रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांची भाड्यात वाढ करण्याची मागणी | पुढारी

रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांची भाड्यात वाढ करण्याची मागणी

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल, डिझेल आणि आता नैसर्गिक वायूच्या किमतीतही वाढ करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात वाढ केली. त्याचा मोठा फटका मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी भाड्यात तब्बल 4 ते 5 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढीचा फटका भाज्या, फळे तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंनाही बसला. अक्षरशः रेडीमेड कपडेही महागले. त्यामुळे सर्वसामान्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. महागाईचा राक्षस दिवसेंदिवस मोठा होत चालला असल्याने सर्वच जण हवालदिल झाले आहेत.

नैसर्गिक वायूच्या किमतीत वाढ झाल्यानंतर महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी दरात वाढ केल्याचा सर्वात मोठा फटका मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना बसला आहे. परिणामी, आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी रिक्षा व टॅक्सीचालक संघटनांनी भाडेदरात 4 ते 5 रुपयांची वाढ करण्याची मागणी केली आहे.

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए.एल. क्वाड्रोस यांनी सांगितले की, महानगर गॅस लिमिटेडने शनिवारी सीएनजी दरात पुन्हा भरमसाट वाढ केल्याने एका किलो सीएनजीसाठी चालकांना 61.50 रुपये मोजावे लागत आहेत.

भाडे वाढवले नाही तर तीव्र आंदोलन

सरकारने सीएनजी दर 50 रुपयांवर असताना सुधारित भाडेदर लागू केले होते. आजघडीला सीएनजीचे दर 60 रुपयांपार गेले आहेत. गेल्या दीड वर्षांतील लॉकडाऊन आणि प्रवासी निर्बंधांमुळे टॅक्सीचालकांचा व्यवसाय पुरता बुडाला आहे. त्यात वाढलेल्या सीएनजी दरांमुळे त्यांच्या उत्पन्‍नात घट होऊन तोट्यात वाढ झालेली आहे. परिणामी, टॅक्सी आणि रिक्षाचालकांना दिलासा देण्यासाठी सीएनजी दरात कपात केली नाही किंवा भाडेदर वाढवले नाहीत, तर लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपाच्या टॅक्सी व रिक्षा संघटनेचे प्रमुख के.के. तिवारी यांनी दिला आहे.

वर्षभरात सीएनजी दरात 30 टक्क्यांनी वाढ

गेल्या वर्षभरात सीएनजी दरात सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. गेल्या 10 महिन्यांत एका किलो सीएनजीमागे तब्बल 14 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे टॅक्सी व रिक्षाचालकांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे सरकारने सीएनजी दरात कपात करावी किंवा टॅक्सी व रिक्षाचालकांच्या भाडेदरात वाढ करावी, अशी मागणी क्वाड्रोस यांनी केली आहे.

मार्चमध्ये 3 रुपयांनी वाढले होते भाडे

मार्चमध्ये रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. रिक्षाचे भाडे 18 रुपयांवरून 21 रुपये, तर टॅक्सीचे भाडे 22 रुपयांवरून 25 रुपये झाले होते. 1 मार्चपासून ही भाडेवाढ लागू करण्यात आली होती, तर 31 मेपर्यंत मीटर कॅलिबरेशन पूर्ण करण्यास सांगितले होते. रिक्षासाठी सध्या ग्राहकांना प्रत्येक किलोमीटरला 14.20 पैसे मोजावे लागत आहेत, तर टॅक्सीसाठी प्रत्येक किलोमीटरला 16 रुपये मोजावे लागत आहेत.

Back to top button