

पिंपोडे बुद्रूक : कमलाकर खराडे
गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने हवामान बदलत आहे. त्याचा रब्बी हंगामातील मुख्य पीक असणार्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह आले, बटाटा, ऊस या भांडवली खर्चाच्या नगदी पिकांवरही परिणाम झाला आहे. परिणामी या पिकांच्या उत्पादनात मोठी घट येण्याच्या शक्यतेने बळीराजा चिंतातूर झाला आहे.
कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. गतवर्षी जून महिन्यांपासून पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामात मोठे आर्थिक नुकसान शेतकर्यांना सहन करावे लागले होते. ज्या खरीप हंगामातील पिकांवर वर्षभराचे आर्थिक नियोजन केले जाते.तो हंगाम वाया गेल्याने मोठ्या आर्थिक संकटाला शेतकर्यांना सामोरे जावे लागले.अवेळी पावसामुळे रब्बी हंगामासाठी जमिनी तयार करण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करावा लागला. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्या उशिरा झाल्या. योग्य वातावरणात पेरण्या न झाल्याने पिकांची अपेक्षित वाढ झालेली नाही.दररोज वेगळ्या वातावरणाचा अनुभव शेतकरी घेत आहेत.
यावर्षी थंडी जवळपास गायबच झाली होती. थंडी नसल्याने हरभरा पिकाची वाढ खुंटली तर गव्हाच्या उत्पन्नात मोठी घट होण्याची शक्यता होती. गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली. त्यामुळे आता पिके बरी येतील, अशी आशा बळीराजाला आहे.डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाने ज्वारीची पिके भुईसपाट केली, हरभरा पिकावरील आंब नष्ट झाल्याने त्याची वाढ खुंटली आहे. गव्हाच्या पिकावर तांबेरा येत असल्याने औषध फवारणीचा खर्च वाढला आहे.
वयाची पंच्याहत्तरी गाठलेले वयस्कर लोक उभ्या हयातीत कधी असलं हवामान पाहिले नसल्याचे सांगत आहेत. बदलत्या हवामानामुळे यावर्षी ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.मूळातच ग्रामीण अर्थ व्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतकर्याच्या खिशात पैसा असेल तर बाजारपेठेत तेजी असते. मात्र बदलत्या वातावरणामुळे शेतीचे नुकसान, पडलेले शेतमालाचे भाव यामुळे बाजारपेठा ओस पडू लागल्या आहेत. पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती वर्तवली जात असल्याने नागरिक दहशतीखाली आहेत
हेही वाचलतं का?