पणजीत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी?; भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल | पुढारी

पणजीत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी?; भाजप पक्षश्रेष्ठी अनुकूल

पणजी : पुढारी वृत्तसेवा

भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी पणजी मतदारसंघातून आतानासिओ मोन्सेरात उर्फ बाबूश यांना उमेदवारी जाहीर करण्याची घाई चालवली आहे. असे असले तरी राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पातळीवर माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी देण्याविषयी विचार सुरू झाला आहे.

गेल्याच आठवड्यात याबाबत उत्पल पर्रीकर यांना दिल्लीत पाचारण करून पक्षाच्या वरिष्ठांनी उत्पल यांचे मन जाणून घेतले आहे. उत्पल यांनी दिल्लीतील बैठकीत आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या या ठामपणाबाबत पक्षाध्यक्ष नड्डा यांनाही कल्पना देण्यात आली आहे.

उत्पल यांच्या भूमिकेकडे इतर पक्षांचेही लक्ष आहे. उत्पल यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात पणजीतून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला तर इतर पक्षही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करू शकतात. तशी माहिती हस्ते परहस्ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. भाजपने पणजीतील उमेदवारी जाहीर करेपर्यंत वाट पहावी की नाही याबाबत उत्पल सध्या विचार करत आहेत. ऐनवेळी उमेदवारी नाकारली गेली तर निवडणूक तयारीला वेळ शिल्लक राहणार नाही, असे उत्पल यांना जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या दोन-चार दिवसांत ते आपली भूमिका जाहीर करू शकतात.

भाजप दिवंगत मनोहर पर्रीकर यांचा वारसा संपवण्यास निघाला आहे, असे एक वाक्य जरी उत्पल यांनी उच्चारले तर भाजपसाठी ते किती त्रासदायक ठरू शकते याचा अंदाज पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे उत्पल यांनी कोणतेही वावगे पाऊल टाकू नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत. असे असले तरी उत्पल यांनी आता माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी आपण निवडणूक रिंगणात असणारच, असे कार्यकर्त्यांना आश्वस्त केले आहे. त्यांनी सध्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू ठेवले असून, त्याचा परीघ आता ते विस्तारणार आहेत. दिवंगत पर्रीकर यांना मानणारा मोठा वर्ग पणजीत आहे.

भाजपचे पारंपरिक मतदार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यांच्या व्यतिरिक्त हे मतदार 1994 पासून सातत्याने पर्रीकर यांच्यासोबत राहिले आहेत. आताही उत्पल यांनी निवडणूक लढवावी यासाठी त्यांचा आग्रह आहे. पणजी या राजधानीच्या शहराची ओळख तेच टिकवू शकतील, असे त्यांना वाटते. त्या समर्थकांचा विचार करून उत्पल यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ट्विटरवर आता मागे वळून बघणे नाही, असे नमूद करून उत्पल यांनी आपला निर्णय ठाम असल्याचे संकेत सर्वांनाच दिले आहेत.

विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी आता फेरविचार नाही. अद्याप भाजप उमेदवारी देईल, याविषयी खात्री आहे. विविध पातळ्यांवरील नेत्यांशी चर्चा झाली आहे.
-उत्पल पर्रीकर, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य

Back to top button