विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का?; कोच राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा, म्हणाले… | पुढारी

विराट कोहली तिस-या कसोटीत खेळणार का?; कोच राहुल द्रविड यांचा मोठा खुलासा, म्हणाले...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवानंतर आता दुखापतग्रस्त कर्णधार विराट कोहलीबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत विराटच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट दिली आहे. त्यांच्या विधानानंतर तिसऱ्या कसोटीत विराटच्या संघात पुनरागमनाची शक्यता वाढली आहे.

केपटाऊन कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली खेळणार की नाही याबद्दल मोठी प्रतिक्रिया उमटली. तर कोच राहुल द्रविड यांनी कोहलीच्या पुढील कसोटीतील उपस्थितीबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. विराट सध्या फिट असून तो पुढील सामना खेळू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला. पाठदुखीमुळे तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या ऐवजी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलकडे देण्यात आली. तर त्याच्या जागी हनुमा विहारीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कर्णधार कोहलीच्या अनुपस्थितीचा परिणाम टीम इंडियाच्या फलंदाजीवरही दिसून आला आणि दोन्ही डावात संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. त्यामुळे टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

जोहान्सबर्ग कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट कोहलीबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. तसेच तो पुढचा सामना खेळणार की नाही द्रविड यांनी सांगितले. ते म्हणाले, विराट पूर्णपणे बरा असावा. मी त्याच्याकडून थ्रोडाउन करून घेईन. आशा आहे की केपटाऊनमधील काही नेट सत्रांनंतर तो खेळण्यासाठी तयार होईल. मी फिजिओशी जास्त बोललो नाही पण कोहलीच्या फिटनेसमध्ये खूप सुधारणा होत आहे. पुढच्या कसोटी सामन्याला अजून चार दिवसांचा कालावधी आहे. तोपर्यंत विराट पूर्णपणे तंदुरुस्त झाला पाहिजे, असे सांगितले.

तत्पूर्वी, कर्णधार डीन एल्गरच्या झुंजार 96 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 विकेट राखून विजय मिळवला. या विजयामुळे तीन सामन्यांची कसोटी मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. चौथ्या दिवशी पावसाने निम्मा खेळ वाया गेला; पण खेळ पुन्हा सुरू झाला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 122 धावांची गरज होती. हे लक्ष्य गाठताना यजमान संघाने दिवसात फक्‍त डुसेनच्या रुपाने एक गडी गमवला.

सामन्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीची दोन सत्रे पावसामुळे वाया गेली. तिसर्‍या सत्रात 34 षटकांचा खेळ होणार असल्याची घोषणा करण्यात आली. डीन एल्गर आणि रुसी-व्हॅन-डर-डुसेन यांनी गुरुवारी फलंदाजीला सुरुवात केली. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने डुसेनला माघारी धाडले; पण त्यानंतर टेम्बा बावुमासोबत एल्गरने भागीदारी रचत विजयावर शिक्‍कामोर्तब केले. शतकापासून चार धावांनी वंचित राहिलेल्या एल्गरला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

दुसर्‍या डावात फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 240 धावांचे लक्ष्य होते. तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा आफ्रिकेने 40 षटकांत 2 बाद 118 धावा केल्या होत्या. मोहम्मद शमीने डुसेनला पुजाराकरवी झेलबाद केले. डुसेनने 5 चौकारांसह 40 धावा केल्या. त्यानंतर एल्गरने टेम्बा बावुमासोबत भागीदारी रचली. एल्गरने 10 चौकारांसह नाबाद 96 तर बावुमाने नाबाद 23 धावा केल्या. मालिकेतील तिसरा आणि निर्णायक कसोटी सामना 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

Back to top button