कोल्हापूर : ऐन विशीत… गुन्हेगारीच्या कुशीत!

कोल्हापूर : ऐन विशीत… गुन्हेगारीच्या कुशीत!
Published on
Updated on

कोल्हापूर ; दिलीप भिसे : शिक्षणाचा गंध नाही… अजून मिसरूडही फुटलं नाही, तोवर पोलिस रेकॉर्डवर खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारीसह लूटमारीचे गुन्हे… त्यात नामचीन टोळ्यांचा शिक्का… एव्हाना गांजा, अमली पदार्थांच्या व्यसनासह गुंडागर्दी आणि मिळकतीला तस्करीचा धंदा… 16 ते 21 वयोगटातील शेकडो पोरं आज गंभीर गुन्ह्यांत जेरबंद होऊ लागली आहेत. काळजाचा ठोका चुकविणारे अन् मनाची घालमेल वाढविणारे जिल्ह्यातले हे भीषण वास्तव…' ऐन विशीत.. गुन्हेगारीच्या कुशीत' अशीच काहीशी चिंताजनक स्थिती इथे निर्माण होऊ लागली आहे.

अलीकडच्या काळात शहर, जिल्ह्यात बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. जानेवारी 2019 ते 5 फेब—ुवारी 2022 या काळात 325 संशयितांची जिल्ह्यातील बालसुधारगृहात रवानगी झाली आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील बंदिस्त कैद्यांपैकी 18 ते 25 वयोगटातील कैद्यांचे प्रमाण 35 टक्क्यांवर आहे. गंभीर गुन्ह्यांत तरुण मुलांचा वाढता सहभाग धोकादायक बनू लागला आहे.

येथील संभाजीनगर, वारे वसाहत, टिंबर मार्केट, राजाराम चौक जवाहरनगर, सुभाषनगर, राजेंद्रनगर, कनाननगर, विचारे माळ, कदमवाडी, यादवनगर, नेहरूनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर, बोंद्रेनगरसह मोरेवाडी, इचलकरंजी, गावभाग, शहापूर परिसरात बालगुन्हेगारीत वाढ झाल्याचे दिसून येते. दारू, गांजा, अमली पदार्थांच्या सेवनासह मिळकतीसाठी तस्करीच्या गुन्ह्यातही तरणी पोरं गुरफटल्याचे चित्र आहे.

गुंडांना अभय…
जणू 'पुण्याई'चाच उद्योग!

स्थानिक राजकारणात गुंडांना अभय देण्यासाठी जणू स्पर्धा लागलेली असते. एखाद्या गुन्ह्यात गल्ली-बोळातल्या दोन, चार टग्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले की, राजकारण्यांची पोलिस ठाण्यांवर भाऊगर्दी होते. संशयिताची सुटका म्हणजे 'पुण्याई'चे काम समजले जाते. आपणाला सोडविणारा कोणी तरी आहे, हीच भावना वाढीला लागते. त्यातून गुन्हेगारीला बळ मिळते. पाठराखण करणार्‍यांवर कायद्याचा बडगा उगारल्याशिवाय गुंडांंना आळा बसणार नाही.

संघटित टोळ्यांशी लागेबांधे!

नकळत गंभीर घटना घडून जाते. अटकेनंतर कारागृहात रवानगी होते. चार भिंतीआड कोठडीत एकापेक्षा अनेक नामचीन गुंडांशी थेट संपर्क होतो. त्यातून संघटित टोळ्यांशी लागेबांधे जोडले जातात. जामिनावर सुटका झाल्यानंतर साहजिकच गुन्हेगारांची साखळी निर्माण होते. त्यातून संघटित टोळ्यांमध्ये शिरकाव होेतो. गुन्हेगारीचा विळखा पडतो तो कायमचा.

तो क्षणिक वाद कोणाला भोवणार?

वारे वसाहतीत नुकताच राडा झाला. निमित्त होते किरकोळ वादाचे. 27 जणांवर गुन्हा दाखल झाला. 27 पैकी 12 संशयित 18 ते 25 वयोगटातील आहेत. कोणी शिक्षण, कोणी रोजंदारी करणारे. सर्वांवर खुनाच्या प्रयत्नासह घरफोडी, गर्दी, मारामारीचे गुन्हे दाखल झाले आहेत. दोष सिद्ध झाल्यास कारावासाची तरतूद आहे. क्षणिक वाद कोणाला भोवणार, हा प्रश्न आहे.

17 व्या वर्षीच म्होरक्या खुनाच्या गुन्ह्यात

गुंड आदर्श जर्मनी टोळीशी इचलकरंजीसह परिसरातील 17 ते 18 गुन्हेगार विविध गुन्ह्यांत कोठडीत बंद आहेत. त्यापैकी तीन टोळ्यांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे. आठवड्यापूर्वी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. वयाच्या 17 व्या वर्षीच म्होरक्याला खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली. टोळीतील बहुतांश सराईत 18 ते 25 वयोगटातील आहेत. राजकीय आश्रय आणि काळ्या धंद्यातील रसद यामुळे टोळीच्या कारनाम्याची व्याप्ती वाढत गेली.आज अनेक तरणी पोरं टोळीचा उदो उदो करीत समाजात दहशत वाढवित आहेत.

गुन्हेगारीचे उदात्तीकरण!

राजकीय वर्चस्व, दहशतीसाठी कुख्यात टोळ्यांच्या म्होरक्यासह साथीदारांकडून तरुणांना चिथावणी देऊन त्यांच्या गुन्हेगारीच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न केला जातो. मुबलक दारू, अमली पदार्थ पुरवठा, रंगेल मेजवाणीवर उधळण केली जाते. कामधंदा न करता फुकटात मिळणार्‍या सुविधांमुळे तरुणाईची पावले गुन्हेगारी वतुर्ळाकडे वळू लागली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news