कार्तिक शुध्द द्वादशीच्या मुहूर्तावर तुलसी विवाहास प्रारंभ होत असल्याने सोमवार, दि.15 नोव्हेंबरपासून तुलसी विवाहाचे बार उडणार
आहेत. तुलसी विवाहाच्या तयारीसाठी घरोघरी लगबग सुरू झाली असून पूजा आणि लग्नविधी, साहित्य खरेदीसाठी नागरिकांची धांदल उडत आहे. तुलसी विवाहानंतर लग्नसराईस प्रारंभ होणार असल्याने विवाह इच्छुकही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात मानाने डोलत असते.
यावर्षी सोमवारी कार्तिक शुध्द द्वादशीपासून तुलसी विवाहास प्रारंभ होत आहे. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. पाच दिवसांमध्ये प्रत्येकाच्या सवडीनुसार आपापल्या तुळशींचे विवाह सोहळे पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे घरोघरी आता तुलसी विवाहसोहळ्याच्या तयारीसाठी लगबग सुरू झाली आहे. तुलसी विवाहानिमित्त घरोघरी तुळशीवृंदावनाची रंगरंगोटी करण्यात येत आहे. तुळशीच्या लग्नसोहळ्यासाठी लागणारे ऊस, चिंच, आवळा, बोरे, झेंडूची फुले व हिरव्या बांगड्या, काळे मणी तसेच विवाहाच्या अन्य पूजा साहित्याची बाजारपेठेत रेलचेल वाढली आहे.
लग्न सोहळ्यात अंगणाची शोभा वाढवणारी विविधरंगी रांगोळी, चिंच, आवळा, बोरं यांसह संपूर्ण विवाह साहित्य असलेल्या रेडीमेड ताटांना बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच फक्त विवाह साहित्याचे पॅकेजही विक्रीस उपलब्ध आहे. फ्लॅट संस्कृतीमध्ये शेतजमिनीवर सिमेंटची जंगलं वाढली आहेत. त्यामुळे शहराजवळील शेतकर्यांनाही ऊस, चिंच, बोरं हा रानमेवा विकत घ्यावा लागत आहे.
सातारा शहरात पोवईनाका परिसर, भाजी मंडई, राजपथ, राजवाडा आदी ठिकाणी तुलसी विवाह साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. तुलसी विवाहाने लग्नसराईस सुरुवात होत असल्याने विवाह इच्छुक वधूवरही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले आहेत. कोरोनाच्या तिसर्या लाटेचे सावट घोंघावत असल्याने जवळचाच मुहूर्त साधण्याकडे वधु-वरांसह पालकांचा कल वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही तुळसी विविाहाच्या निमंत्रण संदेशांचा महापूर ओसंडून वाहू लागला आहे.
पूर्वी ग्रामीण संस्कृतीमध्ये घराच्या अंगणात तुळशी वृंदावन व त्यामध्ये तुळशीचे रोप डोलत असायचे. तुळशीच्या लग्नासाठी अंगण शेणाने सारवून लख्ख केले जाई. सडा रांगोळी व पणत्यांची अंगणात सजावट केली जाई; परंतु बदलत्या जीवनशैलीमध्ये फ्लॅट संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे अंगण लुप्त झाले आहे. बहुमजली टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे अंगणाला पर्याय म्हणून टेरेसचा वापर केला जात आहे. तुळशी बारशीलाही इमारतीमधील सर्व फ्लॅटधारक एकत्रित येत इमारतीच्या छतावर तुलसी विवाह सोहळे पार पाडले जाणार आहेत.
पाहा व्हडिओ