सांगली : रुग्णांचे महिन्यात वाचले 13 लाख रुपये | पुढारी

सांगली : रुग्णांचे महिन्यात वाचले 13 लाख रुपये

सांगली : उध्दव पाटील

सांगली महानगरपालिकेने येथील त्रिकोणी बागेजवळ सुरू केलेले मध्यवर्ती निदान केंद्र सांगलीकरांसाठी ‘लयभारी’ ठरत आहे. हे निदान केंद्र सुरू झाल्यापासून महिन्यात 7 हजार 702 लॅब टेस्ट झाल्या आहेत. एक्स- रे 640 काढले आहेत. महिनाभरात रुग्णांचे 13 लाख रुपये वाचले आहेत.

वैद्यकीय सेवा महागल्या असताना महापालिकेचे हे निदान केंद्र मोठे दिलासादायक ठरत आहे.महापालिका व महालॅबतर्फे सांगलीत मध्यवर्ती निदान केंद्र सुरू झाले आहे. एकाच छताखाली एक्स-रे सह विविध 63 प्रकारच्या लॅबोरेटरी चाचण्या मोफत होत आहेत. याशिवाय काही चाचण्यांना शुल्क आकारले आहे. मात्र हे शुल्क खासगी पॅथॉलॉजी लॅबच्या तुलनेत अत्यल्प आहे.

हिमोग्लोबीन, मलेरिया मायक्रोस्कोपी, ब्लड ग्रुपींग व आरएच टायपिंग, लघवी, ब्लड शुगर, युरीन प्रेग्नंसी, डेंग्यू रॅपिड टेस्ट, एचबीएसएजी रॅपिड टेस्ट, स्पुटम फॉर एएफबी, एचआयव्ही, कोरोना अँटीजेन, विडाल, चिकुनगुनिया, मलेरिया, एचसीव्ही, व्हीडीआरएल, ट्रायडॉट या चाचण्या खासगी पॅथॉलॉजीच्या तुलनेत अत्यल्प दरात होत आहेत. केंद्र सुरू झाल्यापासून महिनाभरात 720 चाचण्या झाल्या आहेत. रुग्णांच्या खर्चात 2 लाख 49 हजार 940 रुपये बचत झाली आहे.

महिन्यात 640 एक्स रे

निदान केंद्रातून महिन्यात 640 एक्स रे काढले आहेत. एक्स रे डिजिटलचा दर प्रति एक्स रे शूटसाठी 75 रुपये आहे तर खासगीमध्ये 500 रुपये आहे. निदान केंद्रामुळे या रुग्णांचा 2 लाख 72 हजार रुपयांचा खर्च वाचला आहे.

6982 चाचण्या झाल्या मोफत

महालॅबतर्फे विविध 63 प्रकारच्या चाचण्या मोफत होत आहेत. निदान केंद्रातून सॅम्पल घेतलेल्या 6 हजार 982 चाचण्या मोफत झाल्या आहेत. यामध्ये सीबीसी, थायरॉईड, किडनीचे कार्य, यकृताचे कार्य, सी रिअ‍ॅक्टीव्ह प्रोटीन, युरिक अ‍ॅसिड, कॅल्शिअम, सोडीअम, पोटॅशिअम, क्लोराईड व लघवीच्या चाचण्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या चाचण्या मोफत झाल्याने रुग्णांचा सुमारे 8 लाख रूपयांचा खर्च वाचला आहे.

डायलिसिस युनिट होणार सुरू

सांगली महापालिकेच्या निदान केंद्राचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, निदान केंद्रप्रमुख रघुवीर हलवाई, महालॅबचे सयाजी झांबरे यांनी केले आहे. दरम्यान, पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने व महापालिकेच्या माध्यमातून सांगलीत लवकरच डायलिसिस युनिट सुरू होणार आहे. रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी सांगितले.

डासांनी हैराण; निदान केंद्राने दिलासा

डेंग्यूच्या 188 चाचण्या झाल्या आहेत. खासगी लॅबमध्ये डेंग्यू चाचणीचा दर 1 हजार रुपये आहे. महापालिकेच्या लॅबमध्ये 125 रुपयात ही चाचणी होत आहे. निदान केंद्रात चाचणी केल्यामुळे 188 रुग्णांचे मिळून 1 लाख 64 हजार 500 रुपये वाचले आहेत. चिकुनगुनियाच्या 28 चाचण्या झाल्या आहेत. त्यातून या रुग्णांचे 17 हजार 920 रुपये वाचले आहेत. मलेरियाच्या 20 चाचण्या झाल्या आहेत. त्यातून रुग्णांचे 4 हजार 400 रुपये वाचले आहेत. डासांच्या उच्छादामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र महापालिकेने मध्यवर्ती निदान केंद्र सुरू करून रुग्णांना दिलासा दिला आहे.

पाहा व्हिडिओ

भाऊंमुळेच ‘लालपरी’ रस्त्यांवरून धावते !!!

Back to top button