सातारा : साहेब, शाळेत रेंज नाय दाखला द्या की; बदलीसाठी गुरुजींची धावाधाव

सातारा : साहेब, शाळेत रेंज नाय दाखला द्या की; बदलीसाठी गुरुजींची धावाधाव
Published on
Updated on

सातारा : प्रवीण शिंगटे
राज्य शासनाने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची कार्यवाही सुरु केली आहे. त्यामुळे गुरुजींची दाखल्यासाठी धावपळ सुरु असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. बदलीसाठी आवश्यक असलेला 'शाळेत रेंज नाय' त्याबाबतचा दाखला द्या, अशी आर्जव गुरुजी बीएसएनएलमध्ये जावून करताना दिसत आहेत. तसेच शासनाच्या विविध विभागांत दाखल्यासाठीही गुरुजी खेटे मारत आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या दोन वर्षांत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या नाहीत. मात्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या बदल्या करण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांची समिती गठित केली आहे. या समितीने शिक्षक बदल्यांसाठी एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्यानुसारच शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाईन होणार आहेत. बदल्याच्या पार्श्‍वभूमीवर शासनाच्या विविध विभागाच्या दाखल्यांची आवश्यकता असते त्यासाठी गुरुजींची दाखल्यासाठी धावाधावा सुरु असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. बदलीपात्र शिक्षकांची शाळा दुर्गम व अवघड क्षेत्रात यावी यासाठी खटाटोप सुरु आहे. प्रत्येक तालुक्यातील व गावांमधील बी. एस. एन. एल कार्यालयामध्ये जावून संवाद छायेचा दाखला मागण्यासाठी आमच्या शाळेत रेंज येत नाही, अशी आर्जव हे गुरुजी करताना दिसत आहेत. वन विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडे, तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालयामधून दाखले घेण्यासाठी धावाधाव सुरु आहे. वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांकडे जावून आमच्याकडे हिंस्त्र प्राण्यांचा वावर सुरु आहे. याबाबत दैनिकांमध्ये आलेल्या बातम्या दाखवल्या जात आहेत.तसेच गावचे सरपंच, गावकामगार तलाठी यांच्याकडूनही गुरुजी दाखले घेताना दिसत आहेत. तालुक्यातील मंडल कार्यालय व अन्य ठिकाणी पर्जन्य मापक यंत्रे कोठे आहेत याची माहिती घेतानाही गुरुजी दिसत आहेत. गतवर्षीचा पडलेल्या पाऊसाची नोंद शोधण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

या पावसाच्या अनुषंगाने प्रमाणपत्र मिळवण्याचा खटाटोप गुरुजींचा सुरु आहे. गावात रस्ता नाही, डोंगरात गाव वसले आहे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातून दाखले मिळवण्यासाठी गुरुजींची धावपळ सुरु असल्याचे चित्र ठिकठिकाणच्या बांधकाम विभागात पहावयास मिळत आहे. याशिवाय राष्ट्रीय व राज्य महामार्गाची माहिती गुगलवरुन काढण्यासाठी गुरुजींचे प्रयत्न सुरु आहेत. यावरुन राष्ट्रीय व राज्य महामार्गावरुन गावांचे अंतराबाबतचा दाखला बांधकाम विभागातून घेण्यासाठी गुरुजींचा चांगलाच पाठपुरावा सुरु असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

एस.टी. आगारातही फेर्‍या वाढल्या…

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा, कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर, पारगाव खंडाळा, फलटण, कोरेगाव, वडूज, दहिवडी, मेढा या 11 आगारांतील कार्यालयात गुरुजींच्या फेर्‍या वाढल्या आहेत. कारण शिक्षक ज्या गावांतील शाळेमध्ये ज्ञानदानाचे धडे देत आहे त्या गावामध्ये एसटी येत नाही, असा दाखला घेण्यासाठी शिक्षकांचे हेलपाटे सुरू असल्याचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे दररोज शिक्षकांची दाखले मिळवण्यासाठी विविध कार्यालयात खेटे मारताना दिसत आहेत. त्यामुळे कुणी दाखले देता का ? दाखले अशी म्हणण्याची वेळ आता बदलीग्रस्त शिक्षकांवर आली असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

हेही वाचलतं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news