सांगली : म्होरके, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले; भामटे अंडरग्राऊंड | पुढारी

सांगली : म्होरके, गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले; भामटे अंडरग्राऊंड

सांगली : मोहन यादव

सांगली  जिल्ह्यातील अनेक बोगस शेअर्स, डॉलर्समध्ये गुंतवणूक करणार्‍या कंपन्या गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहेत. यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक गुंतवणूकदारांनी कंपन्यांकडे पैसे परत मागण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एजंट आणि कंपनीच्या प्रतिनिधींचे धाबे दणाणले आहेत. काहीजण कार्यालसास टाळे लावून अंडरग्राऊंड झाले आहेत. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकात अशा बोगस मल्टिपर्पज कंपन्यांनी आपले जाळे पसरविले आहे. शाखा काढण्यासाठी 10 ते 20 लाख रुपये घेतले आहेत. या शाखाद्वारे कमिशन एजंट नेमून गुंतवणूकदारांना कमी कालावधीत जादा व्याजाचे आमिष दाखवून मोठी रक्कम गुंतवण्यास सांगितले जात आहे. तसेच काहींनी फॉरेन मनी एक्सचेंजच्या नावाखाली गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. यातमध्ये पहिल्या काही गुंतवणूकदारांना स्टॉक, कमोडिटी, फॉरेक्स करन्सी अशा विविध मार्केटमधून अल्पावधीत पैसे दुप्पट करून दिले जातात.

यांना ब्लॉक चेन करण्यास सांगून नवनवीन लोकांना यात ओढले जात आहे. विशेषत: यात दोन नंबरचा पैसा मिळणार्‍यांची यादी काढून त्यांना संपर्क केला जात आहे. जिल्ह्यात अशा शेअर्स व फॉरेक्स कंपन्यांचे पेव फुटले आहे. शहरातील ब्लॅक मनीवाले, गावातील सावकार, कंत्राटदार, काही बडे अधिकारी यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ब्लॅकचे व्हाईट करीत आहेत.

अशा योजनांना भुलून जिल्ह्यातील हजारो लोकांनी कोट्यवधी रुपये गुंतविले आहेत. पण, याचा हळूहळू भांडाफोड होत आहे. ग्राहकांत जागृती होत आहे. याविषयाचे सखोल वृत्त दिल्यानंतर कंपन्या व गुंतवणूकदार यांच्यात खळबळ उडाली आहे. गुंतवणूकदारांना याबाबत फोन करून कंपनी प्रतिनिधींना विचारणा सुरू केली आहे. आज दिवसभर सांगली, इस्लामपूर, तासगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ, विटा, पलूस, कडेगाव या ठिकाणी कंपनीची असणारी कार्यालये बंद होती. काहींनी ग्राहकांनी तगादा लावल्याने मोबाईल बंद करून ठेवले आहेत. यामुळे गुंतवणूकदार थेट कार्यालयात पोहोचत आहेत; पण काही भामट्यांनी कार्यालयास टाळे ठोकून पलायन केले आहे. 50 लाखांच्या आलिशान चारचाकीतून फिरणारे, घोटाळा उघडकीस येण्याच्या भीतीने अंडरग्राऊंड झाले आहेत.

दुबईला पलायनाच्या तयारीत…

जिल्ह्यात या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक राज्यांत अशा कंपन्यांच्या शाखा व नेटवर्क आहे. काही राजकीय नेत्यांचे पाठबळ असल्याची चर्चाही आहे. घोटाळा उघडकीस आल्याने पोलिस यंत्रणेने चौकशी सुरू केली आहे. दुष्काळी तालुक्यातील एकाला ताब्यात घेतले होते; पण दोन तासात त्याला सोडून देण्यात आले. यामुळे म्होरक्यांची घाबरगुंडी उडाली आहे. काहीजण बेपत्ता झाले आहेत. तर काहीजण कंपनीचे मुख्यालय असलेल्या दुबईला पलायन करण्याच्या तयारी असल्याचे समजते.

काही बँकेचे अधिकारी, कर्मचारी सहभागी

या घोटाळ्यात एका मोठ्या बँकेतील अधिकारी, कर्मचारी सहभागी आहेत. हे कर्मचारी बँकेच्या ग्राहकांच्या खात्याचे डिटेल्स पाहून त्यांच्याशी संपर्क करतात. ही कंपनी बँकेशी संबंधित आहे. बँकेतील ठेवीपेक्षा कमी कालावधीत जादा व्याज दिले जाते. त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करा, असे आमिष दाखवून ग्राहकांना गंडविले जात आहे. यासाठी अनेकांनी बँकांच्या ठेवी मोडण्यास सुरुवात केली आहे. काहींनी सोने गहाण ठेवून अशा कंपन्यांत गुंतवणूक सुरू केली आहे.

तुलसी विवाहाचे बार आजपासून उडणार; लग्‍नाळूंचे गुडघ्याला बाशिंगपोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची गरज

जिल्ह्यात या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. या कंपन्यांना आताच अटकाव करण्याची गरज आहे. अन्यथा, भविष्यात हजारो लोक याद्वारे लुबाडले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तशा हालचाली पोलिसांनी सुरू केल्याचे समजते. तसेच गुंतवणूकदारांनी तक्रारी देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.

पाहा व्हिडिओ

पंचगंगा नदी गिळतेय काठावरची शेती : काठावरच्या शेतकऱ्यांवर संकट

Back to top button