नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाबमधील (pm security breach) प्रवासाचे सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरलना दिले. पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले असून केंद्र सरकारने या मुद्द्यावरून पंजाब सरकारवर कोरडे ओढले आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चुकीचे प्रकरण हे दुर्मिळातील दुर्मिळ आहे. जागतिक स्तरावर यामुळे भारताची मान खाली गेली असून पंतप्रधानांसाठी असलेला धोका ठळकपणे समोर आला आहे, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आला.(pm security breach)
पंजाब सरकारकडून केल्या जात असलेल्या तपासावर केंद्राने या तपासात राज्याचे गृहमंत्रीसुध्दा येतात, त्यामुळे चौकशी समितीत त्यांचा समावेश अयोग्य असल्याची टिप्पणी केली. हे प्रकरण सीमेपलीकडील असल्याचा दावादेखील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. या प्रकरणावरील पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या हलगर्जीपणाविषयी चिंता व्यक्त केली. (Prime Minister Security)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपतींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षाविषयक हलगर्जीपणाविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या गंभीर घटनेविषयी चिंता व्यक्त केली.