पक्षाने अनेकांना दिले पण पतंगराव मुख्यमंत्री झाले नाहीत : खा. रजनी पाटील

पक्षाने अनेकांना दिले पण पतंगराव मुख्यमंत्री झाले नाहीत : खा. रजनी पाटील

विटा; पुढारी वृत्तसेवा ; आजवर काँग्रेस पक्षाने अनेकांना मोठमोठी पदे दिली. परंतु, स्व. डॉ. पतंगराव कदम यांच्यासारखे व्यक्तीमत्त्व काही मुख्यमंत्री होऊ शकले नाही अशी खंत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि जम्मू- काश्मीरच्या प्रभारी खासदार रजनी पाटील यांनी बोलून दाखवली.

खानापूर तालुक्यातील पारे-बामणी येथील उदगिरी शुगर अॅन्ड पॉवरच्या दहाव्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज मंगळवारी (दि.११) रोजी गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून झाला. यावेळी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार रजनी पाटील प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार मोहनराव कदम, कारखान्याचे संस्थापक डॉ. शिवाजीराव कदम, अध्यक्ष डॉ. राहुल कदम, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी विभागप्रमुख कमलाकर पाटील, माजी कुलगुरू डी. पी. साबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

खासदार पाटील म्हणाल्या की, उसापासून शंभर उपपदार्थांची निर्मिती होते, असे माझ्या वाचनात आले आहे. आमचा कारखाना दहा वर्षे अडचणीत होता. आता आम्ही तो पुन्हा नव्याने उभारत आहोत. आम्ही मराठवाड्यातील लोक पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मागे आहोत. माझे माहेर जरी पश्चिम महाराष्ट्रातील असले तरी, मराठवाड्यातील लोकांच्या समस्या मी जवळून अनुभवल्या आहेत. माऊली विद्यापीठाच्या उभारणीत कै. डॉ. पतंगराव कदम यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या प्रेरणेमुळेच ते विद्यापीठ उभा राहिले. देशात कुठेही गेले तर पुण्याचा उल्लेख झाला की, भारती विद्यापीठचा उल्लेख होतो. डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. शिवाजीराव कदम हे आमचे बंधू आहेत, असे आम्ही अभिमानाने सांगतो, असेही खासदार पाटील म्हणाल्या.

डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उदगिरी साखर कारखाना उभारला आहे. या माध्यमातून दुष्काळी भागाचा विकास व्हावा, हाच हेतू होता. आता पाण्याची उपलब्धता झाल्याने ऊस उत्पादन वाढणार आहे. लवकरच कारखान्याचा विस्तार करणार आहे. त्यानंतर जवळपास ६ हजार मेट्रीक टन क्षमतेने गाळप करता येईल, तर एक लाख लीटर क्षमतेने डिस्टीलरी प्रकल्प चालणार आहे. कारखाना परिसरात मोठे सभागृह बांधणार आहे. हमीभावापेक्षा आम्ही आतापर्यंत ६८ कोटी रूपये जादा दिले आहेत. ज्या भूमीत जन्माला आलो, त्यासाठी काहीतरी करायचे होते, असेही डॉ. कदम म्हणाले.

डॉ. राहुल कदम म्हणाले की, टँकरने पाणी आणून आपण साखर कारखाना उभा केला. पहिल्या तीन हंगामासाठी टँकरने पाणी आणले आहे. आता तो प्रगतीपथावर आहे. डॉ. शिवाजीराव कदमांवर लोकांनी विश्वास दाखवला आहे. त्यामुळे खाजगी कारखान्यांच्या यादीत उदगिरी कारखाना देशात अव्वल स्थानावर आहे. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शेतीला उद्योगाची जोड असली पाहिजे, असे डॉ. शिवाजीराव कदम यांचे मत आहे. त्यामुळे हा कारखाना शेतकऱ्यांच्या मदतीने यशाची शिखरे गाठेल. कारखान्यान्याच्या भागातील ३३ गावातील शाळांना मदत केली आहे. तर सीएसआर फंडातून ९० लाखांची कामे केली आहेत.

यावेळी कमलाकर पाटील यांनी साखर कारखानदारीच्या भविष्यातील वाटचालीबाबत चिंता व्यक्त केली. डॉ. राहुल कदम यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. बशिर संदे यांनी सूत्र संचालन केले, तर उत्तम पाटील यांनी आभार मानले. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष रविंद्रअण्णा देशमुख, ज्येष्ठ नेते रामरावदादा पाटील, नंदकुमार पाटील, जे. के. जाधव, मालन मोहिते, डी. ए. माने, सयाजीराव धनवडे, शशिकांत देठे, भरत लेंगरे, अभिजीत शिंदे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news