पंतप्रधान माेदींकडून मिठाई भरवून बनाळी येथील सुभेदार संतोष चव्हाणांना दिवाळी निमित्त शुभेच्छा | पुढारी

पंतप्रधान माेदींकडून मिठाई भरवून बनाळी येथील सुभेदार संतोष चव्हाणांना दिवाळी निमित्त शुभेच्छा

जत : पुढारी वृत्‍तसेवा

बनाळी (ता. जत) येथील भारतीय सैन्य दलात कर्तव्य बजावत असलेले सुभेदार मेजर संतोष सुदाम चव्हाण हे जम्मू येथे कार्यरत आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या नौशेरामध्ये भारतीय सैन्य दलातील सैनिकांसोबत दीवाळी साजरी केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुभेदार मेजर संतोष चव्हाण यांना दिवाळीची मिठाई व शुभेच्छा दिल्या.

सुभेदार चव्हाण यांचे पंतप्रधान मोदींसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सुभेदार चव्हाण यांचे पंतप्रधान मोदी यांच्यासोबतचे फोटो तालुक्यातील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेकांनी व्हाट्सॲप स्टेट्स व ग्रुपवर फोटो शेअर केले आहेत.मेजर सुभेदार चव्हाण यांचा पंतप्रधानांच्या समवेत असलेल्‍या फोटोमुळे अख्ख्या बनाळीत विशेषतः तरुणाईमध्ये उत्साहाला उधाण आले आहे.

मेजर सुभेदार चव्हाण यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बनाळी या ठिकाणी झाले आहे. तर इयत्ता ११ वी विज्ञान जत येथील श्री रामराव विद्या मंदिर येथे झाले. १९९४ मध्ये त्यांना भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला हैद्राबाद, अंबाला, हरियाणा, अरुणाचल प्रदेश तर नाशिक येथे टेक्निकल इन्स्पेक्टर या पदावर काम केले. तर २०१० मध्ये नाईक सुभेदार या पदावर सेवा बजावली. १ ऑक्टोबर २०२१ रोजी सुभेदार मेजर या पदावर सध्या ते कार्यरत आहेत.

यावेळी जवानांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले, मी तुमच्‍या कुटुंबीयांचा सदस्‍य म्‍हणून येथे आलो आहे. मी १२० कोटी देशवासीयांचा आशीर्वाद तुमच्‍यासाठी घेवून आलोय. तुम्‍ही भारतमातेची करत असलेली सेवा खूपच महत्‍वपूर्ण आहे. हे सौभाग्‍य काहींच्‍या वाट्याला येते. तुम्‍ही देशाचे सुरक्षा कवच आहात. तुमच्‍यामुळे देशाचे नागरिक सुखाची झोप घेवू शकतात, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचलं का? 

Back to top button