लियम लिविंगस्टोन महागडा विदेशी खेळाडू | पुढारी

लियम लिविंगस्टोन महागडा विदेशी खेळाडू

बंगळूर ; वृत्तसंस्था : आयपीएल 2022 साठी बंगळूर येेथे रंगलेल्या महालिलावात रविवारी दुसर्‍या दिवशीही खेळाडूंवर कोट्यवधी रकमेची उधळण झाली. इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन हा आतापर्यंतचा यंदाच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्जने लियम लिविंगस्टोन साठी तब्बल 11.50 कोटी रुपये मोजले. इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आता मुंबई इंडियन्समधून जसप्रीत बुमराहच्या जोडीने गोलंदाजी करताना दिसेल. 8 कोटींच्या किमतीत मुंबईने त्याला राजस्थानकडून आपल्याकडे घेतले.

सिंगापूर या असोसिएटेड देशातील खेळाडू टिम डेव्हिड याला मुंबईने निवडले. यासाठी मुंबईने 8.25 कोटी रुपये खर्च केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. डेव्हिड हा हार्दिक पंड्याची रिप्लेसमेंट मानली जातो. याचबरोबर अंडर-19 विश्वचषक विजेत्या खेळाडूंवरही चांगल्या बोली लागल्या. तुळजापूरचा राजवर्धन हंगर्गेकर याला दीड कोटी रुपयांना धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विकत घेतले. तर अष्टपैलू राज बावा याला दोन कोटी रुपयांना पंजाबने आपल्याकडे खेचले.

इंग्लंडच्या लिविंगस्टोनसाठी पंजाब किंग्सकडून तगडी बोली

इंडियन प्रीमिअर लीगच्या महालिलाव रविवारी दुसर्‍या दिवशी सुरू झाला असून इंग्लंडचा लियम लिविंगस्टोन ठरला महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. लियम लिविंगस्टोन यासाठी पंजाब किंग्जने तब्बल 11.50 कोटी रुपये मोजले. दुसर्‍या दिवशीच्या लिलावात तो सर्वात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. मागील सिझनमध्ये सनरायझर्स हैदराबादने लियमवर 2 कोटींची बोली लावली होती.

राहुल तेवतियाची बक्कळ कमाई

फिरकी गोलंदाज आणि फलंदाज राहुल तेवतिया याची मूळ किंमत 40 लाख होती. त्याच्यावर आरसीबी, चेन्नई आणि गुजरातने जोरदार बोली लावली. अखेर गुजरात टायटन्सने त्याला 9 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या मागील सिझनमध्ये तेवतिया हा राजस्थान रॉयल्सकडून खेळला यावेळी त्याला तीन कोटी रुपये मिळाले होते. आतापर्यंत त्याने आयपीएलमध्ये 48 सामने खेळले असून 521 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 32 बळीही आहेत.

या खेळाडूंची पाटी कोरीच!

इंग्लंडला विश्वचषक जिंकून देणारा ईयान मॉर्गन, ऑस्ट्रलियाचा वन-डेतील कर्णधार अ‍ॅरॉन फिंच, भारताचा कसोटी सलामीवीर चेतेश्वर पुजारा, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या चारही खेळाडूंकडे खरेदीदारांनी पाठ फिरवल्यामुळे या खेळाडूंची निराशा झाली आहे. इंग्लंडचा टी-20तील सर्वोत्कृष्ट फलंदाज डेव्हिड मलान, ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातील मार्नश लाबुशेन, भारताचा सौरभ तिवारी, न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळा़डू जिमी निशाम, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डन यांचीही पाटी कोरीच राहिली.

मागील वर्षीच्या आयपीएल सिझनमध्ये जिमी नीशम आणि सौरव तिवारी हे दोन्ही खेळाडू मुंबई इंडियन्सकडून खेळत होते तर डेव्हिड मलान हा पंजाब किंग्ज संघात होता. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये सर्वाधिक धावा करणार्‍या बीन मॅकडरमोट यालाही कोणी पसंती दिली नाही. तसेच न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स याचीही पाटी कोरीच राहिली आहे.

अभिषेक शर्माही मालामाल

अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्माही आजच्या लिलावात मालामाल झाला. त्याच्यावर सनरायजर्स हैदराबादने 6.50 कोटींची बोली लावली. अभिषेकवर बोली लावण्यासाठी हैदराबाद, पंजाब आणि गुजरात संघांमध्ये जोरदार टक्कर झाली. मागील सिझनमध्ये अभिषेक याला हैदराबादमध्ये 55 लाख रुपये मिळाले होते.

शिवम दुबे खेळणार चेन्नई सुपर किंग्जकडून

राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा ऑल राऊंडर खेळाडू शिवम दुबे यंदाच्या आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना आपल्याला दिसेल. त्याला चेन्नईने 4 कोटी रुपये देऊन आपल्या संघात समाविष्ट केले. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज ऑबेड मेकॉय याला राजस्थान रॉयल्सने 75 लाख रुपयांना खरेदी केले आहे. तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडोर्फ याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 75 लाखांची बोली लावली.

जोफ्रा आर्चरसाठी मुंबईची चढाओढ

आयपीएलच्या मागील सिझनमध्ये राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात असणारा इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला यंदा मुंबई इंडियन्सने तगडी बोली लावत आपल्या संघात घेतले. आज लिलवात राजस्थानेही जोफ्रा आपल्याच संघात राहण्यासाठी बोली वाढवत नेली. अखेर अंबानींनी बाजी मारत जोफ्रासाठी 8 कोटींची बोली लावली आणि त्याला आपल्या संघात घेतले. आता मुंबईच्या ताफ्यात जसप्रित बुमराह बरोबरच जोफ्रा सारखा तगडा वेगवान गोलंदाज असणार आहे.

