मढी : मच्छिंद्रनाथ देवस्थानला मिळणार 73 कोटी: आमदार सुरेश धस; मायंबा नाथभक्तांचा दसरा मेळावा उत्साहात

मढी : मच्छिंद्रनाथ देवस्थानला मिळणार 73 कोटी: आमदार सुरेश धस; मायंबा नाथभक्तांचा दसरा मेळावा उत्साहात

मढी, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील नाथांच्या समाधी स्थळांचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत मच्छिंद्रनाथ देवस्थानला 73 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली.
मायंबा येथे नाथ भक्तांचा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रसंत बद्रीनाथ तनपुरे, बबन महाराज बहिरवाल, अशोक महाराज मरकड, भागवत महाराज उंबरेकर, कीर्तनकार म्हातारदेव आठरे, छगन मालुसरे, ज्ञानेश्वर गव्हाणे, संभाजी दहातोंडे आदी उपस्थित होते.

राज्यामध्ये मढी येथील चैतन्य कानिफनाथ, बीड जिल्ह्यातील जालिंदरनाथ (येवलवाडी), गहिनीनाथ (चिंचोली), नगर जिल्ह्यातील गोरक्षनाथ गड (डोंगरगण), सांगली जिल्ह्यातील रेवणनाथ (विटा), सोलापूर जिल्ह्यातील नागनाथ (वडवळ), नांदेड जिल्ह्यातील भरतरीनाथ (हरंगुळ) ही नाथांची समाधी स्थळे आहेत. या स्थळांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पर्यटन विभागाने सुमारे तीनशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

आमदार धस म्हणाले, महामारीच्या काळात केवळ मच्छिंद्रनाथ देवस्थाननेच कोविड सेंटर चालवून सेवाभाव जपला. मच्छिंद्रनाथ देवस्थानकडे येणारे सर्व रस्ते दर्जेदार करून भाविकांना सुख सुविधा देऊ. मंदिराची जागा कमी पडत आहे. मच्छिंद्रनाथांच्या मुख्य समाधी मंदिराचे काम दिवाळीपासून सुरू करून लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बद्रिनाथ महाराज तनपुरे म्हणाले, नाथ संप्रदायाचे विकसित रूप म्हणून वारकरी संप्रदायाकडे पाहिले जाते. नाथ संप्रदायापासून स्री सन्मानाचे पहिले पर्व सुरू झालेय. देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के यांनी स्वागत केले. विधिज्ञ साहेबराव म्हस्के यांनी प्रास्ताविक केले. सरपंच राजेंद्र म्हस्के यांनी आभार मानले. रमेश तांदळे, संजय गाढवे, भानुदास महाराज म्हस्के, मच्छिंद्र चितळे, अनिल म्हस्के, संदीप खाकाळ, राजेंद्र दहातोंडे, उद्धव शिरसाठ, अय्युब शेख, शरद गिरी आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news