सातारा : ‘क्राईम’मधील महिलांचा वाढता टक्‍का चिंतेचा | पुढारी

सातारा : ‘क्राईम’मधील महिलांचा वाढता टक्‍का चिंतेचा

सातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या गुन्हेगारी (क्राईम) घटनांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचे समोर आले आहे. यामध्ये सेक्टॉर्शन, चोरी याचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यामुळे पोलिसांसमोर आता नवे आव्हान निर्माण झाले असून अशा महिलांना गुन्ह्यांपासून परावृत्त करणे गरजेचे बनले आहे.

सातारा जिल्हा पोलिस दलाचा ‘भरोसा’ हा महत्त्वपूर्ण सेल आहे. या सेलमध्ये लहान मुले-मुली, वृध्द व महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. प्रसंगी संबंधितांचे पुनर्वसन देखील होत आहे. भरोसा सेल शिवाय महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत अनेक योजना महिलांसाठी आहेत. महिला बाल कल्याण विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यात ‘महिला समुपदेशन ‘केंद्र’ देखील कार्यान्वित आहेत.

याद्वारे देखील महिलांच्या अडीअडचणी सोडवल्या जातात. तसेच इतर सायकॉलॉजी संबंधीचे पर्याय देखील आहेत. सामाजिक संघटनांच्या माध्यमातून देखील महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रयत्न होत आहेत. या सर्वांचा आता प्रभावीपणे वापर करुन गुन्हेगारी क्षेत्रात गेलेल्या, जावू पाहणार्‍या महिलांना त्यापासून रोखण्याची गरज निर्माण झाली आहे. हाताला काम नसल्याने महिला चोरी करत असल्याचे देखील भीषण वास्तव विविध केसमध्ये आहे. त्यामुळे गुन्हेगारी संबंधातील महिलांचा अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाय योजना राबवण्याची काळाची गरज बनली आहे.

सराईत महिलेवर मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हे

सातारा शहरात गेल्या 10 दिवसांमध्ये दोन वेगवेगळ्या चोर्‍यांमध्ये संशयित आरोपी म्हणून दोन महिलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी झालेल्या चोर्‍यांची उकल केल्यानंतर अनेक धक्‍कादायक घटना समोर आल्या आहेत. यातील एक महिला सराईत गुन्हेगार निघाली. भाड्याच्या खोलीत रहायचे. घर मालकीनीसह परिसरात महिलांची ओळख केल्यानंतर सहज घरात जावून अलगदपणे सोने, चांदी, रोकडसह मौल्यवान वस्तूंची चोरी करायची अशी तिची पध्दत. संबंधित महिलेला अटक केल्यानंतर तिच्यावर मुंबईसह ठिकठिकाणी गुन्हे दाखल असल्याची जंत्रीच निघाली. दुसर्‍या केसमध्ये काही महिलांनी बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणावरुन भंगारासाठी प्लेटा चोरी केल्याचे समोर आले आहे.

फ्रेंड रिक्‍वेस्ट, राँग नंबर आणि पैसा…

सातारा शहरासह जिल्ह्यात गेल्या वर्षभरात काही महिला फोनवरुन पुरुषांशीच ओळख वाढवित आहेत. जाणूनबुजून फोन करायचा आणि राँग नंबर लागला म्हणून ठेवून द्यायचा. फेसबुकवर फे्रंड रिक्‍वेस्ट पाठवायची. असे अनेक उद्योग केले जात आहेत. त्यातून मैत्री केल्यानंतर त्याचा गैरफायदा घेत अश्‍लील चॅटिंग, व्हिडीओ कॉल केल्यानंतर त्याचा आधार घेत थेट ब्लॅकमेलिंग केले जाते. सातार्‍यातील एक डॉक्टर, बारामतीमधील बँडबाजा चालकाला अशा प्रकारे संशयित आरोपी महिलांनी लाखो रुपयांना लुबाडल्याचे वास्तव आहे. यालाच ‘सेक्टॉर्शन’ असे ओळखले जात आहे. त्यामुळे अनोळखी फे्रंड रिक्‍वेस्ट, राँग नंबर यापासून सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

Back to top button