मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संकट काळातही आणला २०० कोटींचा निधी | पुढारी

मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी संकट काळातही आणला २०० कोटींचा निधी

जयसिंगपूर : संतोष बामणे

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. ही दोन वर्षे कोरोना, महापूर अशी संकटांनी तालुक्यासह राज्याला ग्रासले असतानाच शिरोळ तालुक्यासाठी पहिल्या वर्षी 109 कोटी, तर यावर्षी 111 कोटी अशा एकूण 220 कोटी रुयांच्या निधीतून आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून कामे प्रगतिपथावर आहेत. आगामी तीन वर्षांसाठी आणखी 500 कोटी रुपयांचा निधी मतदारसंघात आणण्याचे उद्दिष्ट असून, शिरोळ तालुका सर्व सोयींनियुक्त करण्याचा विडा यड्रावकरांनी उचलला आहे. त्याचबरोबर दिलेली आश्वासनपूर्ती व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर त्यांचा भर आहे.

शिरोळ तालुक्यात 3 शहरे व 52 गावे असून, हा मतदारसंघ क्षेत्रफळाने अत्यंत कमी, तर लोकसंख्येने जादा आहेत. शिवाय चार नद्यांमुळे बारमाही समृद्ध असलेला तालुका म्हणून ओळख आहे. शिरोळ विधानसभा मतदारसंघात मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. दोनवेळा पराभूत झाल्यानंतर जनतेने तिसर्‍यावेळी साथ दिली आणि ते भरघोस मतांनी निवडून आले. सत्तेच्या सारीपाटात यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य या विभागांच्या राज्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली.

त्यानंतर त्यांनी मागे वळून न पाहता कोरोना, महापूर अशा संकटांना सामोरे जाऊन पहिल्यावर्षी म्हणजे 2020 मध्ये तब्बल 109 कोटी, तर 2021 मध्ये 111 कोटी असा एकूण 220 कोटीचा निधी तालुक्याच्या विकासासाठी मंजूर करून आणला आहे. यात खिद्रापूर मंदिर, सार्वजनिक रस्ते, जयसिंगपूर शासकीय विश्रामगृह, तालुक्यातील ओढ्यांवरील पूल, मागासवर्गीय वसतिगृह, जयसिंगपूर बसस्थानकासाठी वाढीव निधी, जिल्हा नियोजन निधी, क वर्ग निधी, दलित वस्ती निधी, ग्रामविकास, शिरोळ व तेरवाड बंधारा दुरुस्ती, क्रीडा संकुल, शिरोळ सबस्टेशन, शिरोळ हद्दवाढ, चिपरी-अर्जुनवाड-जांभळी पशुवैद्यकीय दवाखाना, घालवाड प्राथमिक आरोग्य केंद्र वाढीव इमारत, सामाजिक न्याय, तालुक्यातील शाळा, व्यायाम साहित्य, अंगणवाडी इमारत बांधणे यांसह जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड या तीन शहरांच्या विकासासाठी 40 कोटींहून अधिक भरघोस निधी मिळाला आहे. गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित असलेले उदगाव ग्रामीण रुग्णालयासाठी 14 कोटींचा निधी खेचून आणला आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात विलीनीकरण, जयसिंगपुरात रेशीम कोष खरेदी-विक्री केंद्र यांसह राज्यातील आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न प्रशासन, वस्त्रोद्योग व सांस्कृतिक कार्याचे महत्त्वाचे निर्णय घेऊन कोट्यवधीच्या निधीतून विकासकामे साकारात आहेत.

त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम, क्षारपडमुक्त जमीन, तालुक्यातील आरोग्य सेवा बळकटीकरण यासह विविध कामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. तेही पूर्ण झाले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यात दिलेली आश्वासनपूर्ती, गरजेची सर्वच कामे करण्याचे शिवधनुष्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी उचलले आहे.

प्रस्तावित कामे

  • शिरोळ तालुक्यातील गरजेचे नदीवरील पूल
  • उदगाव येथे तीन जिल्ह्यांचे मनोरुग्णालय
  • जयसिंगपूर-दानोळी मार्गावर रेल्वे उड्डाण पूल
  • जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ शहरांसाठी विकास मॉडेल
  • शिरोळ तालुक्यातील सर्व गावांसाठी विशेष निधी
  • नृसिंहवाडी ते राजापूर बंधार्‍यापर्यंत बोटिंग
  • नांदणी, उदगाव, दानोळी, अब्दुललाट या मोठ्या गावांचा विकास
  • श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नावीन्यपूर्ण कामे
  • पंचगंगा प्रदूषणमुक्त

हेही वाचा :

Back to top button