शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : शिवचरित्र घरोघरी पोहोचावे हाच ध्‍यास | पुढारी

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे : शिवचरित्र घरोघरी पोहोचावे हाच ध्‍यास

मुंबई, पुढारी आनलाईन :

शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी आज ( दि १५ )  पहाटे निधन झाले. सुमारे सात दशकांहून अधिक काळ त्‍यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. जवळपास सात दशके त्यांनी इतिहास संशोधनाचे कार्य केले. शिवचरित्र घरोघरी पोहोचावे हाच ध्‍यास घेवून त्‍यांनी व्याख्याने, नाटक आणि लेखनाच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले. त्‍यांच्‍या जीवनप्रवासाचा संक्षिप्‍त आढावा.

२९ जुलै १९२२ रोजी पुण्यातील सासवड येथे बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म झाला होता. त्यानंतर भारत इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आपले काम करण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवरायांची महती प्रत्येक घराघरात पोहचवण्यासाठी त्यांनी इतिहास संशोधन करायला सुरवात केली.

१२ हजारांहून अधिक व्याख्याने

शिवचरित्राचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्यातील अनेक गडकिल्ले, ऐतिहासिक दस्तावेज यांचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर त्यांनी शिवचरित्रावर व्याख्यानेही द्यायला सुरुवात केली. आणि २५ डिसेंबर १९५४ रोजी नागपूरमध्ये पहिले जाहीर व्याख्यान दिले. आजअखेर त्यांनी शिवचरित्रावरील १२ हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत.त्यानंतर बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित राजा शिवछत्रपती हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या सुमारे १७ आवृत्या निघाल्या आहेत. त्याचबरोबर भारताच्या स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांच्या ताब्यात असणाऱ्या दादरा नगर हवेलीच्या मुक्तीसंग्रामासाठी केलेल्या क्रांतीलढ्यात त्यांनी सहभागही घेतला होता.

जाणता राजा महानाट्याच्या निर्मिती

जाणता राजा या महानाट्याच्या निर्मिती करून बाबासाहेबांनी सध्याच्या पिढीची मन जिंकले होते. या नाट्याचे सुमारे हजारो प्रयोग झाले आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची दखल घेवून त्यांना राज्य सरकारने २०१५ साली महाराष्ट्र भूषण तर केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांची साहित्य संपदा

जाळत्या ठिणग्या, पुरंदर्‍यांची दौलत, दख्खनची दौलत, सावित्री, सिंहगड, राजगड शेलारखिंड, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, कलावंतिणीचा सज्जा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्‍यांचा सरकारवाडा, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्‍याचे मानकरी यासह राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध (या पुस्तकाची 2014 साली प्रकाशित झालेली इंग्रजी आवृत्तीही आहे. भाषांतरकार – हेमा हेर्लेकर).

विविध पुरस्कार

पद्मविभूषण (2019) डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची डी.लिट. (2013), महाराष्ट्रभूषण पुरस्कार (19 ऑगस्ट 2015) – गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (2016), – प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2012), – राजमाता सुमित्राराजे भोसले यांनी दिलेली शि‌वशाहीर पदवी (१९६३) – त्रिदलचा पुण्यभूषण पुरस्कार – चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार – दादरा-नगर-हवेली मुक्तिसंग्रामातील कामाबद्दल स्वातंत्र्यसैनिक पुरस्कार.

Back to top button