द्राक्षपट्ट्यात ‘हैद्राबाद मेड’ औषधांची विक्री, घरोघरी थाटली दुकाने | पुढारी

द्राक्षपट्ट्यात ‘हैद्राबाद मेड’ औषधांची विक्री, घरोघरी थाटली दुकाने

तासगाव : दिलीप जाधव

जिल्ह्यात पूर्वेकडील द्राक्ष पट्ट्यात ‘हैद्राबाद मेड’ औषधांची खुलेआम विक्री होत आहे. द्राक्षबागायतदारांच्या आर्थिक अडचणींचा गैरफायदा घेऊन दर्जाहिन औषधे निम्म्या किमतीत शेतकर्‍यांच्या माथी मारणार्‍या टोळीने धुमाकूळ घातला आहे. जिल्हा कृषी कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाने या ‘हैद्राबाद मेड’ औषध विक्रेत्यांवर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांची आर्थिक फसवणूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.

दोन वर्षे कोरोना महामारीच्या काळात द्राक्षबागायतदारांवर लाखमोलाची द्राक्षे कवडीमोल दराने विकण्याची वेळ आली होती. बहुसंख्य शेतकर्‍यांचे पैसे व्यापार्‍यांकडे अडकून पडले आहेत. यामुळे अनेक द्राक्षबागायतदार शेतकरी औषध विक्रेत्यांची उधारी भागवू शकले नाहीत.

दरम्यान, या छाटणी हंगामात द्राक्षबागायतदारांच्या बरोबरीने औषध व खत विक्रेतेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या हंगामात मोजकी औषधे वगळता अनेक औषध उत्पादक कंपन्यांनी विक्रेत्यांनाही उधारीवर औषधे दिली नाहीत. पर्यायाने विक्रेते शेतकर्‍यांना उधारीवर औषधे देत नाहीत.

याचा गैरफायदा घेऊन ‘हैद्राबाद मेड’ औषध विक्रेत्यांनी जम बसवला आहे. त्यांच्याकडील औषधे निम्म्या किंमतीत मिळत आहेत. यामुळे नाईलाजाने शेतकरी ही औषधे घेऊन फवारणी करत आहेत. मात्र सदरची औषधे दर्जाहिन असल्याने रोगनियंत्रणासाठी कुचकामी ठरत आहेत. यातून या शेतकर्‍यांचे औषधाला पैसे पण गेले आणि रोग पण आटोक्यात नाही, असे दुहेरी नुकसान होत आहे.

‘हैद्राबाद मेड’ औषधांच्या पॅकिंगवर उत्पादकाचे नाव नसते. गावोगावीचे सबएजंट औषधाची पावती देत नाहीत. दर्जाची गॅरंटी देत नाहीत. पॅकिंग फोडल्यानंतर आतमधील औषध हुबेहूब अधिकृत कंपनीच्या औषधासारखे दिसते, हीच काय ती गॅरंटी. तरीही निम्म्या किमतीत औषध मिळते म्हणून द्राक्षबागायतदार सर्रासपणे ही दर्जाहिन औषधे वापरत आहेत; मात्र यातून त्यांचेच नुकसान होऊ लागले आहे.

घरोघरीच थाटली दुकाने

‘हैद्राबाद मेड’ औषधांना विक्रीचा परवाना नसल्याने दुकानात ठेऊन विक्री करता येत नाही. यामुळे अनेक उत्पादकांनी एजंटांनी गावोगावी सबएजंट नेमले आहेत. या सबएजंटांकडे रात्री औषधे पोहोच केली जातात. या सबएजंटांनी घरातच औषध दुकाने थाटली आहेत.

Back to top button