मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट

मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी ठरणार जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट
Published on
Updated on

 'प्लॅनेट मराठी'चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर आणि 'गोल्डन रेशियो फिल्म्स' यांच्या प्रयत्नातून युनायटेड किंगडम मधील नावाजलेल्या 'ब्लॅक हँगर स्टुडिओ' ज्यांनी याआधी साय-फाय चित्रपट केले आहेत ज्यात बॅालिवूडच्या 'रा वन'या चित्रपटाचाही समावेश आहे, ही चित्रपट निर्मिती संस्था आणि 'ओरवो स्टुडिओ' आता 'मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी' या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण करत आहेत. तेही ऐतिहासिक चित्रपटातून. चित्रीकरण आणि तांत्रिक बाबी देखील लंडनमध्येच होणारा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' हा पहिला मराठी चित्रपट ठरणार आहे. हा चित्रपट मराठी तसेच इंग्रजी भाषेत चित्रित होणार असल्याने आता छत्रपती ताराराणींची शौर्यगाथा सातासमुद्रापार पोहोचणार आहे. उत्तम दर्जाचे व्हीएफएक्स आणि ग्राफिक्स असणाऱ्या या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांना महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. आपल्या प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी सक्षमपणे पेलणाऱ्या 'प्लॅनेट मराठी'च्या प्रयत्नामुळे मराठी चित्रपटसृष्टी अधिक समृद्ध होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याला अबाधित राखण्याचे काम त्यांच्या निधनानंतर अनेक छत्रपतींनी केले. पण या स्वराज्य रक्षणाच्या कार्यात महत्वाच्या ठरतात त्या छत्रपती ताराराणी.  त्या वेळेच्या जाचक पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देत मुघल, निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी या सत्तांविरूद्ध त्यांनी निकराचा लढा दिला. अशा या महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासात कर्तृत्व गाजवणाऱ्या छत्रपती ताराराणींवर आधारित 'मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी' हा चित्रपट २०२२ च्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

डॉक्टर जयसिंगराव पवार लिखित 'मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी' या चरित्र ग्रंथावर आधारित या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे आहेत. राहुल जनार्दन जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. औरंगजेब सारख्या क्रूर आणि निष्ठूर राज्यकर्त्याला यमसदनी पाठवणाऱ्या छत्रपती ताराराणींची व्यक्तिरेखा मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी साकारत आहे. या चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे.

'मोगलमर्दिनी छत्रपती  ताराराणी' या चित्रपटाबद्दल 'प्लॅनेट मराठी'चे प्रमुख, "संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " मराठी चित्रपटांना अधिक दर्जेदार बनवण्याचा 'प्लॅनेट मराठी'चा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. मराठी चित्रपटांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली जावी, या दृष्टीने आमचा कायम प्रयत्न असतो.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्य अबाधित राखण्यात सिंहाचा वाटा असूनही छत्रपती ताराराणींबद्दल लोकांना इतकी माहिती नाही. त्यांचे धाडस आणि शौर्य असामान्य आहे. त्यांची ही वीरगाथा लोकांसमोर आणण्याचा 'प्लॅनेट मराठी'चा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा इतिहास सातासमुद्रापार संपूर्ण जगाला कळावा, यासाठी या चित्रपटाची संपूर्ण टीम खूप मेहनत घेत आहे.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news