अजिंक्य रहाणेवर केकेआरचा विश्वास

गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएलमध्ये खेळणार्‍या अजिंक्यला आयपीएल 2022 मेगा लिलावात नवीन संघ मिळाला आहे. आगामी हंगामात हा फलंदाज दोन वेळचा आयपीएल विजेता कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा भाग असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी झगडत असलेल्या रहाणेची कामगिरी खराब राहिली आहे, तरीही केकेआरने या अनुभवी खेळाडूवर विश्वास दाखवत त्याचा संघात समावेश केला. रहाणेने मेगा लिलावात 1 कोटीच्या मूळ किमतीसह आपले नाव नोंदवले होते आणि त्याच्यासाठी एकमेव बोली कोलकाता संघाने लावली होती आणि अशा प्रकारे तो मूळ किमतीतच केकेआरचा भाग बनला.

रहाणे कोलकाता संघात सामील होण्यासाठी उत्सुक आहे आणि त्याने चाहत्यांसोबत व्हिडीओद्वारे त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. केकेआरने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रहाणे म्हणाला की, ‘केकेआर कुटुंबात सामील होण्यासाठी मी खरोखर आनंदी आणि उत्साहित आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला माहीत आहे की, गेल्या काही मोसमात संघाने खरोखरच चांगली कामगिरी केली आहे आणि मला खात्री आहे की, या हंगामातही आम्ही एक संघ म्हणून चांगली कामगिरी करू. तसेच, गॅलेक्सी ऑफ नाईट्समध्ये सामील होण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. चीअर्स.’

अंडर-19 वर्ल्डकप गाजविणार्‍या राज बावाची हवा!

अंडर-19 वर्ल्डकप विजेत्या संघातील स्टार अष्टपैलू राज बावाने आयपीएलच्या मेगा लिलावात सर्व फ्रेंचायझींचे लक्ष वेधून घेतले. 20 लाख बेस प्राईस असलेल्या 19 वर्षीय पोराला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये चुरस पाहायला मिळाली. सरतेशेवटी पंजाबने बाजी मारत 2 कोटीवर सौदा आपल्या बाजूने केला. अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात राज बावाने इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले होते. फलंदाजीवेळी त्याने उपयुक्त 35 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

हायलाईटस्

पहिल्या दिवशी शांत असलेल्या मुंबई इंडियन्सने जयदेव उनाडकटला आपल्या ताफ्यात घेत दुसर्‍या दिवसातील पहिली खरेदी केली. त्याच्या पाठोपाठ त्यांनी मार्कंडेलाही 65 लाखांत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.

वेस्ट इंडिज वोडेन स्मिथवरही 6 कोटीचा डाव, पंजाबने आणखी एक मोठी खेळी करत कॅरेबियनला आपल्या ताफ्यात घेतले. नुकत्याच झालेल्या मालिकेतील त्याच्या खेळीमुळे त्याला चांगला भाव मिळणार हे निश्चित झाले होते.

गोव्याचा सुयश प्रभुदेसाई हा खेळाडू 30 लाख रुपये घेऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या ताफ्यात गेला.

मुंबई इंडियन्सकडून खेळलेला वेस्ट इंडिजचा सलामीवीर एव्हिन लुईस आता केएल राहुलच्या लखनौ संघाकडून खेळताना दिसणार. त्याला 2 कोटींच्या मूळ किमतीवर विकत घेण्यात आले.

इंग्लंडचा दमदार फलंदाज अलेक्स हेल्स याला दुसर्‍या फेरीत अखेर कोलकाताने दीड कोटीच्या बोलीवर संघात सामील करून घेतले.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस जॉर्डन याला चेन्नईच्या संघाने 3 कोटी 60 लाखांच्या बोलीवर संघात सामील करून घेतले.

आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलर याची मूळ किंमत 1 कोटीची होती. गुजरात संघाने 3 कोटींना त्याला विकत घेतले.

अनमोलप्रीत सिंहला मूळ 20 लाखांच्या बोलीवर मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतले.

पाकिस्तानला टी-0 वर्ल्डकपमध्ये बाहेरचा रस्ता दाखवणारा ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू वेड गुजरातच्या संघात सामील झाला. त्याच्यावर 2 कोटी 40 लाखांची बोली लागली.

अनुभवी वृद्धिमान साहा 1 कोटी 90 लाखांच्या बोलीवर गुजरातच्या संघात सामील झाला. तो गेल्या वर्षीपर्यंत हैदराबादच्या संघातून खेळत होता.

इंग्लंडचा फलंदाज सॅम बिलिंग्स याच्यावर कोलकाताने 2 कोटींच्या मूळ किमतीवर बोली लावली आणि त्याच किमतीत त्याला संघात घेण्यात आले.

अनुनय सिंह 20 लाखांच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सच्या संघात दाखल.

मोहम्मद अशरफ खान 20 लाखांच्या बोलीसह मुंबई इंडियन्सच्या संघात दाखल. तसेच 1 कोटीची बोली लावत मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाज रायली मेरिडिथला संघात दाखल करून घेतले.

अल्जारी जोसेफवर 2.40 कोटींची बोली लावत गुजरात टायटन्सची बाजी.

Back to top button