एसटी वेळेवर येईना; विद्यार्थी घरी लवकर पोहोचेना! आंदर मावळातील विद्यार्थ्यांचे हाल | पुढारी

एसटी वेळेवर येईना; विद्यार्थी घरी लवकर पोहोचेना! आंदर मावळातील विद्यार्थ्यांचे हाल

टाकवे बुद्रुक : एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे अद्याप मावळ तालुक्यातील खेडोपाडीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी तासनतास एसटी बसची वाट पाहत बसावे लागत आहे. अनेक वेळा वेळेवर बस न आल्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत आहे.

बसस्थानकावर सुविधांचा अभाव

आंदर मावळातील वाहनगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आहे. या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एस. टी. महामंडळाची लालपरी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांना रात्री उशिरापर्यंत स्थानकावर बसची वाट पाहत बसावे लागत आहे. या परिसरात घनदाट जंगल असून येथे रात्रीच्या वेळस कोणतीही सोईसुविधा नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती

मावळ तालुक्यामधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या शहरात जावे लागते. शाळेत जाण्यासाठी त्यांना एसटीशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. वाहनगाव येथील शाळा सायंकाळी चार वाजता सुटते. मात्र, एसटी बस वेळेवरती येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना सायंकाळी सात वाजेपर्यंत स्थानकावरच बसावे लागत आहे. मुली वेळेत घरी न पोहोचल्यामुळे घरातील पालक चिंतेत असतात. या अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षलोकप्रतिनिधी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ची घोषणा करतात. परंतु, लोकप्रतिनिधी मुलींच्या शिक्षणाकडे मात्र लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. सायंकाळी सात वाजले तरी कोणतेही वाहन उपलब्ध होत नाही. तसेच, बसस्टॉपवरदेखील बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेळेवर मुले घरी नाही आली, तर पालकांना स्वत:ची गाडी घेऊन जावे लागत आहे.

आम्हाला शासनाने वेळेवर बस उपलब्ध करून द्यावी. बस वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आम्हाला शाळेतील अभ्यास पूर्ण करता येत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच, आमच्या भागात मोबाईलला रेंज नसल्यामुळे घरीदेखील काही संपर्क होत नाही. त्यामुळे आम्ही घरी पोहोचेपर्यंत पालकदेखील चिंतेत असतात.
– विद्यार्थिनी

खांडी, कुसूर, निळशी, बोरवली, डाहुली, कांब्रे, कुसली या परिसरातील विद्यार्थी वाहणगाव येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु, एस. टी. बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून वेळेवरती एसटी बस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी व विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी.
– राजू तुर्डे, पालक

एस.टी. महामंडळाची लालपरी वारंवार बंद पडत आहे. तसेच, एसटी डेपोतून बस निश्चित वेळेत सुटत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यासाठी एसटी डेपोतील अधिकार्‍यांना वारंवार निवेदन देऊनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
– दत्ता म्हसे, निळशी पालक

Back to top button