सोलापूर : करमाळ्याच्या केळींना उत्तर भारतातून मागणी

सोलापूर : करमाळ्याच्या केळींना उत्तर भारतातून मागणी
Published on
Updated on

करमाळा, पुढारी वृत्तसेवा : केळींच्या दरात मागील दोन-तीन दिवसांत चांगली सुधारणा झाली आहे. दर्जेदार केळींना उत्तर भारतातून चांगला उठाव आहे. करमाळा तालुक्यातील केळींना सध्या दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू-काश्मीर येथून मोठी मागणी असून तालुक्यातील केळी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतात निर्यात होत आहेत.

करमाळा तालुक्यासह टेंभुर्णी, कंदर, वाशिंबे, उमरड, शेटफळ, चिखलठाण, वांगी या भागांत मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन होते. त्यामुळे या भागांतून सध्या रोज 50 ट्रक (एक ट्रक 10 टन क्षमता) केळीची निर्यात उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर येथे होत आहे. केळींचे दर मागील आठवड्यात 4 ते 5 रुपये किलो असे होते. 25 तारखेपासून रमजान मासारंभ होत असल्याने उत्तरेकडून केळींची मोठी मागणी सुरू झाली आहे. परिणामी दरात सुधारणा झाली असून, 7 ते 8 रुपये किलो दर शिवार खरेदीत मिळत आहे.

एकेकाळी देशात जळगाव हे केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. पण आता जळगावबरोबर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याचे नाव देश-विदेशात केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध झाले आहे. करमाळा तालुक्यातील केळी दर्जेदार व निर्यातक्षम असल्याने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, जम्मू-काश्मीर, दिल्लीबरोबरच आखाती देशातसुद्धा निर्यात होऊ लागल्याने शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले आहे. एकेकाळी सदैव दुष्काळी तालुका म्हणून करमाळ्याची ओळख होती. ज्वारी, बाजरी, गहू, मका या पिकांशिवाय दुसरे पीक शेतकरी घेत नसे, कारण या भागातील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून होती. पाऊस पडला, तर शेती पिकत असे. 1972 मध्ये करमाळा व माढा तालुक्याच्या सीमेवर उजनी धरण साकारल्यानंतर तालुक्याची दुष्काळी ओळख हळू हळू नष्ट झाली.

उजनी धरणामुळे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील वांगी, उमरड, शेटफळ, चिखलठाण, कुगाव, केत्तूर, टाकळी, खातगाव, कात्रज, कोंढारचिंचोली अशा 29 गावांतील संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आले व या भागातील शेतकरी ऊस उत्पादनाकडे अधिक लक्ष देऊ लागला. पण गेल्या पाच-सहा वर्षार्ंपासून साखर कारखानदारी अडचणीत आल्याने व उसाला योग्य भाव मिळत नसल्याने ऊस पीक शेतकर्‍यास परवडत नसल्याने तो केळी पिकाच्या लागवडीकडे वळला.

करमाळा तालुक्यात सुरुवातीस कंदर परिसरात केळीचे पीक शेतकर्‍यांनी घेतले. केळीला मागणी असल्याने व किफायतशीर भाव मिळत असल्याचे पाहून तालुक्यातील शेतकरी हळूहळू केळी उत्पादनाकडे वळला. करमाळा तालुक्यात तब्बल 15 हजार हेक्टर क्षेत्रावर केळीच्या बागा उभ्या आहेत. करमाळा तालुक्यातील एकट्य कंदर भागातून अडीच हजार हेक्टर क्षेत्र, तर संपूर्ण उजनी धरण काठावरील शिवारातून पाच हजार टन केळी दरवर्षी निर्यात होऊ लागली आहे.

आंध्र प्रदेशातील केळी संपल्याचा लाभ

उत्तर भारतात आंध्र प्रदेशातून मोठ्या प्रमाणात केळींची निर्यात होते. मात्र सध्या आंध्रातील केळी संपल्याने जिल्ह्यातील विशेषत: करमाळा तालुक्यातील केळींना मोठी मागणी आली आहे. त्याचा लाभ केळी पुरवठादारांना होत आहे. सध्या उजनी परिसरात निर्यातक्षम केळी उपलब्ध होत असल्याचे केळी खरेदीदारांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का?

आंध्र प्रदेशातील केळींचा हंगाम संपला आहे. तेथील केळींची निर्यातही उत्तर भारतात अधिकची होत असते. आंध्र प्रदेशातील केळी संपल्याने त्याचा लाभ जिल्ह्यातील केळी पुरवठादारांना होत आहे.
– सनी इंगळे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news