ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे जिल्हा प्रशासन सतर्क | पुढारी

ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे जिल्हा प्रशासन सतर्क

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. राज्य शासनाने कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटबाबत दक्ष राहण्याची सूचना सर्व जिल्ह्यांना केली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासन पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने शनिवारी जारी केेलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जाणार आहे.

जिल्ह्यात 42 टक्के लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात 18 वर्षांवरील एकूण लोकसंख्येच्या 42 टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 87 टक्के आहे. 18 वर्षांवरील एकूण 30,14,400 जणांचे लसीकरण अपेक्षित आहे. यापैकी 26,21,758 जणांनी पहिला डोस घेतला आहे. 12,78,624 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. हेल्थ केअर वर्कस्चे 111 टक्के तर फ्रंटलाईन वर्कस्चे 295 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे.

नागरिकांकडून नियम पायदळी

राज्य शासनाने सर्व निर्बंध शिथिल केेले होते. मात्र, कोरोना गेलाच या भावनेत सध्या सर्वजण आहेत. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात 80 टक्क्यांहून अधिक नागरिक विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचेही पालन होत नसल्याचे चित्र आहे. मात्र, यापुढे मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हे नियम पाळावे लागणार आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.

25 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार

जिल्ह्यातील 13 शासकीय रुग्णालयांत 17 ऑक्सिजन प्लँट बसविण्यात येत आहेत. त्यातून जिल्ह्यात दररोज 25.75 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे. सध्या दहा प्लँंटचे काम पूर्ण झाले आहे. तीन प्लँटची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. एका प्लँटची सुरक्षा तपासणी होणे बाकी आहे. तीन प्लँटसाठी सादरीकरण केलेले आहे. सध्या काम पूर्ण झालेल्या प्लँटची क्षमता दररोज 14 मेट्रिक टन इतकी आहे.

Back to top button