सोलापूर : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यात यावे | पुढारी

सोलापूर : 'व्हॅलेंटाईन डे'च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यात यावे

सोलापूर, पुढारी वृत्‍तसेवा : गेल्या अनेक वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची प्रथा भारतातही रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. तरी व्हॅलेंडाईन डेच्या नावाखाली अपप्रकार रोखण्यात यावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे सादरीकरण करत एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. तसेच, यादिवशी होणाऱ्या पार्ट्यांमधून युवक-युवती यांच्यात मद्यपान, धूम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन आदी प्रकारात प्रचंड वाढ झाली आहे. या दिवशी मुलींवर प्रभाव पाडण्यासाठी भरधाव वेगाने वाहने चालवल्याने अपघातही होतात, तसेच काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना लव्ह जिहादचा बळी बनवतात.

आज साजरा होणारा व्हॅलेंटाईन डे बाबतचे निवेदन महसूलचे नायब तहसीलदार, तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये देण्यात आले आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री दत्तात्रय पिसे, संदीप ढगे, यश क्षीरसागर, रमेश आवार, उमाकांत नादरगी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

याचबरोबर सोलापूर येथील सेवासदन महाविद्यालय, ज्ञानप्रबोधिनी बालविकास मंदीर, सहस्रार्जून प्रशाला-इंग्लिश मिडियम, दयानंद कॉलेज, एस्.व्ही.सी.एस्. हायस्कूल, हरिभाई देवकरण यांसह  शाळा आणि  महाविद्यालयांत समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. या उपक्रमाला शिक्षक आणि मुख्याध्यापक यांचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद लाभला.

14 फेब्रुवारी या दिवशी पोलिसांची विशेष पथके, गस्ती पथके नियुक्त करून महाविद्यालय परिसरात गैरप्रकार करणाऱ्या समाजकंटकांना ताब्यात घेणे, वेगाने वाहने चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आदी उपाययोजना कराव्यात. व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी मार्गदर्शक सूचना निर्देशित करण्यात याव्यात, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

हे ही वाचलं का  

Back to top button