मरावे परी वृक्ष रूपी उरावे..! | पुढारी

मरावे परी वृक्ष रूपी उरावे..!

लंडन :

जगभरात अंत्यसंस्काराच्या पध्दतींमध्ये प्रामुख्याने दहन व दफन यांचा समावेश होतो. मात्र एक कंपनी अंत्यसंस्काराची पध्दत बदलू इच्छिते. ‘कॅप्सुला मुंडी’ असे या कंपनीचे नाव आहे. मृतदेहांना एका विशिष्ट प्रकारच्या पॉडमध्ये ठेवून त्यांना वृक्षामध्ये रुपांतरीत करण्याचा प्रस्ताव या कंपनीने ठेवला आहे.

या खास पॉडचे नाव आहे ‘ऑर्गेनिक बरियल पॉड्स’. हे एक अंडाकृती, कार्बनिक कॅप्सुल आहे. या कॅप्सुलमध्ये एका विशिष्ट पध्दतीने मानवी मृतदेह ठेवण्याची व्यवस्था आहे. आईच्या गर्भात ज्याप्रमाणे बाळ असते त्याच पध्दतीने या पॉडमध्ये मृतदेह ठेवला जाईल. एखाद्या भ—ुणाप्रमाणेच हा मृतदेहही बीजरुप असेल. त्याच्या वरील भागात एक झाड असेल. ऑर्गेनिक बरियल कॅप्सुल हे स्टार्च प्लास्टिकपासून बनलेले असेल व जमीनीच्या आत गेल्यानंतर त्याचे पूर्णपणे विघटन होईल.

या पॉडबरोबरच मानवी देहाचेही विघटन होऊन त्यामधील पोषक घटकांमुळे वरील झाडाचा विकास होईल. हे ऑर्गेनिक बरियल पॉड पूर्णपणे कार्बनिक आणि नैसर्गिकरित्या विघटीत होणारे आहेत. ते पारंपरीक शवपेट्यांची जागा घेऊ शकतील. शवपेट्यांच्या तुलनेत त्यांचे लवकर विघटन होईल व झाडाच्या विकासासाठी ते मदत करील. मृतदेह आणि ऑर्गेनिक बरीयल पॉडमधून बाहेर पडणारे घटक जमीनीच्या आतील मातीत मिसळून ते वृक्षांच्या मुळांमधून त्याला पोषण देतील.

‘कॅप्सुल मुंडी’ने म्हटले आहे की एखादा वृक्ष पूर्णपणे विकसित होण्यासाठी दहा ते 40 वर्षे लागतात. मात्र ऑर्गेनिक बरियल पॉड्स एका आठवड्यातच झाडाला पोषक घटक पुरवू लागतील व झाडाचा वेगाने विकास होईल. ‘हरित कब—स्तान’ची (ग्रीन सिमेटेरीज) ही संकल्पना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यामधील भावनिक बाब अशी आहे की मृत व्यक्तीचे नातेवाईक या पॉडच्या वृक्षाशी आपले भावनिक संबंध जोडू शकतील व त्याची काळजीही घेऊ शकतील.

Back to top button