सातारा : वनरक्षक मारहाण प्रकरण: जानकरची वन समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी - पुढारी

सातारा : वनरक्षक मारहाण प्रकरण: जानकरची वन समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी

सातारा : पुढारी वृत्तसेवा :  पळसावडे  येथे वनरक्षक सिंधू सानप व सूर्यकांत ठोंबरे यांना मारहाण करणारा माजी सरपंच राजाराम जानकर याच्या विरोधात वन विभाग आक्रमक झाला आहे. जानकर याला अटक केल्यानंतर वन विभागाने त्याची पळसावडे वन समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी केली आहे, तर अन्य विकासकामे रडारवर असून, यामध्ये निकृष्ट कामे सापडल्यास कारवाई होणार आहे.

काही दिवसांपूर्वी पळसावडे येथे वनरक्षक महिला सिंधू सानप व त्यांचे पती सुर्यकांत ठोंबरे यांना राजाराम जानकर व त्याच्या पत्नीने लाथा बुक्क्यानी मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची दखल वरिष्ठ अधिकार्‍यांसह मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांनी घेतली होती. याप्रकरणी सानप यांच्या तक्रारीवरून जानकर याच्या विरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांवरही (Police) दबाव आल्याने पोलिसांनी तत्काळ सूत्रे हलवत जानकर याला अटक केली. तो आता कस्टडीमध्ये आहे. दरम्यान, जानकर याच्याविरोधात शिक्षक, अंगणवाडी सेविका यांच्यासह अधिकार्‍यांना त्रास देण्याचे काम जानकर करत होता. जिल्हा परिषदेत व पंचायत समितीमध्ये येऊन राजकीय नेत्यांच्या नावाखाली तो अधिकारी व कर्मचार्‍यांना दमदाटी व धमकावण्याचे प्रकार करीत असल्याचे आता समोर आले आहे. जानकर हा या भागातील सर्व विकासकामे करण्यासाठी कंत्राटे घेत होता. गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधींची कामे त्याने केली आहे. मात्र, आता त्याने वनरक्षकाला मारहाण केल्याने वन विभागाचे
वरिष्ठ अधिकारी आक्रमक झाले आहेत.

जानकर याने वन विभागातील यापूर्वी कोणती कामे केली. ती कामे व्यवस्थित व निकषानुसार केली का हे तपासण्याची सुरूवात अधिकार्‍यांनी केली आहे. तसेच जानकर हा पळसावडे वन समितीचा विद्यमान अध्यक्ष होता. परंतु, त्याने वन विभागाच्याच कर्मचार्‍याला मारहाण केल्याने अधिकार्‍यांनी त्याचे अध्यक्षपद काढून घेतले आहे. ग्रामस्थांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढेही जानकर याच्याविरोधात अ‍ॅक्शन घेणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे जानकर याचा पाय आणखी खोलात गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचलं का 

Back to top button