बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ओठावर आले की, संपूर्ण शरीरातून रोमांच फुलतात. स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि अस्मितेची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवराय मराठी माणसाच्या हृदयात वसले असले तरी त्यांनी गड, किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकावला ते गडकिल्ले मराठी साम्राज्याचा, संस्कृतीचा अनमोल ठेवा आहेत, खरा वारसा आहेत. आणि हाच वारसा जतन करण्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानचे आधुनिक मावळे झटत आहेत. या संस्कृती रक्षणात बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे दीडशे युवक आठवड्यातील एक दिवस शिवकालिन गडकोटांवर श्रमदान करतात.
दुर्गवीर प्रतिष्ठानची संकल्पना सुचली ती मोदगे (दड्डी) येथील आणि सध्या मुंबई येथे कार्यरत असलेल्या संतोष हसूरकर या युवकाला. 'सेवेचि ठाई तत्पर' हे हिरोजी इंदलकर यांचे वाक्यच संघटनेचे ब्रिदवाक्य झाले. एकेक मावळे जमत गेले आणि आता संपूर्ण महाराष्ट्र, सीमाभाग या ठिकाणी शिवकालीन गडकोटांवर श्रमदानातून दुरूस्ती, संस्कृतीचे जतन काम करण्यात येत आहे.
2008 पासून दुर्गवीर प्रतिष्ठानचे काम बेळगाव, मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, पुुणे, बीड, कोल्हापूर जिल्ह्यात चालत आले आहे. दर शनिवार, रविवार किंवा सुट्यांची दिवशी तरूण एकत्र येतात. गडांवर दुरुस्तीचे काम करतात. श्रमदान करतात, लोकांना प्रबोधन करतात. या श्रमदानातून मिळणारा आनंद युवकांसाठी लाखमोलाचा असतो.
दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे वल्लभगड, सामानगड, सूरगड, मानगड, मृगगड, भीवगड, साल्हेर येथे पायवाटा, मुख्य दरवाजा, पाण्याची टाकी, दिशादर्शक फलक लावण्यात आले. या गडांवरील ऐतिहासिक वास्तूंची साफसफाई आणि संगोपन केले जाते. गडावरील पुरातन मंदिरांची डागडुजी करून मूळ स्वरूप कायम राखून बांधणी करण्यात येते. गडांवरील भग्न मंदिरे पुन्हा उभारून त्यांना गतवैभव मिळवून देण्याचा मानस दूर्गवीरचा आहे.
दूर्गवीर प्रतिष्ठानतर्फे गडांवर दसरा, गुढीपाडवा आणि महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतो. याशिवाय स्थानिक पारंपरिक सण साजरे करण्यात येतात. गडाच्या आसपासच्या गावातील शाळांत गडासंदर्भात चित्रफित दाखवणे, फोटो प्रदर्शन भरवण्यात येते. आदिवासी मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात येते. आदिवासींना गृहोपयोगी साहित्य देण्यात येते. प्रत्येक गडावर गडाची माहिती आणि दिशादर्शक उभारण्याचा दुर्गवीरचा संकल्प आहे.
बेळगाव आणि सीमाभागातील सुमारे दीडशे युवक दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होत असतात. दर रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी गडांवर जाऊन श्रमदान करण्यात येते. अनेक युवक या कामासाठी सायकलीचा प्रवास करताना दिसतात. सह्याद्रीच्या कुशीत शिवकालीन गडकोटांत श्रमदान करणे, हाच आमचा गौरव आहे, अशी त्यांची भावना असते.
या गडांवर होतेय श्रमदान
बेळगावचे दूर्गवीर संकेश्वरनजीकचा वल्लभगड, चंदगड तालुक्यातील कलानिधीगड, खानापूर तालुक्यातील चोर्ला किल्ला, गडहिंग्लजमधील सामानगड या गडांवर श्रमदान करतात. गडसंवर्धनाचे काम होत असून, चंदगड तालुक्यातील पारगड येथे स्वच्छता मोहिमा आखल्या जातात. युवकांशी समन्वय साधून सामूहिक नेतृत्वाने हे काम चालते. पुरातत्त्व खात्याचे नियम व अटी पाळून गडकिल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण केले जाते, असे बेळगावचे अभिजीत अष्टेकर सांगतात.
चंदगड तालुक्यात दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे ऐतिहासिक संग्रहालय उभारण्याचा मानस दुर्गवीर प्रतिष्ठानचा आहे. त्यासाठी प्राथमिक स्तरावर काम सुरू असून, लवकरच त्याला मूर्त स्वरूप येईल. त्यामुळे येणार्या पिढीला छत्रपती शिवरायांच्या काळातील वैभवशाली इतिहास समजण्यास मदत होईल, असा दुर्गवीर प्रतिष्ठानचा मानस आहे.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड,किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी आहे. छत्रपती शिवरायांनी आमच्याकडे सोपवलेला हा वारसा जतन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही सर्वजण श्रमदान करत असतो. काम, व्यवसाय सांभाळून आठवड्यातून एक दिवस आम्ही श्रमदान करतो. सीमाभागातील युवकांचा प्रतिसाद खूप उत्साहवर्धक आहे.
अभिजित अष्टेकर, दुर्गवीर प्रतिष्ठान