सांगली : 'अरुण लाड यांनी खरे दगाबाज कोण ते शोधावे' | पुढारी

सांगली : 'अरुण लाड यांनी खरे दगाबाज कोण ते शोधावे'

सांगली : पुढारी वृत्तसेवा

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीबाबत आमदार अरुण लाड यांनी काँग्रेसवर केलेले आरोप चुकीचे आहेत. त्यांनी साॅफ्ट लोकांना टार्गेट करण्यापेक्षा खरे दगाबाज कोण आहेत, हे शोधावे. तसेच भाजपचे उमेदवार राहुल महाडिक यांच्या प्रचारासाठी कोणाची माणसे फिरत होती, याची माहिती घ्यावी, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.

ते म्हणाले, सांगलीत पतसंस्था गटात काँग्रेसच्या संस्था कमी आहेत. तसेच मी मोठ्या प्रमाणात ठराव केलेले नाहीत. याबरोबरच सांगलीत अनेक मते अराजकीय आहेत. बहुतांश ठिकाणी क्रॉस व्होटिंग होण्याचा अंदाज आम्हाला आला होता. त्याबाबत आम्ही लाड यांना सावध केले होते. काँग्रेसचे राजकारण नासके, कुजके असते तर पदवीधर निवडणुकीत आम्ही लाड यांना मदत केली नसती.

तसेच यावेळी त्यांना सर्व डाटा दिला नसता. प्रत्येक मतदारांची भेट घेताना त्यांनी पाठवून दिलेली माणसे आम्ही बरोबर घेऊन जात होतो. त्यामुळे गद्दारी आमच्या रक्तात नाही. लाड यांचा वारसा जी. डी. बापू यांचा असला तरी आामचाही वारसा सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांचा आहे. आजपर्यंत आमच्या राजकीय, सामाजिक कामांवर कोणाताही डाग नाही. माझ्या वडिलांच्या तात्विक राजकारणाचा वारसा मी समर्थपणे चालवित आहे.

ते पुढे म्हणाले, लाड यांनी माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आहेत. केवळ साफ्ट टार्गेट असल्यामुळे आमच्यावर खापर फोडू नये. खरे तर त्यांनी खरे दगाबाज कोण आहेत, हे शोधावे. राहुल महाडिक यांच्या प्रचारासाठी कोणाची माणसे फिरत होती, याचीही माहिती त्यांनी घ्यावी. विश्वासघात हा आमच्या रक्तात नाही

तर तो पै-पाहुण्यांचे राजकारण करणार्‍यांत आहे. लाड कुटुंबियांबाबत आमच्या मनात आदर होता, आहे आणि तो यापुढेही राहिल. त्यांच्यासाठी आमचा मैत्रीचा हात कायम पुढे राहिल. या वेळी ए. डी. पाटील. रवी खराडे, बिपीन कदम, अनिल पाटील हे उपस्थित होते.

Back to top button