिसरातही शिवजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाईसह जय्यत तयारी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शिवजयंती उत्सव मंडळांचे कार्यकर्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच रायगड, प्रतापगड, वैराटगड, रायरेश्‍वर, शिवनेरी, पुरंदर व अन्य ऐतिहासिक किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी रात्री उशीरापर्यंत रवाना होत होते.

शिवजयंतीची सर्वत्रच धांदल सुरु असल्याने शाहूनगरी शिवमय बनून गेली. शिवजयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवचरित्रावर आधारीत पोवडे गायन, व्याख्याने, मनोरंजनात्मक कार्यक्रमांबरोबरच रक्तदान, आरोग्य तपासणी शिबीर यांसारखे आरोग्यदायी व विधायक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. बहुतांश शिवप्रेमींनी आपल्या दुचाक्या,चारचाकी वाहनांना भगवे झेंडे लावले आहेत. शिवप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले असून अवघ्या राजधानीत शिवजयंतीचा माहोल निर्माण झाल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले.

किल्‍ले प्रतापगडावर शिवजयंती

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त किल्ले प्रतापगड येथे जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसाठी किल्ले प्रतापगड सज्ज झाला आहे. जिल्हा परिषद, सातारा यांच्यावतीने महिला व बालकल्याण मंत्री ना. यशोमती ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्री यशोमती ठाकुर यांच्या हस्ते श्री भवानी मातेला अभिषेक होणार असून मंदिरासमोर ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

त्यानंतर श्री भवानी माता मंदिरातून छत्रपतीशिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याजवळ पूजन व ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे सर्व पदाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. दरम्यान दोन वर्षांनी कोरोनाचे संकट कमी झाल्याने किल्ले प्रतापगडावरुन शिवज्योत घेऊन जाण्यासाठी दूरवरुन युवक येत आहेत. यावर्षी शिवजयंतीला युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

हे ही वाचलं का  

Back to top button