बीड : मांगवडगावच्या शिक्षकावरही 'त्‍या' तरूणीकडून हनी ट्रॅप; गुन्हा दाखल | पुढारी

बीड : मांगवडगावच्या शिक्षकावरही 'त्‍या' तरूणीकडून हनी ट्रॅप; गुन्हा दाखल

केज (बीड) ; पुढारी वृत्‍तसेवा

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन लुबाडणाऱ्या तरुणी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता त्‍याच तरूणी विरूध्द आणखी एक गुन्हा धारूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज पोलीस ठाण्यात केज येथील एका परित्यक्ता तरुणीवर तिने एका कार चालकावर लैंगिक अत्याचार केल्याची खोटी धमकी देऊन एक लाख रुपये लुटल्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ती तरुणी अटकेत असून, तिला ७ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान तिची पोलीस कोठडी संपण्या पूर्वीच दि. ६ जानेवारी रोजी धारूर पोलीस ठाण्यात केज तालुक्यातील मांगवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले बाजीराव घनश्याम चौरे रा. तुकुचीवाडी यांनी सदर तरुणी विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

त्‍यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की, सहशिक्षक बाजीराव चौरे व त्या महिलेचे मैत्रीपूर्ण संबंध होते. दि. ९ सप्टेंबर २०२१ रोजी ती चौरे यांना सोबत घेऊन धारूर येथे मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेली. तेथे अशोक मिसाळ आणि इतर अनोळखी चार ते पाचजणांनी मिळून बाजीराव चौरे यांना तरुणी सोबत अश्लील चाळे करायला लावले. तिच्यावर प्रेम आहे असे त्याच्या कडून वदवून घेतले आणि त्याचे मोबाईलने व्हिडीओ चित्रण केले. त्या नंतर त्यांनी बाजीराव चौरे यास धमकी देत त्याला मारहाण केली आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याची पोलिसात खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.

तसेच हे प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रूपयांची मागणी केली. तसेच जर पैसे दिले नाहीत तर लैंगिक आत्याचार केल्याची तक्रार देऊन जेलमध्ये टाकू. अशी धमकी देऊन त्‍यांना जीवे मारण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती सहशिक्षिक बाजीराव चौरे यांनी (गुरूवार) साहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कार्यालय केज येथे भेटून दिली. त्या नुसार सदर तरुणी विरुद्ध धारूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या सहशिक्षक बाजीराव चौरे यांच्यावर गुजरलेल्या बनावट हनीट्रॅप प्रकरणाचा तपास धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव हे करीत आहेत.

Back to top button