सोनई, पुढारी वृत्तसेवा: चालू वर्षीच्या गळीत हंगामात देशात जवळपास 360 लाख टन, तर राज्यात 140 लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. नवीन हंगाम सुरू होताना देशात 60 लाख टन व राज्यात 30 लाख टन साखर शिल्लक राहणार असून, या हंगामातील महाराष्ट्रातले उत्पादन 140 लाख टन होण्याची शक्यता आहे. म्हणून कारखान्यांचे शिल्लक साठे कमी करून आर्थिक तरलता येण्यासाठी आणि स्थानिक बाजारात साखरेचे दर वाढण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने चालू वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच निर्यात खुली करण्याचा निर्णय घ्यावा. यात किमान 100 लाख टन साखर निर्यात करण्यासाठी कारखान्यांना परवानगी द्या, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार शंकरराव गडाख यांनी केली.
मुळा कारखान्याचा सोमवारी (दि.10) 45 वा गळीत हंगामानिमित्त पूजेचा कार्यक्रम पार पडला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार गडाख व कुलगुरु गडाख यांच्या हस्ते विधीवत पूजा करून ऊसाची मोळी गव्हाणीत वाढविण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मुळा कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक, अधिकारी व कर्मचार्यांतर्फे कुलगुरु डॉ. गडाख यांचा आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कष्ट आणि कर्तृत्वामुळे त्यांना कुलगुरु पद मिळाले आहे; मात्र कुलगुरु झाले तरी, या परिसराशी नाते कायम राहिल, अशी अपेक्षा आमदार गडाख यांनी व्यक्त केली.
आमदर गडाख म्हणाले, शासनाने इथेनॉलचे पूर्वी दर ठरवून दिले, त्यानंतर ऊसाच्या एफआरपीत केंद्र सरकारने वाढ केली. त्या प्रमाणात इथेनॉलच्या दरातही वाढ करण्याची गरज आहे. साखरेच्या विक्रीची किमान आधार किंमत 3100 रुपयेवरून 3600 रुपये करण्याची कारखानदारांची मागणी अद्याप मान्य झाली नाही. त्यामुळे साखर कारखानदारीला तोटे सहन करावे लागत आहे. एफआरपी देण्यास अडचणी येत आहे. बायप्रॉडक्ट असले तरी साखर युनिटमध्ये झालेला तोटा भरून निघू शकत नाही. ऊसाच्या धर्तीवर शेतकर्यांचा जोडधंदा असलेल्या दुधाचे दरही निश्चित करण्याची गरज आहे. ऊस, साखर आणि दुधाचे दर चांगले मिळाल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही.
कार्यक्रमात सुरुवातीला कारखान्याचे संचालक बाळासाहेब गोरे व बबनराव दरंदले यांनी सपत्नीक गव्हाणीची पूजा केली. कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर यांनी स्वागत केले. कारखान्याचे सभासद व माजी पंचायत समिती सभापती कारभारी जावळे, ज्येष्ठ सभासद बापूसाहेब गायके यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी प्रास्ताविक केले. सचिव रितेश टेमक यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले यांनी आभार मानले.
याप्रसंगी विश्वास गडाख, जबाजी फाटके, नाथा घुले, नंदकुमार पाटील, लक्ष्मणराव जगताप, नानासाहेब रेपाळे, सुरेश गडाख, मदनराव डोळे, प्रा.गणपतराव चव्हाण, सीताराम झिने, भाऊसाहेब लांडे, रावसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, भगीरथ जाधव, आदिनाथ रौंदळ, भाऊसाहेब सावंत, तुकाराम शेंडे, कैलास जाधव, अशोक मंडलिक, प्रकाश शेटे, प्रा. रामकिसन शिंदे, दगडू इखे, बबन भुजबळ, पांडुरंग माकोणे, जालू येळवंडे, बाळासाहेब बोरूडे, दादासाहेब होन, पी. आर. जाधव, एकनाथ रौंदळ, दत्ता लोहकरे, कृष्णा तांदळे, शौकत सय्यद, दिलीपराव मोटे, उत्तमराव लोंढे, प्रा. हरिभाऊ मोरे, प्रा. विनायक देशमुख, प्राचार्य जी.बी.कल्हापुरे आदी उपस्थित होते.
पाऊस झाला नाही, तर 15 तारखेपासून गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन असून, यंदा एप्रिल महिन्या अखेरीस सर्व ऊसाचे गाळप पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल. रोज किमान सरासरी 8500 टन गळीत करून साखर उतारा वाढण्यासाठी प्रयत्न केले जातील. शेतकी विभागामार्फत तोडणीचा कार्यक्रम काटेकोरपणे राबविण्यात येईल. ऊसाला उन्हाळ्यात पाणी कमी पडून देणार नाही. पुढच्या वर्षी ऊसाचे प्रमाण ज्यादा राहिल, या दोन वर्षांत जास्तीत जास्त गाळप करून वीज आणि इथेनॉल प्रकल्पातून वाढीव उत्पादन घेऊन इथेनॉल प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाचा आणि व्याजाचा बोजा कमी केला जाईल. मात्र, शेतकर्यांनी त्यासाठी सहकार्य करावे. उसाची अन्य विल्हेवाट करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
मागच्या हंगामात गळीत लांबल्याने शेतकर्यांना जो त्रास झाला, तो यंदा होणार नाही. मागच्या हंगामात मोठ्या प्रमाणात बिगर नोंद ऊस असल्याने ऊस तोडीच्या नियोजनात अचानक बदल करावे लागले. उशिरापर्यंत कारखाना चालवून एप्रिल व मे महिन्यात तुटलेल्या ऊसाला अनुदान द्यावे लागले. म्हणून शेतकर्यांनीही उसाच्या नोंदी वेळेवर दिल्या पाहिजेत. ऊस तोडणीसाठी काही ठिकाणी लेबरने पैसे मागितल्याच्या तक्रारी आल्या होत्या, तो अनुभव जमेला धरून यंदा हंगाम सुरू होण्यापूर्वीच मुकादम आणि हार्वेस्टर मालकांची बैठक घेऊन शेतकर्यांकडे पैसे मागू नयेत अशा सक्त सूचना त्यांना दिल्या आहेत. मात्र, शेतकर्यांनीही ऊस तोडणीसाठी एक रुपयाही कोणाला देण्याची गरज नाही. शेतकर्यांनी हार्वेस्टरने ऊस तोडू देण्याची तयारी ठेवली पाहिजे.
मुळा कारखान्याच्या सभासदांनी केलेला सत्कार हा घरचा सत्कार आहे. कारण, मीही सभासद आहे. हा सत्कार म्हणजे मला मिळालेली ऊर्जा असून, भावी आयुष्यात उपयोगी पडणार आहे. तुम्ही दिलेले प्रेम आणि ऊर्जेच्या बळावर कुलगुरु पदाच्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करील, असे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.