जत : शेततळ्यात बुडून महिलेचा मृत्यू; सोन्याळ येथील घटना | पुढारी

जत : शेततळ्यात बुडून महिलेचा मृत्यू; सोन्याळ येथील घटना

जत; पुढारी वृत्तसेवा : सोन्याळ (ता. जत) येथे एका महिलेचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुरेखा हणमंत पुजारी (वय ४५ रा. उटगी) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या पूर्वी घडली असावे असे फिर्यादीने नमूद केले आहे. याबाबतची फिर्याद सिद्धनिग हणमंत पुजारी याने उमदी पोलिसांत दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पुजारी कुटुंबीय हे मूळ उटगी येथे राहत असून त्यांची शेती सोन्याळ हद्दीत आहे. सोमवारी सुरेखा पुजारी शेतात गेल्या होत्या. त्या कुठे दिसेनात म्हणून कुटुंबियांनी शोधाशोध केली यावेळी शेततळ्यात पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल्यानंतर सदरच्या महिलेचा शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदरची घटना नोंद असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल माळी करत आहेत.

आठवड्यातील दुसरी घटना

शेततळ्यात बुडून दरवर्षी दोन ते तीन मृत्यू होत आहेत. दरम्यान बिळूर येथे गुरुवारी पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसात ही घटना घडली आहे. या आठवड्यातील दुसरी घटना आहे.

Back to top button